Tarun Bharat

गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला ‘बुस्टर’ची गरज

Advertisements

कोरोना महामारीमुळे मागील दीड वर्ष राज्यातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. पर्यटन क्षेत्रात सध्या ज्या हालचाली सुरु आहेत, त्यावरुन यंदाच्या हंगामापासून त्याला चालना मिळेल, अशी आशा या क्षेत्रावर अवलंबून असलेला प्रत्येक व्यवसायिक घटक बाळगून आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका जगभरातील पर्यटनाला बसला.

गोव्याला त्याची जरा अधिकच झळ बसली, कारण राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा पर्यटन क्षेत्राकडून उचलला जातो. खाण बंदीनंतर पर्यटन उद्योग हाच भक्कम आर्थिक स्रोत होता, जो कोरोनाच्या तडाख्यात आटला गेला. या व्यवसायावर अवलंबून असलेले अनेक छोटे मोठे घटक पुन्हा पर्यटन सुरु होण्याकडे डोळा लावून बसले आहेत.

राज्य सरकारने गेल्या आठवडय़ापासून कॅसिनो, पब व पर्यटकांना आकर्षित करणाऱया अन्य काही व्यवसायांना 50 टक्के मर्यादा घालून खुले करण्याची परवानगी दिली आहे. जगभरातील पर्यटकांना राज्यात व देशात भटकंतीची सोय करणाऱया काही पर्यटन कंपन्यांनी ऑक्टोबरपासून सेवा सुरु करण्याचे बेत आखले आहेत. कोरोना महामारीचा प्रभाव कायम असला तरी सुरक्षेच्या उपाययोजना आखून व पर्यटकांना चांगल्या सेवेची हमी देऊन काही राष्ट्रांनी सध्या पर्यटनाला सुरुवात केलेली दिसते. तशा जाहिराती विविध माध्यमातून झळकतात. गोव्यातील पर्यटन क्षेत्राला कोरोनोत्तर नव्याने सुरुवात करताना काही नवीन बदल स्वीकारावे लागणार आहेत. हॉटेल व्यवसाय, वाहतुकदारांना त्याचे प्रशिक्षण व सवय लावून घ्यावी लागेल. पर्यटनासंबंधी आगाऊ नोंदणी व अन्य व्यवहार करतानाच ऑनलाईन सेवांवर अधिक भर द्यावा लागणार आहे. गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ असून जगभरातील विदेशी पर्यटकांची चार्टड विमाने प्रथम गोव्यात उतरतात. 8 ते 10 दिवसांच्या पर्यटनासाठी येणाऱया विविध राष्ट्रांतील पर्यटकांचे पहिले स्वागत गोव्यात होते. त्यामुळे गोव्याला सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्क राहावे लागणार आहे.

गोव्यात पर्यटन संस्कृती रुजली व बहरली ती विदेशी विशेषतः युरोपियन लोकांमुळे. साधारण ऐंशीच्या काळात येथे पर्यटन रुजायला सुरुवात झाली. जगभर भटके म्हणून ओळखले जाणारे ‘हिप्पी’ हे गोव्यात उतरलेले पहिले विदेशी पर्यटक. पुढे जर्मन, इंग्लीश व इतर युरोपियन पर्यटकांची संख्या वाढली. गोवा म्हणजे बीच पर्यटन ही संकल्पना येथूनच रुजली. आज रशियन सोडल्यास  किनारी पर्यटनाकडे इतर विदेशी लोकांचा वावर कमी झाला आहे. पर्यटनाच्या नावाखाली मौजमस्ती व चंगळवादात रमलेल्या देशी तरुणवर्गाला हे किनारे आता अधिक आकर्षित करतात मात्र त्याला निखळ व परिपूर्ण पर्यटन म्हणणे धाडसाचे होईल.

गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाची व्याख्या बदलली असून त्याला विविध आयाम प्राप्त झाले आहेत. गोव्याचे हे सृष्टीसौंदर्य,  येथील ग्रामीण संस्कृती, ऐतिहासिक स्थळे या सर्व गोष्टी पर्यटनाच्या प्रवाहात येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात सुरु झालेल्या स्पाईस फार्मनी गोव्यात निसर्ग व ग्रामीण पर्यटन चांगल्यापैकी रुजू शकते हे दाखवून दिले आहे. पर्यटन विकास महामंडळाने आजवर या गोष्टींकडे फारसे गांभीर्याने लक्ष घातलेले नाही. कुठल्याही पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यासाठी त्याला पूरक साधनसुविधा, जलद वाहतुकीची साधने व तत्पर सेवा उपलब्ध कराव्या लागतात. सतत नवनवीन संकल्पना व दर्जेदार सेवा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. दूधसागर धबधबा हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. याच परिसरात असलेले बोंडला प्राणी संग्रहालय किंवा अन्य काही दुर्लक्षीत स्थळांचा पर्यटनीयदृष्टय़ा सुनियोजित विकास साधल्यास गोव्यात उतरणाऱया पर्यटकांना व पर्यावरणप्रेमींना ती प्रेक्षणीय स्थळे ठरू शकतात. राज्यात एकूण सात अभयारण्ये, एक-दोन पर्वत शिखरे तसेच बऱयाच प्राचीन वास्तू आहेत. सरकारने या गोष्टींचा पर्यटनीय विकासाच्या दृष्टीने कधीच विचार केलेला नाही. एकेकाळी पावसाळी हंगामात गोव्यात पर्यटनीय ऑफ सिझन पाळला जायचा. ग्रामीण पर्यटनामुळे वर्षभरातील 365 दिवस गोव्यात येण्यासाठी देशी पर्यटकांचा कल वाढला. या पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळाली व टय़ुरिस्ट टॅक्सिंना वर्षभर व्यवसाय मिळाला.

कोरोना महामारीने पर्यटन क्षेत्राला एक मोठा धडा दिलेला आहे. या संकटातून सावरताना नवीन संधी शोधण्याचा मार्गही दाखवलेला आहे. त्यासाठी पर्यटन विकास व सुनियोजित विस्तार करण्यासाठी ठोस धोरण आखावे लागेल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्या प्रत्येक जाहीर कार्यक्रमात स्वयंपूर्णतेची घोषणा करतात. ग्रामीण भागातील प्रत्येक घटक भाजी उत्पादनापासून मत्स्योत्पादनापर्यंत सर्वच व्यवसाय क्षेत्रात स्वावलंबी व्हावा यासाठी ही योजना आहे. गोव्याला रोजगार व महसूल देणारे औद्योगिक क्षेत्र याठिकाणी वाढू शकले नाही. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल व दळणवळणाच्या सुविधांची कमतरता ही त्यांची मोठी अडचण आहे. मात्र पर्यटन उद्योगासाठी गोव्याला अनेक गोष्टी पुरक आहेत.

कोरोना महामारीच्या संक्रमणापूर्वी दरवर्षी साधारण 6 ते 7 लाख विदेशी पर्यटक गोव्यात उतरायचे. त्यापैकी बरेच इतर राज्याकडे वळायचे. अशा पर्यटकांसाठी चांगली पेक्षणीय स्थळे गोव्यातच तयार केली गेल्यास हा पर्यटक गोव्यात रमू शकेल. त्यासाठी पर्यटन व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागेल. नव्याने सत्तेवर येणाऱया सरकारपुढे अर्थकारणाला गती देण्याचे मोठे आव्हान असून पर्यटन उद्योगाला या संक्रमणातून बाहेर काढण्यासाठी ‘बुस्टर’ देण्याची खऱया अर्थाने गरज आहे.

सदानंद सतरकर

Related Stories

मेळाव्याचे आव्हान देऊन मुख्यमंत्री शिंदे फसले!

Patil_p

नवी पहाट

Patil_p

मुक्त स्वानंदातच रमलेला असतो

Patil_p

मनाला ताब्यात कसे ठेवावे

Patil_p

कोरोनानंतरचे बदलते काम आणि कामगिरी!

Patil_p

विज्ञानाला भारताचे योगदान…

Patil_p
error: Content is protected !!