Tarun Bharat

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यात बिबटय़ाची घुसखोरी

वनविभाग परिसरात ट्रप कॅमेरे लावणार

प्रतिनिधी /नवारस्ता

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील दौलतनगर येथील राहत्या बंगल्याच्या परिसरातच बिबटय़ाने घुसखोरी केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बंगल्यातील सीसीटीव्हीत बिबटय़ाच्या हालचाली कैद झाल्याने वनविभागही खडबडून जागा झाला आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे मंगळवारी 7 रोजी पाटण मतदार संघातील दौलतनगर येथील निवासस्थानी मुक्कामी असल्याने मंगळवारी सकाळपासूनच दौलतनगर परिसर गर्दीने गजबजला होता. दिवसभर मंत्री देसाई यांच्या शासकीय आणि कार्यकर्त्यांच्या बैठकी सुरू होत्या.

  मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान मंत्री देसाई यांची कार्यकर्त्यांसमवेत बैठक सुरू असतानाच त्यांच्या बंगल्याबाहेरून अचानक एक बिबटय़ा त्यांच्या गार्डनमधून बिनधास्तपणे चालत येऊन बंगल्याला फेटफटका मारून निघाला असल्याचे बंगल्याबाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. त्याच क्षणी सुरक्षा रक्षकाने त्याचा पाठलाग करण्याचा केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन हा बिबटय़ा बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूने मरळीच्या दिशेने निघून गेला. यावेळी मंत्री देसाई यांच्या बंगल्याबाहेर उपस्थित कार्यकर्त्यांनी मात्र बिबटय़ाला पाहिल्याने वाघ वाघ म्हणून एकच आरडाओरडा केला. त्यामुळे दौलतनगर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

वनविभाग लवकरच ट्रप कॅमेरे बसविणार   दरम्यान राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या राहत्या घरासमोर बिबटय़ाची अचानक एन्ट्री झाल्यामुळे पाटण वनविभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील नागरिकांना स्पीकरद्वारे आवाहन करून बिबटय़ाच्या वावर क्षेत्रातील नागरिकांनी घ्यावयाची काळजी आणि खबरदारीविषयी सूचना देण्यात आल्या. परिसरात उसाची तोड सुरू असल्यामुळे बिबटय़ांचा स्थलांतरित होण्यासाठी वावर वाढला आहे. त्याच्यापासून मानवाला धोका नाही मात्र आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. लवकरच अशा क्षेत्रात ट्रप कॅमेरे बसविणार असल्याची माहिती पाटणचे वन परिक्षेत्र अधिकारी पोतदार यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

Related Stories

गेल्या मार्चला फुल्ल तर यंदा हाफ लॉकडाऊन

Patil_p

खरीप हंगाम बैठक संपन्न

Patil_p

हेमंत बिस्वा शर्मा होणार आसामचे मुख्यमंत्री

datta jadhav

सातारा : भरतगाववाडीत वन्य श्वापदाच्या हल्ल्यात कुत्रा ठार,ग्रामस्थात भीतीचे वातावरण

Archana Banage

कास पठारावर वशिलेबाजांना मिळतोय विनाशुल्क प्रवेश

datta jadhav

विवाहितेच्या छळ करणाऱया पती, दिरांसह चौघांवर गुन्हा

Amit Kulkarni