Tarun Bharat

गोमंतकाचा ‘हृदयसम्राट’ निर्वतला

प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.मंजुनाथ देसाई यांचे निधन, संपूर्ण गोवा हळहळला

प्रतिनिधी /शिरोडा

गोव्यातील नामवंत हृदयरोगतज्ञ व गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसिद्ध सर्जन डॉ. मंजुनाथ प्रेमानंद देसाई (44) यांचे काल रविवारी पहाटे 4 वा. अल्प आजाराने निधन झाले. डॉ. देसाई यांनी गोवा, महाराष्ट्र तसेच कर्नाटकाच्या हजारो रुग्णांच्या हृदयावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करुन अनेकांना जीवनदान दिले आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे देवदूत काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

विदेशातील संधी सोडून गोमंतकीयांच्या सेवेत

डॉ. मंजुनाथ देसाई यांच्या निधनाची वार्ता ऐकून संपूर्ण गोवा हळहळला.  अल्पकालीन वैद्यकीय कारकिर्दीत ते आपल्या कर्तृत्त्वाचा अमिट ठसा गोमंतकीयांच्या हृदयावर कायम उमटवून गेले आहेत. हृदयरोगतज्ञ म्हणून ते जेवढे निष्णात होते, तेवढेच ते दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. बोरी येथील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या डॉ. देसाई यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात उच्च भरारी घेतली. ऐन तारुण्यात विदेशातील नामी संधी सोडून गोमंतकीयांच्या सेवेसाठी ते गोमेकॉत पूर्णवेळ हृदयरोग तज्ञ म्हणून रुजू झाले. गोमेकॉतील कार्डिओलॉजी विभागाच्या उभारणीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. गोमेकॉच्या हृदयरोग चिकित्सा विभागाचे प्रभारी प्रमुख म्हणून त्यांच्याकडे सध्या ताबा होता.

दहा वर्षांत हजारो रुग्णांच्या हृदयावर केल्या शस्त्रक्रिया

डॉ. देसाई यांचे प्राथमिक शालेय शिक्षण बोरी गावात व पुढे दहावीपर्यंत नवोदय विद्यालय काणकोण येथे झाले. गोवा वैद्यकीय महाविद्यायात एमबीबीएस व एम.डी केल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत शिक्षणासाठी ते इंग्लडला गेले. तेथे काही काळ त्यांनी प्रॅक्टीसही केली. त्यानंतर मंगळूर कर्नाटक येथील काही नामांकित इस्पितळात त्यांनी सेवा दिली. सन 2012 साली तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या आग्रहास्तव ते गोव्यात परतले. बांबोळी येथील गोमेकॉत रुजू होऊन पूर्णवेळ गोमंतकीयांच्या सेवेत दाखल झाले. मागील दहा वर्षांपासून ते गोमेकॉच्या हृदयरोग चिकित्सा विभागात कार्यरत होते. या काळात त्यांनी गोव्यातील हजारो रुग्णांवर एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी केल्या.

शिरशिरे-बोरी येथे अंत्यसंस्कार

रविवारी सकाळी डॉ. देसाई यांच्या निधनाची वार्ता कळताच बोरी येथल त्यांच्या निवासस्थानी लोकांनी गर्दी केली. आरोग्यमंत्री विश्वजित राणे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, माजी मुख्यमंत्री तथा आमदार रवी नाईक, तृणमूल काँग्रेसचे नेते लुईझिन फालेरो, आमदार रोहन खंवटे, आमदार सुभाष शिरोडकर, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, माजीमंत्री महादेव नाईक, गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर्स व शेकडो चाहत्यांनी अंत्ययात्रेला उपस्थिती लावली. अनेक चाहत्यांना अंत्यदर्शन घेताना आपले अश्रू आवरता आले नाहीत. डॉ. देसाई यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ व आई असा परिवार आहे. अंत्यसंस्कार दुपारी शिरशिरे बोरी येथे करण्यात आले.

कार्डिओलॉजी विभागाचा आधारस्तंभ गेला – डॉ. शेखर साळकर

गोमेकॉतील हृदयरोग चिकित्सा विभाग उभारणीमागे डॉ. मंजुनाथ देसाई यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या सेवेची दखल घेऊन सरकारने गोमेकॉच्या हृदयरोग चिकित्सा विभागाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा आदर करावा. डॉ. देसाई यांचे कार्य वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रेरणादायी असेच आहे, असे प्रसिद्ध कर्करोगज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी म्हटले आहे.

वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी – मिनानाथ उपाध्ये

डॉ. देसाई यांच्या जाण्याने गोव्याच्या वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मंजुनाथ हा शालेय जीवनापासूनच तल्लख बुद्धीचा व तेवढाच विनम्र होता. वैद्यकीय सेवेत त्यांनी श्रीमंत गरीब असा भेद कधीच केला नाही. वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिखरावर असूनही त्याचे पाय कायम जमिनीवर होते, अशी भावना त्यांचे शालेय जीवनातील शिक्षक मिनानाथ उपाध्ये यांनी व्यक्त केली आहे.

निष्णांत हृदयरोग तज्ञ गमावला – मुख्यमंत्री सावंत

डॉ. मंजुनाथ देसाई यांच्या निधनामुळे गोव्याने एक उत्कृष्ट हृदयरोगतज्ञ गमावल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी  आपल्या वैद्यकीय सेवेतून हजारो रुग्णांचे प्राण वाचविले. हे दुःख पेलण्याची ताकद त्याच्या कुटुंबियांना मिळो, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी व्टिटरवर पाठविला आहे.

देवदूत काळाच्या पडद्याआड – दिगंबर कामत

डॉ. मंजुनाथ देसाई यांच्या निधनामुळे गोव्यातील एक देवदूत हरपला आहे. त्यांचा अकाली मृत्यू ही धक्कादायक घटना आहे. त्यांनी दिलेली सेवा गोमंतकीय जनतेच्या कायम स्मरणात राहणार आहे, अशी भावना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली.

सर्वांगसुंदर असा व्यक्तिमत्त्व हरपला – आरोग्यमंत्री

डॉ. मंजुनाथ देसाई यांची मृत्यू ही धक्कादायक घटना आहे. त्यांच्या जाण्याने केवळ गोमेकॉचेच नव्हे, तसे स्वतः आपले वैयक्तिक नुकसान झाले आहे. अंतरबाह्य़ सर्वांगसुंदर असे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेतून असंख्य लोकांचे प्राण वाचविले, अशा भावना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केल्या.

Related Stories

चिंचोळे येथे सांडपाणी प्रवाहित वाहिनी फूटून सर्वत्र दुर्गंधी

Amit Kulkarni

रस्ता रुंदीकरणाला खोर्ली भोम नागरिकांचा विरोध

Amit Kulkarni

गोव्यातील ड्रग्स व्यवसाय सरकारने पूर्णपणे बंद करावा

Amit Kulkarni

लसीकरणाचे ’ड्राय रन’ यशस्वी

Patil_p

कुडचडेवासियांच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय हवा : फर्नांडिस

Amit Kulkarni

दुसऱया मजल्यावर अडकलेल्या बैलाला वाळपई अग्निशामक दलाकडून जीवदान

Amit Kulkarni