Tarun Bharat

गोव्याच्या समृद्धीसाठी भाजपाला हॅट्ट्रिकची संधी द्या : जे. पी.नड्डा

Advertisements

शिरोडा येथील जाहीर सभेत समर्थकांना आवाहन

प्रतिनिधी /शिरोडा

भाजपा म्हणजे विकास आणि गोव्यात ही विकासाची गती कायम ठेवण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारला गोव्यात ‘डबल इंजिन’ची जोड द्या. ज्यांनी यापूर्वी वाईट दिवस पाहिले होते, त्यांना अच्छे दिनाचे महत्त्व पटले आहे. गोव्याची समृद्धी, संस्कृती व प्रगती वृद्धिंगत होण्यासाठी भाजपाशिवाय अन्य विचार करु नका, भाजपला विजयाच्या हॅट्ट्रिकची संधी द्या, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिरोडा येथील जाहीर सभेत बोलताना केले.

 नड्डा हे सध्या तीन दिवसांच्या गोवा भेटीवर असून काल मंगळवारी त्यांचे गोव्यात आगमन झाले. सायंकाळी शिरोडा भाजपातर्फे बाजार शिरोडा येथे आयोजित केलेल्या सभेला त्यांनी संबोधीत केले.

 मोदी सरकारकडून गोव्याला सदैव प्रोत्साहन

 तब्बल साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांच्या राजसत्तेखाली राहूनही गोमंतकीयांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली. गोवा सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा विकसित व्हावा हे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. त्यांचे अपूर्ण राहिलेले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार गोवा सरकारला नेहमीच प्रोत्साहन देत आहे. भाजपाला गोमंतकीयांनी सदैव प्रेम व आशिर्वाद दिले. त्याची पोचपावती म्हणून अटल सेतू, जुवारी पूल, महामार्गांचे जाळे आदी विकासाच्या प्रकल्पांतून दिलेली आहे, असे नड्डा पुढे म्हणाले.

 सुभाष, रवी नाईक यांची सरकारला गरज

 भाजपाकडे प्रगतीपुस्तक मागणाऱया विरोधकांचे तोंड विकासकामाच्या माध्यमातून मोदी सरकारने बंद केले आहे, अशी टिकाही त्यांनी केली. भाजपा केवळ भौतिक विकास साधत नसून महिला, युवा व समाजातील प्रत्येक घटकाला डोळय़ांसमोर ठेऊन त्यांच्या उत्कर्षाच्या योजना सातत्याने राबवित आहे. राज्याचा चांगल्या पद्धतीने विकास व्हायचा असल्यास शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्यासारख्या नेत्यांची सरकारला गरज असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

 यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, भाजपाचे प्रदेश सरचिटणिस नरेंद्र सावईकर, दामू नाईक, शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, माजी मुख्यमंत्री रवी नाईक व शिरोडा भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 भौतिक विकासानंतर आता मानवी विकासावर भर ः मुख्यमंत्री

 भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर गोव्यात पायाभूत सुविधा, रस्ते, पूल या भौतिक विकासांवर भर दिला. प्रगतीचा पुढील टप्पा गाठताना मानवी विकास डोळय़ांसमोर ठेऊन आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण योजनेतंर्गत दशसुत्री कार्यक्रमावर भर दिला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. कॉग्रेस पक्षावर टीका करताना उमेदवारी मिळालेले आमदारही आता पक्ष सोडून चालले आहेत. तरीही विरोधी पक्षनेते पक्ष उभारणीची हास्यास्पद विधाने करीत आहेत. मगो-तृणमूल युती ही विसंगती असल्याचे ते म्हणाले.

बहुजन नेत्यांमुळे भाजपाची ताकद वाढली – श्रीपाद नाईक

  भाजपा हा समाजकारणाच्या पायावर उभा असलेला पक्ष असल्यानेच राजकारणात तो दीर्घकाळ टिकून आहे. गोव्यात बहुजन समाजातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. आम्ही टीकेला महत्त्व देत नसून विकासाला प्राधान्य देत असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले.

 भाजपा यंदा विजयाची हॅट्ट्रिक करणार असल्याचा विश्वास विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केला. शिरोडय़ात भाजपाचा विजय निश्चित असल्याचा दावा सदानंद तानावडे यांनी केला. गोव्याच्या विकासासाठी भाजपाला साथ देण्याचे आवाहन रवी नाईक यांनी केले. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याने विकासला तुटवडा राहणार नाही. शिरोडा मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारने रु. 100 कोटींचा निधी मंजूर केल्याची घोषणा करुन हा निधी रस्ते व इतर पायाभूत सुविधांवर खर्च होणार असल्याचे सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

  शिरोडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी शिरोडकर यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने भाजपा कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.

Related Stories

भाजप उमेदवारांची आज घोषणा

Amit Kulkarni

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणे महत्वाचे होते

Patil_p

भुईपाल येथील जीपगाडी–स्कुटर अपघातात एक गंभीर जखमी

Amit Kulkarni

उचगाव नेम्मदी केंद्रामधील भ्रष्टाचारामुळे गोरगरिबांची पिळवणूक

Patil_p

दुचाकी चोरी प्रकरणी दोघा संशयितांना अटक

Omkar B

कोरगाव पंचायत मंडळाची पाणी पुरवठा अभियंत्याशी चर्चा

Patil_p
error: Content is protected !!