प्रतिनिधी/कोल्हापूरगोकुळ' निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकारण तापू लागले आहे. विरोधी आघाडीच्या मंत्र्यांनी काल, रविवारी हातकणंगले, शिरोळमधील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर आज, सोमवारी सत्ताधारी आघाडीचे नेते महादेवराव महाडिक यांनी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने यांची भेट घेऊन सत्ताधारी आघाडीसोबत राहण्याचे आवाहन केले.
गोकुळ’साठी दाखल अर्जांची छाननी सोमवारी झाल्याने दोन्ही आघाडीमधील अंतर्गत हालचालीने वेग घेतला आहे. रविवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आमदार प्रकाश आवाडे, राजू आवळे, संध्यादेवी कुपेकर, उल्हास पाटील, सावकर मादनाईक आदींच्या गाठीभेटी घेऊन विरोधी शाहू आघाडीसोबत राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोमवारी सकाळच्या सुमारास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी खासदार धैर्यशील माने व माजी खासदार निवेदिता माने यांची भेट घेऊन सत्ताधारी गटासोबत राहण्याची विनंती केली. यावेळी राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, वडगाव बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील उपस्थित होते.
महाडिक-माने भेटीमुळे तर्क-वितर्क
खासदार धैर्यशील माने शिवसेनेच्या माध्यामातून महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते आहेत. गोकुळसाठी महाविकास आघाडीची बांधणी सुरु आहे. कुणाकडे किती ठराव आहेत त्यापेक्षा घटकपक्षासह अन्य सर्व चेहरे शाहू आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर दोन वरिष्ठ मंत्र्यांनी रविवारी प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र या संपर्क दौऱ्यात खासदार माने, निवेदिता माने यांची भेट झाली नाही. यापार्श्वभुमीवर महाडिक यांनी माने यांची तातडीने घेतलेल्या भेटी बद्दल तर्क वितर्क लढवले जात आहेत.

