Tarun Bharat

गोव्यातील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर पडणार

फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी : कोरोनासह विविध कारणांमुळे आयोजनाची आशा संपुष्ठात

क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

गोव्यात येत्या ऑक्टोबर होणाऱया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. क्रीडामंत्री बाबू आजगांवकर तसेच सरकारी अधिकारी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सकारात्मक असले तरी सध्या गोव्यात वाढलेले कोरोनाचे रूग्ण, महामारीचे संकट, राज्याची आर्थिक परिस्थिती, रखडलेले साधनसामुग्रींचे काम आणि ठराविक वेळेत क्रीडा किट्स मिळविण्यात आलेल्या अपयशामुळे 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे कठीण असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य शासनाने यापूर्वीच इंडियन ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) एक पत्र पाठवून तशी कल्पनाही दिल्याचे समजते. गोव्यात या स्पर्धेचे आयोजन 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2020 या कालावधीत होणार होते. वास्तविक आयओएने गोव्याला या स्पर्धेचे आयोजन 2008 मध्ये बहाल केले होते. त्यानंतर कित्येक वेळा गोव्याने विविध कारणे देऊन स्पर्धा पुढे ढकलण्यातही यश मिळविले. आता तर कोरोनाचे एक भक्कम कारण पुढे आले असून आयओएसुद्धा नाही म्हणू शकणार नसल्याचे हे कारण असल्यामुळे ही स्पर्धा येत्या ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही स्थितीत होणार नाही हे ठरलेले आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात गोव्यात पावसाचा मोसम असतो. साधनसुविधांच्या कामात पावसाचा अडथळा असतोच. यामुळे आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याची केवळ औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे.

गोवा बॅडमिंटन संघटनेची बैठक

काल रविवारी पणजीत गोवा बॅडमिंटन संघटनेच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली. आम्ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार आहोत. बॅडमिंटन हा वैयक्तिक खेळ आहे. त्यास सहभागी खेळाडूंना कोर्टवर सोशल डिस्टन्सिंग लागत नाही. या विषयी सविस्तर लेखी पत्र आम्ही 1 मे रोजी राज्याचे गृह सचिव आणि क्रीडा सचिव यांना दिल्याचे बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे म्हणाले. क्रीडा क्षेत्र बंद करू नका. खेळामुळे किंवा सराव केल्याने इम्युनिटी आणि फिटनेसही वाढते व त्यामुळे क्रीडा संकुले नियम पाळून खुली करावीत, असे हेबळे म्हणाले.

स्पर्धा पुढे जाण्याची मानसिक तयारीही

सध्या राज्यातील दोन-तीन क्रीडा संघटना वगळता बहुतेक सर्व संघटना सध्या झोपी गेल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी त्यांच्या संघांची प्राथमिक तयारीही नाही. स्पर्धा पुढे जाणार असल्याची मानसिक तयारीही या राज्य क्रीडा संघटनांनी केली आहे. त्यामुळे आधीच का म्हणून घाम गाळायचा या निर्णयापर्यंत ते आले आहेत. शासनाची पहिल्यांदा तयारी पूर्ण होऊ दय़ा, त्यानंतर बघू, असा समजही काही क्रीडा संघटनांनी आता करून घेतला आहे.

सध्या कुशल आणि अकुशल मजूरांनी कोविडमुळे आपआपल्या गावांकडे पलायन केल्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी निर्माण होणारी साधनसुविधांची कामे बंद पडली आहेत. आयएओने गोव्याकडे प्रत्येक महिन्यात साधसुविधांबाबत अहवाल मागितला आहे. मात्र गोव्याने आयओएच्या मागणीनुसार अहवालही पाठविलेला नाही. यामुळे गेम्स तांत्रिक समितीचे चेअरमन मुकेश कुमार यांनी राज्य शासनाला कित्येक स्मरणपत्रेही पाठविली आहेत.

सर्व प्रकल्पाचे बांधकाम सध्या बंद

कांपाल येथील जलतरण तलाव, फातोर्डा येथील टेनिस कोर्ट, पेडे येथील हॉकी टर्फ मैदान, चिखलीतील स्क्वॉश कोर्ट आणि लॉन बॉल फॅसिलीटी या अपूर्णाअवस्थेत असलेल्या प्रकल्पांचा अहवाल गेम्स तांत्रिक समितीने मागितला आहे. मात्र सध्या काम बंद असल्याने शासन अहवाल पाठवू शकत नाहीत.

विविध क्रीडा साहित्याबाबतही गुंता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या विविध गेम्ससाठी आवश्यक असलेल्या खेळांच्या कीट्सबाबतही सध्या गुंता आहे. 9 क्रीडा प्रकारातील कीडा साहित्य वगळता उर्वरीत सर्व खेळांमधील कीट्सच्या ऑर्डरही विविध कारणामुळे प्रलंबित आहेत. एरव्ही मागील एप्रिल महिन्यापूर्वी सर्व खेळांतील क्रीडा साहित्य येणे आवश्यक होते. मात्र ते आणण्यातही शासन असफल ठरल्याचे गेम्स तांत्रिक समितीने चेअरमन मुकेश कुमार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. कोरोनापूर्वीच्या काळातील कामाचा वेग आणि आताची परिस्थिती पाहिली तर येत्या ऑक्टोबर महिन्यात राज्यात 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आल्यातच जमा आहे.

Related Stories

भ्रष्टाचाराविरोधी लढा स्वतःपासूनच!

Amit Kulkarni

सरसंघचालक मोहनजी भागवत आजपासून गोवा दौऱयावर

Amit Kulkarni

राज्यातील रस्ते दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करणार

Amit Kulkarni

दोन महिन्यानंतर कोरोनाचा एक बळी

Amit Kulkarni

वरूणापुरी ते हेडलॅण्ड सडापर्यंतच्या राष्ट्रीय चौपदरी महामार्गाचे उद्घाटन

Amit Kulkarni

पेडणेत होणाऱया गोमंतक मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषा मुलांमध्ये रुजवूया : दिपश्री सोपटे

Amit Kulkarni