आमदार नीतेश राणे यांचे आव्हान : पालकमंत्री खोटे बोलताहेत!
वार्ताहर / कणकवली:
गोवा येथे स्वॅब नमुने तपासणी करून देण्यास गोवा सरकारने मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच दिली होती. पण अशा मान्यतेचे पालकमंत्री किंवा प्रशासनाकडे पत्र आहे का? स्वॅब टेस्टसाठी दोन ते अडिच हजाराचा खर्च गोवा सरकार की सिंधुदुर्ग प्रशासन करणार? ही माहिती जिल्हावासीयांसमोर पालकमंत्र्यांनी जाहीर करावी, असे आव्हान आमदार नीतेश राणे यांनी दिले आहे.
राणे यांनी म्हटले आहे, पत्रादेवी येथे गोव्याच्या अधिकाऱयांशी बैठक झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेत, यापुढे सिंधुदुर्गात बाहेरून आलेल्या लोकांचे कोरोना स्वॅब नमुने गोव्यात तपासणी होणार व त्याचा अहवाल सात तासात येणार. मात्र, याबाबत पालकमंत्र्यांकडे कुठले पत्र आहे, की त्यामुळे जिल्हावासियांची खात्री पटेल. गोव्याच्या अधिकाऱयांसोबत जी बैठक झाली, त्यात केवळ सरकारला याबाबत कळवतो, असे त्या अधिकाऱयांनी सांगितले. मात्र, पालकमंत्र्यांनी जिल्हय़ात येऊन स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यास गोवा सरकारने मान्यता दिल्याचे सांगितले. त्यामुळे शासन हे कागदावर चालत असताना असे पत्र असेल, तर ते पालकमंत्र्यांनी जिल्हावासियांसमोर सादर करावे. खोटे बोलू नये.