गोकुळ शिरगाव / वार्ताहर
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव एमआयडीसी मध्ये आज भीषण आग लागली. सरोज पॉलीमर्स या कंपनीमध्ये आज दुपारी चारच्या सुमारास फर्नेस ऑईलने पेट घेतला. संपूर्ण कंपनीला आगीने विळख्यात घेतल्याने जवळपास एक ते दीड कोटीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गोकुळ शिरगाव येथे D 60/ 3 या कंपनीमध्ये सीएनसी, व्हीएमसी मशीन शॉप असून यामध्ये ऑईलचे बॅरेल होते. रविवारी दुपारी चारच्या सुमारास फर्नेस ओईल मध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने काही क्षणातच संपूर्ण कंपनीला आगीने वेढा दिला.
ऑईलचे बॅरेल असल्या कारणाने ही आग मोठ्या प्रमाणात उसळत होती. ह्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील अग्निशामक बंब, कागल महापालिका अग्निशमन दलाचा बंब व कोल्हापूर महापालिका अग्निशामक दलाचे बंब तिन्ही एकत्र आल्याने ही आग आटोक्यात आली. पण एक ते दोन तासात या आगीने कंपनीचे जवळपास एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कंपनी मालक यांनी सांगितले. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सपोनि सुशांत चव्हाण करीत आहेत.


previous post
next post