Tarun Bharat

गोव्यात कोळसा ‘हब’ होऊ दिला जाणार नाही

Advertisements

मडगावातील जाहीर सभेतून निर्धार, भाजप सरकारवर टीका

प्रतिनिधी/ मडगाव

राज्यातील भाजप सरकारने किती प्रयत्न करून गोव्याला कोळसा हब करण्याचा प्रयत्न केला तरी तो हाणून पाडला जाईल व गोवा भावी पिढीसाठी सुरक्षित ठेवला जाणार असल्याचा निर्धार काल शनिवारी मडगावच्या लोहिया मैदानावर झालेल्या जाहीर सभेतून देण्यात आला. ‘ओन्ली गोल से नो टू कोल’ या बॅनरखाली गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पुढाकाराने या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या जाहीर सभेतून सर्वच वक्त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. या जाहीर सभेला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन, माजी मुख्यमंत्री व आमदार प्रतापसिंह राणे, आमदार लुईझिन फालेरो, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, युवा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके इत्यादी उपस्थितीत होते.

गोव्याची वाट लावू देणार नाही

गोव्यातील जनतेने सरकारला चांगल्या गोष्टीसाठी निवडून दिले आहे. तरी सुद्धा कोळसा व मोले येथे प्रकल्प आणून सरकार गोव्याची वाट लावू पाहत आहे. हे आम्ही कदापि घडू देणार नाही. मग किती ही बलाढय़ व्यक्तीचा त्यात समावेश असला तरी चालेल. आम्ही गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशारा या सभेत प्रतापसिंह राणे यांनी दिला.

गोवा राज्य हे सुंदर आहे. आमच्या ज्येष्ठांनी आम्हाला स्वच्छ व चांगला गोवा दिलेला आहे. त्याचे जतन व संवर्धन व्हायला पाहिजे. आज कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. त्यात बलाढय़ व्यक्ती गुंतल्या असला तरी या गोष्टी होता कामा नये. सरकारने डोळे उघडे करून पहावे व त्वरित रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण रद्द करावे, असे श्री. राणे म्हणाले.

जे चालले आहे ते जनतेच्या हिताचे नव्हे

गोव्यात सध्या जे राज्य चालले आहे ते जनतेच्या हिताचे नव्हे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी भाजप सरकारवर टीका केली. गोव्यात कोळसा हब करण्याचा प्रयत्न झाल्यास तो मुळापासून नष्ट केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. गोव्यात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा जनतेने प्रादेशिक आराखडा व एसईझेडला विरोध केला होता. लोक रस्त्यावर उतरले होते. त्याची दखल घेऊन लोकांच्या भावनाची कदर करताना प्रादेशिक आराखडा व एसईझेड स्थगित ठेवण्यात आला होता. या राज्यातील जनतेच्या भावना केवळ काँग्रेस पक्ष समजू शकतो असे श्री. कामत म्हणाले.

वास्कोहून केवळ दोनच प्रवासी रेल्वेगाडय़ा सुटत असतात. त्यांच्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे का ? असा सवालही श्री. कामत यांनी उपस्थितीत केला.  आज केंद्र सरकार रेल्वेचे तसेच विमानतळाचे खासगीकरण करीत आहे. अशावेळी एमपीटीचे खासगीकरण व्हायला उशिर लागणार नसल्याचे ते म्हणाले.

मोले येथे मोठय़ा प्रमाणात वीज प्रकल्पासाठी झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. सरकारने झाडांची कत्तल न करता, पर्यायी व्यवस्था करून वीजवाहिन्या आणाव्यात, त्यासाठी अतिरिक्त खर्च आला तरी चालेल. पण, झाडांची कत्तल करू नका, अशी मागणी श्री. कामत यांनी यावेळी केली.

सरकार गोवा नष्ट करू पाहत आहे

राज्यातील भाजप सरकार गोवा नष्ट करू पाहत असल्याचा आरोप यावेळी लुईझिन फालेरो यांनी केला. गोवेकरांच्या अंगात रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत गोव्यात कोळसा हब करू दिला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. केंद्र सरकारला कोणतेही प्रकल्प गोव्यावर लादण्याचा अधिकार नाही. गोवा हे स्वतंत्र राज्य आहे. केंद्राने सांगितले म्हणून प्रकल्प स्वीकारले पाहिजे असे काहीच नाही असे सांगून श्री. फालेरो पुढे म्हणाले की, सध्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम थांबविण्यात आले आहे. ते पुन्हा सुरू केल्यास सर्वशक्तीनीशी रस्त्यावर उतरू असे ते म्हणाले. केंद्र सरकारने रेल्वे, विमानतळ यांचे खासगीकरण केले आहे. आता गोव्यातील समुद्र किनाऱयांचे देखील खासगीकरण केले जाईल. त्यामुळे लोकांनी जागृत असले पाहिजे. 

मुख्यमंत्र्यांनी आव्हान स्वीकारावे

भाजप सरकारातील मंत्री मिलिंद नाईक यांचा एमपीटीत मोठय़ा प्रमाणात व्यवसाय चालत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री मिलिंद नाईक यांचा कोणताच व्यवसाय एमपीटीत चालत नाही हे स्पष्ट करावे व आपले आव्हान स्वीकारावे, असे युवा नेते संकल्प आमोणकर यावेळी बोलताना म्हणाले. केवळ एका मिलिंद नाईकसाठी भाजप सरकारने गोव्याला कोरोनाच्या खाईत लोटले. वास्कोतील जनता लॉकडाऊनची मागणी करत होते. मात्र, मिलिंद नाईकचा व्यवसाय बंद पडणार म्हणून लॉकडाऊन सरकारने फेटाळला व त्याची किंमत गोव्यातील जनतेला मोजावी लागत असल्याचे संकल्प आमोणकर म्हणाले.

यावेळी दक्षिण गोव्याचे खा. फ्रान्सिस सार्दिन, एम. के. शेख, प्रतिमा कुतिन्हो, वरद म्हार्दोळकर, शंकर पोळजी, जयेश शेटगांवकर, राजू काब्राल यांची भाषणे झाली. यावेळी एकूण 9 ठराव समंत करण्यात आले. सुरवातीला ज्यो डायस यांनी स्वागत केले, तर विजय भिके यांनी आभार मानले.

रवी नाईक सभेला अनुपस्थित

फोंडाचे आमदार रवी नाईक हे या जाहीर सभेपासून अलिप्त राहिले. रवी नाईक यांच्या रीतेश व रॉय नाईक या दोन्ही मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षाने देखील त्यांना जवळपास बाजूला ठेवले आहे. रवी नाईक सोडून इतर सर्व आमदार या सभेला उपस्थित होते. रवी नाईक यांच्याबद्दल सध्या काँग्रेस पक्षात प्रचंड नाराजीचा सूर आहे. 

Related Stories

कुचेली काजरेश्वराचा आज जत्रोत्सव

Amit Kulkarni

कोविड हॉस्पिटलात झाला बाळाचा जन्म

tarunbharat

होंडा नारायणनगर भागातील रस्त्याची अवस्था बिकट

Omkar B

गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन मुक्त करण्याचा आदेश

Patil_p

पणजीच्या दुर्दशेला बाबूशच जबाबदार

Patil_p

विहिरीत उडी मारून वृद्धाची आत्महत्या

Omkar B
error: Content is protected !!