Tarun Bharat

गोव्यात पावसाचे सहा महिने पूर्ण

जनजीवनावर परिणाम, 19 नोव्हेंबरपर्यंत जोरदार पाऊस, हवामान खात्याची माहिती

प्रतिनिधी /पणजी

मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसाने राज्यातील तुळशी विवाह सोहळय़ावर विपरित परिणाम झाला. त्याचबरोबर 15 मे पासून सुरू झालेल्या पावसाने सहा महिने पूर्ण केले. आतापर्यंत सलग सहा महिने पडणाऱया पावसाळय़ाचे हे प्रथमच दर्शन गोमंतकीयांना घडलेले आहे. अद्याप दि. 19 नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस पडतच रहाणार असा, इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मंगळवारी राज्यात सर्वत्र जोरदार व संततधार पडलेल्या पावसाने सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण केला. एवढे महिने पडत असलेल्या पावसामुळे आता हळूहळू जनजीवनावरही परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत व याशिवाय झाडांवरही विपरित परिणाम सुरु झालेला आहे. ऐन सप्टेंबर मध्येच आंब्यांची अनेक झाडे मोहराने बहली. मात्र त्यावरही पाऊस पडल्याने हा मोहर जळून गेला. त्यानंतर ऑक्टोबर व आता अलीकडे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात देखील आंब्यांच्या झाडांना मोहर आला तो सतत पडणाऱया पावसाने गळून पडला. यंदा हिवाळा सुरु होणार की हा पाऊस डिसेंबरपर्यंत तसाच रहाणार हे हवामान खातेही सांगू शकणार नाही.

एक गोष्ट खरी. 2020 मधील पाऊस ऑक्टोबरच्या अखेरीस संपुष्टात आल्यानंतर पुढे तो सतत दरमहिन्याला एखाद दुसरा दिवस पडून गेला. जानेवारीमध्ये पाऊस पडून गेला. फेब्रुवारीमध्येही तेच झाले. मार्चमध्ये दोन चार दिवस पाऊस कोसळला. एप्रिलमध्ये अशीच परिस्थिती झाली व मे महिन्यात तौक्ते वादळामुळे 15 मे पासूनच पाऊस सुरू झाला. मध्ये एक दोन दिवस विश्रांती घेतली ते वगळता गेले सहा महिने गोव्यात पाऊस पडतच आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दि. 19 नोव्हेंबरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस कोसळणार. दि. 20 नोव्हेंबर रोजी पाऊस पडणार नाही. तथापि त्यानंतर पुन्हा दुसरा पाऊस सुरू होणार की नाही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

मंगळवारी पावसाने झोडपले दरम्यान, मंगळवारी राजधानी पणजीसह संपूर्ण राज्यभरात जोरदार पाऊस पडला. दुपारी 2 वा. सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत चालूच होता. सोमवारपासून सुरू झालेल्या तुळशीविवाह सोहळय़ादिनीही जोरदार पाऊस पडला आणि विवाह सोहळय़ाच्या दुसऱया दिवशी देखील मुसळधार पाऊस पडला. यामुळे तुळशी रंगविणे सोडाच विवाह सोहळा देखील छत्र्या हात धरून पार पाडावा लागला. मंगळवारी संपूर्ण गोव्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जनजीवनही अस्तव्यस्त झाले. आजही राज्यात जोरदार पाऊस पडण्याची हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Related Stories

त्यांच्या काबाड कष्टांना हवी हक्काची जागा…

Amit Kulkarni

” गोव्यातील बेरोजगारीला भाजपच जबाबदार”

Abhijeet Khandekar

आरजी भाजपकडून निधी घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजतात

Amit Kulkarni

कळंगूट येथे दोन शॅक आगीत खाक

Amit Kulkarni

ब्रम्हकरमळीतील नागरिकांना जुलाब, उलटय़ा

Amit Kulkarni

गोवा वेल्हात महिलांसाठी धावण्याची स्पर्धा

Amit Kulkarni