Tarun Bharat

गेहलोत-पायलट दोघेही काँग्रेससाठी बहुमूल्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान ः राजस्थानमधील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी

वृत्तसंस्था / इंदोर

राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय संघर्षावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी टिप्पणी केली आहे. गेहलोत आणि पायलट दोघेही काँग्रेससाठी बहुमूल्य आहेत. राजस्थानातील राजकीय घडामोडींचा भारत जोडो यात्रेवर कुठलाच प्रभाव पडणार नाही. यात्रा जसजशी पुढे जाईल, तिला मिळणारे समर्थन वाढत जाणार असल्याचा दावा राहुल यांनी इंदोर येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे.

राजस्थानातील राजकीय संघर्षावर पक्षाचे नेतृत्व नजर ठेवून आहे. गेहलोत आणि पायलट दोघेही आमच्यासाठी बहुमूल्य आहेत. भारत जोडो यात्रा राजस्थानात पोहोचल्यावर त्याचे आणखी भव्य स्वागत तेथे होणार असल्याने मला त्याबद्दल कुठलीच चिंता नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

भाजपकडून प्रतिमाहनन

माझी प्रतिमा बिघडविण्यासाठी भाजप हजारो कोटी रुपये खर्च करत आहे. प्रतिमेवर चिखलफेक केल्याने मला नुकसान होईल असे भाजपला वाटतेय, परंतु यातून मला लाभच होत आहे. सत्याची शक्ती माझ्याकडे असून ती लपविली जाऊ शकत नाही. माझ्या प्रतिमेला नुकसान पोहोचविण्यासाठी भाजप जितका पैसा खर्च करेल, तितकीच शक्ती मला मिळत जाणार आहे. अशाप्रकारचे व्यक्तिमत्त्वावरील हल्ले पाहता मी योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे कळते, असा दावा राहुल यांनी केला आहे.

राहुल यांनी आतापर्यंत 2 हजारांहून अधिक किलोमीटर पायपीट केली आहे. भारत जोडो यात्रेचे नियोजन एक वर्षापूर्वी केले होते. यात्रेदरम्यान गुडघ्याची जुनी जखम पुन्हा चिघळल्याने चालू शकणार की नाही, अशी भीती सतावत होती. परंतु या भीतीवर विजय मिळवू शकलो. या यात्रेदरम्यान एक मुलगी भेटली होती, आईवडिलांनी यात्रेकरता अनुमती दिली नव्हती तरीही सहभागी होणार असे सांगत होती. अशा क्षणांमुळेच मला शक्ती मिळाली आणि भीतीवर विजय मिळवून दोन हजारांहून अधिक किलोमीटरचा पायी प्रवास करू शकलो, असे उद्गार राहुल यांनी काढले आहेत.

लघु उद्योगांवर लक्ष द्यावे लागणार

बेरोजगारी दूर करण्यासाठी लघु उद्योगाच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटी यासारख्या निर्णयांमुळे उद्योगक्षेत्रावरील भार वाढला असून यामुळे बेरोजगारी वाढली आहे. केवळ दोन-तीन मोठे उद्योगपतीच सर्व कामे करत आहेत. या कंपन्या प्रत्येक क्षेत्रात मक्तेदारी निर्माण करत आहेत. हा प्रकार संपुष्टात यायला हवा, असे राहुल यांनी म्हटले आहे.

गेहलोत-पायलट वाद

काँग्रेसमध्ये बंडखोरी करू पाहणारा नेता मुख्यमंत्री होऊ शकत नाही. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय पक्षनेतृत्व घेणार नाही. 10 आमदारांचाही पाठिंबा नसलेल्या नेत्याने पक्षात बंडखोरी केल्याचा आरोप गेहलोत यांनी पायलट यांच्यावर केला होता. यावर पायलट यांनीही प्रत्युत्तर दिले होते. गेहलोत यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला असुरक्षितता का वाटावी? असे प्रश्नार्थक विधान त्यांनी केले होते.

Related Stories

सुवेंदू अधिकारींसह भावाविरोधात तक्रार

Patil_p

कोण लिहितं मोदींचं भाषण?

datta jadhav

धार्मिक भावना दुखावणाऱयांवर कारवाई

Patil_p

भारतात मिळालेल्या कोरोनाच्या स्ट्रेनचे WHO ने केले नामकरण; दिले ‘हे’ नाव

Tousif Mujawar

पदोन्नती-आरक्षण – राज्यांनाच अधिकार!

Patil_p

भारताचा युएईबरोबर ऐतिहासिक करार

Patil_p