हजारो युवकांची प्रतीक्षा संपता संपेना….
प्रतिनिधी / बांदा
केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गोवा राज्य सरकारने गोव्यात येणाऱ्यांसाठी गोव्याचे मार्ग खुले केलेत आहे. गेल्या पाच महिन्यानंतर आज गोवा राज्य सीमेवर असलेले सर्व तपासणी नाके हटविण्यात आले आहे. मात्र सिंधुदुर्ग सीमेवरील तपासणी नाक्यावर गोव्यातुन येणाऱ्यांची तपासणी केली जात असल्याने प्रवाश्यातून नाराजी व्यक्त होत आहे. तर गोवा राज्यांत सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग या तालुक्यातील हजारो युवक रोजगारासाठी जातात गोव्यातील सीमा खुल्या झाल्या नंतर त्यांना रोजगारांचा मार्ग खुला झाला होता मात्र सिंधुदुर्ग प्रशासनाने अद्याप गोव्यातून दररोज ये – जा करण्यासाठी ठोस निर्णय न घेतल्याने 5 महिन्यानंतर हि येथील हजारो युवकांचा रोजगाराचा प्रश्न जैसे थे आहे.
सद्यस्थितीत गोवा राज्य सरकारने मुखमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य सीमा खुल्या झाल्याचे जाहीर केल्यानंतर मध्यरात्री सीमेवरील पत्रादेवी तपासणी नाक्यावर असलेले तपासणी पथक, पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला असून कोणीही गोव्यात प्रवेश करू शकतो. मात्र सिंधुदुर्ग प्रशासनाने अद्याप कडक तपासणी सुरु ठेवली आहे. गोव्यातून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करून त्याला जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. आज मार्ग मोकळा झाल्याने गोव्यातील अनेक नातेवाईक सिंधुदुर्ग मध्ये येत आहेत मात्र प्रवेश न मिळत असल्याने त्यांना परतून जावे लागत असल्याने ते नाराजी व्यक्त करत आहेत.

