Tarun Bharat

गोव्यात ‘ओमायक्रॉन’ पहिला रुग्ण सापडला

बाधित आठ वर्षीय मुलगा आला इंग्लंडमधून

प्रतिनिधी /पणजी

गोव्यात ‘ओमायक्रॉन’ या कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण सापडला असून तो 8 वर्षाचा मुलगा आहे. गोवा राज्य नाताळ व नववर्षाच्या धामधुमीत असताना हा रुग्ण सापडल्याने चिंतेत भर पडली असून खळबळ माजली आहे.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्वतः ही माहिती सोशल मिडीयावरून कळवली आहे. तो मुलगा 17 डिसेंबर रोजी युनायटेड किंगडम (युके) येथून गोव्यात आला होता आणि विमानतळावर त्याची चाचणी केली तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. त्यानंतर त्याचे नमुने ओमायक्रॉन तपासणीसाठी पुणे येथे पाठवले होते. तेथून अहवाल प्राप्त झाला असून तो ‘ओमायक्रॉन’ पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे, एसओपी यांचे पालन करून आणि सर्व ती काळजी घेऊन खबरदारी बाळगून राज्य सरकार परिस्थिती हाताळणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट पेले आहे.

बाधित मुलगा आला होता इंग्लंडमधून

परदेशातून येणाऱया सर्व प्रवाशांची दाबोळी विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात येत असून सतर्कता बाळगण्यात येत आहे. राज्य सरकारने 27 जणांचे नमुने ओमायक्रोन चाचणीसाठी पुणे येथे पाठवले होते. त्यातील काहीजणांचे अहवाल मिळाले असून त्यात इंग्लंडमधील हा 8 वर्षाचा मुलगा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह सापडला आहे. सध्या विविध राज्यात ओमायक्रॉन या कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा भितीचे वातावरण दिसून येत असून लोकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे व सामाजिक अंतर पाळणे हे सोडून देऊ नये तर त्याचे पालन कटाक्षाने करावे असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. सध्या गोव्यात लग्नाचा हंगाम तसेच नाताळ, नवीन वर्ष यामुळे मोठी गर्दी दिसून असून संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

तज्ञ समितीकडून महत्त्वाच्या शिफारसी

कोरोना व्यवस्थापनासाठी नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीने गोव्यात सापडलेल्या ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारच्या जलद कृती दलासाठी महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करणे, हॉटेलमधील सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करणे, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली आणि साप्ताहिक संसर्गाचा दर 3.5 टक्क्यांपेक्षा वाढला तर शाळा बंद करा, अशा सूचना तज्ञ समितीने केल्या आहेत.

हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना 50 टक्के क्षमतेने व्यवसाय करण्यास अनुमती द्यावी, मेळावे, विवाह सोहळे इतर समारंभात 50 टक्के लोकांना हजर राहाण्यास परवानगी असावी, कोरोना संसर्गाचा दर जर 3.5 टक्क्यांपेक्षा जास्त झाला तरच वरील सूचना अंमलात आणाव्या, असेही तज्ञ समितीने नमूद केले आहे.

जर कोरोना संसर्गाचा दर 7.5 टक्क्यापेक्षा वर गेला आणि सक्रिय रुग्ण संख्या 3 हजारपेक्षा जास्त झाली तर पर्यटन व्यवसाय पूर्णपणे करण्यात यावा. जर संसर्गाचा दर 15 टक्क्यापेक्षा जास्त झाला तर पूर्णपणे लॉकडाऊन करावे, असेही तज्ञ समितीने सूचवले आहे.

पुढील धोका टाळण्यासाठी या उपाययोजना आणि कठोर निर्बंध लादणे आवश्यक असल्याचे मत समितीने प्रकट केले असून हा अहवाल आता जलद कृती दलाकडे पाठवण्यात येणार आहे. तेथून तो अहवाल सरकार दरबारी पोहोचणार असून आता राज्य सरकारला त्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

मारिया मिरांडांचा राष्ट्रपतांच्या हस्ते गौरव

Amit Kulkarni

फोंडा जेसीआय धावण्याच्या शर्यतीत वर्धन, शुभम, ईशिका, शेफाली प्रथम

Amit Kulkarni

सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांची जोरदार मोर्चेबांधणी

Amit Kulkarni

फोंडय़ाच्या विकासाचा दहा कलमी कार्यक्रम

Amit Kulkarni

चोर्लातील हॉटमिक्सचे काम धिम्यागतीने प्रवासी वर्गाकडून नाराजी

Amit Kulkarni

पेन्ह द फ्रान्समधील अतिक्रमणावर कारवाई

tarunbharat