Tarun Bharat

गोवा राज्याची स्वंयपूर्णतेकडे वाटचाल- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सरकार तुमच्या दारीव्दारे राज्यातील अर्ध्याहून अधिक जनतेशी संपर्क, जनता अडचणी दूर करण्यास यश

वार्ताहर /झुआरीनगर

सरकार तुमच्या दारी या उपक्रमाव्दारे सरकार राज्यातील अर्ध्याहून अधिक लोकांकडे पोहोचलेले असून जनतेच्या अडचणी दूर करण्यास यश आलेले आहे. विरोधकांना या उपक्रमात येणारी निवडणुक दिसत आहे. मात्र, भाजपाला देश, राज्य व जनता प्रथम आहे. स्वार्थ नव्हे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारच्या प्रयत्नांमुळे गोवा राज्य स्वंयपूर्णतेकडे वाटचाल करू लागलेले आहे. या कार्यात सरकारला यश येत आहे असे प्रतिपादन मुरगाव तालुक्यासाठी घेण्यात आलेल्या सरकार तुमच्या दारी या उपक्रमात केले.

झुआरीनगरातील एमईएस महाविद्यालय तसेच त्यांच्या आवारात सरकार तुमच्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन काल शुक्रवारी करण्यात आले. या उपक्रमाला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला. सरकारच्या जवळपास सर्वच खात्यांची दालने या उपक्रमात थाटण्यात आली होती. अधिकाऱयांसह जवळपास साडे तीनशे शासकीय कर्मचारी या सेवेत सहभागी झाले होते. संध्याकाळपर्यंत लोकांनी मोठय़ा संख्येने अधिकाऱयांशी संपर्क साधून आपल्या अडचणी दूर केल्या. सकाळी 10 वा. उद्घाटनाचा खास कार्यक्रम एमईएसच्या आवारातील मंडपात पार पडला. यावेळी व्यासपीठावर वाहतुक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा, आमदार एलिना साल्ढाना, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रूचिता कटीयाल व मान्यवर उपस्थित होते.

तीन महिन्यात विविध योजना अधिक गतीने लोकांपर्यंत पोहोचवणार

यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला मार्गदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सरकार तुमच्या दारी या उपकमाला निवडणुकीच्या नजरेतून पाहणाऱया विरोधी नेते व राजकीय पक्षांवर टीका केली व आव्हानही दिले. मुख्यमंत्री म्हणाले की देशाच्या आझादी का अमृत महोत्सवानिमित्त खास जनतेसाठी व जनतेपर्यंत पाहोचण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून भाजपा स्वार्थाला नव्हे तर देश, राज्य आणि जनता यांनाच अधिक प्राधान्य देत आहे. मागच्या सरकारने कोणत्या योजना आाणल्या आणि त्या यशस्वी केल्या हे दाखवून द्यावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी दिले. सरकार आतापर्यंत अर्ध्याअधीक लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱया पन्नास टक्के जनतेची कामे त्वरीत हातावेगळी झालेली असून काही तांत्रीक समस्या असलेल्या लोकांची कामे पुढील दोन तीन दिवसांत पूर्ण होणार आहेत. या उपक्रमांव्दारे लोकांना मार्गदर्शनही मिळत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. आपण या उपक्रमाचा आढावा घेत आहे. सेवा आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. लोकांनी याचा लाभ घ्यायला हवा. पुढील तीन महिन्यात सरकार अन्य विविध योजना लोकांपर्यंत अधिक गतीने पोहोचवणार आहे.

जनतेच्या सहकार्यानेच स्वंयपूर्णतेचे ध्येय साकार करू

गोव्याला स्वंयपूर्ण बनवण्याचे ध्येय सरकारने वर्षभरापूर्वी जाहीर केले होते. हे ध्येय गाठण्यासाठी सरकारला यश येत आहे. गोवा स्वंयपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे. कोरोना काळामुळे राज्याला एक प्रकारची शिकवण मिळाले. त्यामुळे इतर राज्यांवर अवलंबून राहू लागू नये यासाठी गोवा स्वंयपूर्ण बनू लागलेला आहे. पालेभाज्यांची निर्यात आता गोव्यातून होऊ लागलेली आहे. स्वंयपूर्ण गोव्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी लोकांचेही सहकार्य महत्वाचे आहे. लोकांच्या सहकार्याने पुन्हा सत्तेवर येऊन स्वंयपूर्ण राज्याचे ध्येय पूर्णपणे यशस्वी करू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी विरोधी पक्षनेते आमदार दिगंबर कामत व मगोचे आमदार सुदीन ढवळीकर यांच्यावरही त्यांनी टीका केली.

हिंसा हीच संस्कृती असलेल्या पक्षाचा गोव्यात प्रवेश, जनतेने सावध राहावे – मंत्री माविन गुदिन्हो

वाहतुक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी बोलताना निवडणुकीच्या निमित्ताने हिंसा माजवणाऱया शक्ती गोव्यात प्रवेश करू लागलेल्या असून गोव्यातील जनतेने सावध राहावे असा गंभीर सल्ला दिला. मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, निवडणुकांमुळे अळंब्याप्रमाणे पक्ष उगवू लागलेले असून ज्यांची संस्कृतीच हिंसक आहे असा राजकीय पक्षही गोव्यात प्रवेशकर्ता झालेला आहे. निवडणुकांमध्ये गोव्यात कधी हिंसेचा प्रकार घडलेला नाही. कुणी कधी कुणाचा जीव घेतलेला नाही. गोव्याची जनता असा विचार करूच शकत नाही. गोवा शांतता प्रीय आहे. त्यांना खून खराबा आवडत नाही. मात्र, परराज्यातून दहा हजार माणसे गोव्यात आणू पाहणारा पक्ष गोव्यात गोवेकरांना हिंसेचे धडे देणार आहे काय असा प्रश्न त्यांना लोकांनी विचारायला हवा. अशा हिंसक प्रवृतीच्या राजकीय पक्षापासून गोमंतकीयांनी दूर राहावे असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले. सरकार तुमच्या दारी या उपक्रमाविषयी बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की सरकार जनतेसाठीच कार्य करीत आलेले आहे. मात्र, कोवीड काळात सरकारच्या गतीमान सेवेत थोडा खंड पडला होता. या उपक्रमाव्दारे तो खंडसुध्दा भरून येणार आहे. सरकार कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी जागरूक आहे. सरकारची प्रगती लोकांसमोर आहे तसेच केंद्र सरकारचे कार्यही जगासमोर आहे. भाजपाच्या विकासामागे कार्यकर्त्यांचे बळ सर्वाधिक आहे. यशाचे श्रेय त्यानाच जाते असे मंत्री म्हणाले.

नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी यावेळी बोलताना सरकार तुमच्या दारी हा उपक्रम म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही एक शिकवण आहे. लोकांची कामे करण्यासाठी त्यांना या उपक्रमाचा लाभ होईल. एकाच दिवसांत सर्व कामे होणे शक्य नाही. तशी कल्पना कुणी करूच नये. मात्र, लोकांची कामे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी असेच क्रियाशील राहावे. या उपक्रमाला गोवाभर चांगला प्रतिसाद लाभत आहे असे मंत्री मिलिंद नाईक म्हणाले. प्रारंभी सांकवाळचे पंच नारायण नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोविड बळींच्या कुटुंबियांना धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच किसान कार्ड वितरीत करण्यात आले व ज्येष्ठ नागरिकांना सन्मानीत करण्यात आले. मुरगावच्या उपनगराध्यक्ष श्रध्दा महाले यांनी सुत्रसंचालन केले.

Related Stories

केंदीय आदिवासी कल्याणमंत्री मुंडा लोकोत्सवास उपस्थित राहणार

Amit Kulkarni

आजपासून श्री दामोदर भजनी सप्ताह

Amit Kulkarni

दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकाला महामार्गावर मारहाण, चौघांना अटक

Amit Kulkarni

शिरोडवाडी मुळगाव येथील हायस्कूल विलीनीकरणास विरोध

Amit Kulkarni

सर्वांनी संघटीतपणे काम केल्यास ओबीसीचा विकास

Amit Kulkarni

वीज बिलात 12 टक्के दर वाढीचा प्रस्ताव

Amit Kulkarni