Tarun Bharat

गोमेकॉत औषधे खरेदीत 250 कोटींचा घोटाळा

दहापटीने ज्यादा दराने औषध खरेदी : वेलनेसचे व पिनेकलचा संचालक एकच.शैलेंद्र वेलिंगकर यांचा आरोप.गोमेकॉतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश  

प्रतिनिधी /पणजी

गोमेकॉतील औषधे खरेदी प्रकरणात सर्व नियमांना पध्दतशीरपणे बगल देऊन 250 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप गोवा शिवसेना उपाध्यक्ष शैलेंद्र वेलिंकर यांनी केला आहे. भाजप सरकारातील मंत्री तसेच गोमेकॉतील अधिकारी या प्रकरणात गुंतलेले आहेत. आपल्याकडे सबळ पुरावे असून न्यायालयाची दारे ठोठावणार असून पंतप्रधान, राष्ट्रपती व राज्यपालांनाही पत्राद्वारे कळविणार असल्याचा इशाराही वेलिंगकर यांनी दिला आहे. नोकर भरती घोटाळ्यानंतर हा दुसरा घोटाळा उघड झाला असून भाजप सरकारने घोटाळ्यांचा कळस केल्याचेही ते म्हणाले.

पणजीतील सिध्दार्थ बांदोडकर सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत सुनील सांतीनेझकर व अन्य उपस्थित होते. गोमेकॉसाठी औषधे खरेदी करण्यासाठी सोपस्कर पूर्ण कराताना गोमेकॉच्या अधिकाऱयांच्या सह्या लागतात अधिकाऱयांवर दबाव आणून सारा काळाबाजार करण्यास त्यांना भाग पाडले जाते, असेही वेलिंगकर यांनी सांगितले.

दहापटीने ज्यादा दराने औषध खरेदी

गोमेकॉत मोठय़ा प्रमाणात औषधे खरेदी करण्यासाठी 6 ऑगस्ट 2018 रोजी निविदा मागवण्यात आली होती. त्याची मुदत फेब्रुवारी 2022 पर्यंत होती. निविदा आल्यानंतर सर्व सोपस्कर पूर्ण करण्यात आले. नंतर एक वर्षभर औषधे खरेदी केलीच नाही. नंतर पुन्हा लघु निविदा मागविण्यात आली. त्यात पिनेकल या वितरकाला मान्यता देण्यात आली. नंतर औषधांची तातडीने गरज असल्याचे भासवून पिनेकल कंपनी औषधांचा पुरवठा करू शकत नाही, त्यामुळे औषधांची स्थानिक खरेदी करणे गरजेचे आहे असे चित्र उभे करून वेलनेस फार्मासीकडून दहापटीने जास्त पैसे देऊन औषधे खरेदी करण्यात आली.

वेलनेसचे व पिनेकलचा संचालक एकच

वास्तविक वेलनेस फार्मासी आणि पिनेकल कंपनीचा संचालक एकच आहे. त्यामुळे पिनेकल कंपनी निविदामध्ये दिलेल्या दरात औषधांचा पुरवठा करू शकली असती मात्र कोटय़वधी रुपयांचा घोटाळा करण्यासाठी सर्व नाटके करण्यात आल्याचा आरोप वेलिंगकर यांनी केला.

असा आहे गोमेकॉतील औषध घोटाळा

केवळ 131 रुपये किमंतीचे एक इंजेक्शन 2 हजार रुपये प्रमाणे 100 इंजेक्शनाची खरेदी करण्यात आली आहे. 7 रुपये 70 पैशांचे इंजेक्शन 78 रुपयांत खरेदी करण्यात आले. 13,000 रुपये किमंतीचे 36 हजार रुपये प्रमाणे 100 इंजेक्शनांची खरेदी करण्यात आली आहे. 16 किमंतीच्या इंजेक्शनांची 145 रुपयांत खरेदी करण्यात आली आहे अशा प्रकारे कोटय़वधी रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली आहेत. वेलनेस फार्मासीला हाताशी धरून कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला जात असल्याचे ते म्हणाले.

गोमेकॉत तसेच राज्यात असलेल्या ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रात रुग्णांना मोफत औषधे दिली जातात. ही औषधे खरेदी करण्यासाठी निविदा मागवून ज्याची किंमत कमी असते त्याच्याकडून औषधे खरेदी करणे हा सरळ सोपा नियम आहे. निविदा सादर करऱयांना काही नियम आणि अटी असतात. त्याच्यातील एक अट म्हणजे निविदा सादर करणाऱया कंपनीची किंवा ठेकेदारांची तीन वर्षाची उलाढाल अगोदर 3 कोटीपेक्षा जास्त असावी अशी अट होती, ती आता 8 कोटीपेक्षा जास्त असावी असा बदल करण्यात आला असल्याने अनेक स्थानिक औषधे वितरकांना निविदा सादर करणे शक्य होत नाही. हा जो बदल करण्यात आला आहे तो सुध्दा वेलनेस फार्मासीच्या भल्यासाठीच की काय असा संशय निर्माण होत असल्याचेही शैलेंद्र म्हणाले.

Related Stories

गुरुवारी 215 कोरोना पॉझिटिव्ह, 221 कोरोनामुक्त

Patil_p

दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकाला महामार्गावर मारहाण, चौघांना अटक

Amit Kulkarni

दक्षिण रेल्वेच्या तब्बल 19 गाड्या जवळपास एक महिना रद्द

Amit Kulkarni

माडेल – साळावली येथील पर्यटनस्थळाच्या मुख्य फाटकाला टाळे

Omkar B

माशेल देवकीकृष्ण लक्ष्मी रवळनाथ संस्थानचा 7 पासून नवरात्रोत्सव

Amit Kulkarni

केपे तालुक्यात 40 हेक्टरहून जास्त क्षेत्रात मिरची लागवड

Patil_p