Tarun Bharat

गोवा डेअरीच्या एमडीचा मनमानी कारभार; त्रिसदस्यीय समिती हतबल

Advertisements

पशुखाद्य प्रकल्प अनिश्चित काळासाठी बंदावस्थेत : एमडीच्या भूमिकेमुळे दूध उत्पादक गेंधळले,गोवा डेअरीची वार्षिक आमसभा सप्टेबरपूर्वी- दुर्गेश शिरोडकर

प्रतिनिधी /फोंडा

गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजे गोवा डेअरीचा मारवासडा उसगांव येथील पशुखाद्य प्रकल्प  रविवार 1 ऑगस्ट पासून का बंद आहे? याबाबत व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल फडते समर्पक उत्तरे देऊ न शकल्यामुळे दुध उत्पादकामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. एमडी च्या मनमानी कारभारामुळे दुध उत्पादकांमध्ये दिवसेंदिवस संताप वाढू लागला आहे. त्याच्याविरोधात सखोल चौकशी करावी या पवित्र्यात दुध उत्पादक आहेत.

गोवा डेअरीवर सद्यपरिस्थितीत कार्यरत असलेली त्रिसदस्यीय समितीने पशुखाद्य प्रकल्प का बंदावस्थेत यासंबंधी एमडी फडते यांच्याकडे चौकशी मागितली आहे. गोवा डेअरीची वार्षिक आमसभा येत्या सप्टेबरपुर्वी होणार असल्याची माहिती अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी दिली.

   पशुखाद्य प्रकल्प का बंदावस्थेत कारण गुलदस्यात

   गोवा डेअरीत एमडी डॉ. अनिल फडते प्रचंड मनमानी कारभार चालविलेला असून दुध उत्पादकांना सहकार्य न करणे, उडवाउडवीची उत्तरे देण्याचे सत्र चालविलेले आहे त्यामुळेच दुध उत्पादकांमध्ये दिवसेंदिवस संताप व्यक्त होत आहे. या मननानी कारभारामुळेच गोवा डेअरीला जोडलेला दुध उत्पादकही दुरावत चाललेला आहे. पशुखाद्य प्रकल्प नेमका कोणत्या कारणासाठी बंद पडला याबाबत दुध उत्पादकांना अंधारात ठेवले जात आहे. पशुखाद्य प्रकल्प कधी सुरू होणार याबबतही अनिश्चितता व्यक्त केली असून दुध उत्पादकांना सभ्रमात ठेवण्याचे प्रकार एमडीतर्फे करण्यात येत आहे.

 एमडी ठरतोय त्रिसदस्यीय समितीला वरचढ

एमडी फडते यांनी पशुखाद्य प्रकल्प बंदावस्थेमागील नेमके कारण सांगण्यात टाळाटाळ केली. पशुखाद्याअभावी दुध उत्पादकांना होणाऱया नुकसानीचेही कोणतेच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. सदर प्रकल्प डागडुजी करतानाही पशुखाद्याचा पुरक साठा दुध उत्पादकांसाठी निर्मिती करून ठेवण्याचीही तसदी एमडीने ठेवलेली नाही. प्रकल्पातील कॉटन सिड एक्सट्रेट कच्चा माल संपल्याची माहितीच नसल्याने सदर प्रसंग उद्भवलेला आहे. या प्रकल्पात एकूण 49 कायमस्वरूपी कामगार काम करीत असून त्याच्या वेतनाचा भार गोवा डेअरीच्या नफा-तोटय़ावर होणार असून सर्व नुकसानी दुध उत्पादकांच्या माथी मारली जाणार आहे. दुध उत्पादकांच्या मेहनतीवर उभ्या असलेल्या गोवा डेअरीवर फडते यांनी केवळ दिवसभर एसी कॅबिनमध्ये बसून मनमानी कारभार चालविल्याचा आरोप काही दुध उत्पादकांनी केला आहे. 

यावेळी बोलताना डेअरीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर म्हणाले की दुध उत्पादक हा  गोवा डेअरीचा कणा आहे. एमडीतर्फे दुध उत्पादकांना देण्यात येणाऱया  वागणूकीसंबंधी कारवाईचे संकेत समितीने दिले आहे.

 गोवा डेअरीचे वार्षिक आमसभा सप्टेबरपुर्वी होणार

दुध उत्पादकांनी केलेल्या विविध आरोपावर स्पष्टीकरण देताना शिरोडकर म्हणाले की कोरोना काळापुर्वी 8-10 वर्षापासून कंत्राटीपद्धतीवर काम करणाऱया कामगारांना कायम करण्यात आलेले आहे. नवीन कामगारांना रूजू करण्यात आलेले नाही. डेअरीची आमसभा येत्या सप्टेबरपुर्वी घेण्यात येईल. खास आमसभा बोलाविण्यासाठी  कोविड सावटाची भीती असून सरकारच्या कोरोना मार्गदर्शक तत्वानुसार सद्यपरिस्थितीत केवळ 100 जणांच्या बैठकीची परवानगी दिलेली आहे. अशा परिस्थितीत गोवा डेअरीचे 174 सोसायटी सभासद त्यानंतर खाते प्रमुख व इतर कर्मचारी मिळून सदर आकडा 200 हून जास्त होतो असे स्पष्टीकरण दिले. आमसभेला रू 6 लाखाहून जास्त खर्च अपेक्षित असल्यामुळे खास आमसभेऐवजी सप्टेबर महिन्यापुर्वी वार्षिक आमसभा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्रिसदस्यीय समितीचा कार्यकाळ येत्या चार महिन्यात संपुष्टात येत असल्यामुळे नवीन अधिकाऱयाला ही जबाबदारी सोपविण्याऐवजी बढतीनंतरही सहाय्यक निबंधक अवित नाईक यांची आपल्या विनंतीनंतर नियुक्ती करण्यात आल्याचे शिरोडकर म्हणाले. खास आमसभेची मागणी करणाऱया सोसायटी सदस्यांनी निव्वळ लेखी निवेदनानुसार आमसभेची मागणी गाहय़ नसून त्यांनी सोसायटी सदस्याच्या बैठकीतील ठरावाची प्रत निवेदनासोबत जोडली नसल्याचा टपका ठेवलेला आहे. 

महापुरामुळे दुध उत्पादक नुकसानग्रस्त

कोविड महामारीतून सावरणारा दुध उत्पादक महापुराच्या तडाख्यामुळे जबरदस्त नुकसानीला सामोरे जावे लागले. गोवा डेअरी संलग्न असलेल्या दुध उत्पादकांच्या एकूण सुमारे 37 गायी दगावल्या. वाळपई येथील जॉरोन, धारबांदोडा येथील नाडकर्णी नामक दुध उत्पादकाच्या गायी आणि गोठय़ाची अन्य दोघां दुध उत्पादकांची हानी झालेली आहे. नुकसानग्रस्त दुध उत्पादकांना सरकारतर्फे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. डेअरीतील दोन कामगारांचा कोविडमुळे जीव गमावावा लागला. या विषयावरही येत्या आमसभेतून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दुर्गेश शिरोडकर यांनी दिली.  

Related Stories

राज्यात 8 डिसेंबरपासून पावसाची शक्यता

Amit Kulkarni

अपहरणकर्ते बारा तासांत गजाआड

Omkar B

कोरोनाच्या 9 रुग्णांना डिस्चार्ज

Omkar B

माजी आरोग्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर

Omkar B

फोंडा नगराध्यक्षपदासाठी मगो-भाजपात मोर्चेबांधणी

Patil_p

कॅसिनोंसह किनारपट्टीत 144 चा फज्जा

Amit Kulkarni
error: Content is protected !!