Tarun Bharat

गोव्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार बनवा

कुडचडेतील प्रचारसभेत राहुल गांधी यांचे आवाहन : लोकांच्या सांगण्यानुसार सरकार चालेल : भाजपने गोव्याची अर्थव्यवस्था सुधारली नाही

प्रतिनिधी /कुडचडे

गेली दहा वर्षे काँग्रेस गोव्यात विरोधात राहिलेला आहे. भाजप सरकारने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सामान्य लोकांना चिरडले आहे. पण ज्या वेळेस काँग्रेसचे सरकार होते तेव्हा सामान्य जनतेची ही स्थिती नव्हती. त्याचप्रमाणे यंदा सर्वांनी मिळून परत एकदा काँग्रेसचे सरकार बनवायचे आहे. ते आमदारांचे व मंत्र्यांचे नव्हे, तर गोव्यातील लोकांचे सरकार बनणार. हे सरकार गोव्यातील लोकांच्या सांगण्याप्रमाणे चालेल हे माझे आश्वासन आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कुडचडेतील पक्षाच्या प्रचारसभेत बोलताना स्पष्ट केले.

भाजप सरकारने गोव्यातील जनतेसाठी काय केले. जनतेला कोरोना काळात लाचार करून टाकले. गोव्याची अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. नोटबंदी करून लहान लोकांच्या पोटावर पाय दिला. नोटबंदी केली तेव्हा सामान्य, गरीब लोक रांगेत उभे होते. एकही अब्जाधीश रांगेत नव्हता. यातून भाजप सरकारच्या नेत्यांना सामान्य माणसाचे किती भले करायचे आहे ते जनतेने समजून घ्यावे. आज भारतात दोन देश आहेत. एक सामान्य जनतेचा व एक अब्जाधीशांचा. या देशात जे अंदाजे 200 अब्जाधीश आहेत त्यांना त्रास घ्यावा लागत नाही. त्यांना सर्व गोष्टी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचे पडून गेलेले नाही, अशी टीका त्यांनी केली.

रोजगार गायब होण्यास सरकार जबाबदार

आज रोजगार देशातून गायब झालेला आहे. रोजगार लहान व्यापाऱयांकडून तयार होतो. पण गेली आठ वर्षे भाजप सरकारने या व्यापाऱयांवर अन्याय केला आहे. आज देशात व्यापार होतो त्यातून 90 टक्के फायदा मोठय़ा व्यावसायिकांना जातो. गोव्यात खाण व्यवसाय बंद पडला. यात जास्त नुकसान सामान्य लोकांचे झाले. त्यांचा रोजगार गेला व कुटुंबावर संकट आले. त्यासामुळे मी मुद्दाम सांगतो की, काँग्रेस सरकार आल्यावर खाण व्यवसाय कायदेशीर पद्धतीने सुरू करणार. भाजपवाले खाण व्यवसाय सुरू करणार असे फक्त तोंडाने बोलत आहेत. पण गेली पाच वर्षे ते काय करत होते याचे उत्तर ते देऊ शकणार नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.

गोव्यातील जनतेला तीन वचने

गोवा हा निसर्गतः सुंदर आहे. येथे शेतकरी आहेत. पण भाजप सरकार गोव्याला कोळसा नगरी बनविण्याचा विचार करत आहे. काँग्रेस सरकार गोव्यात कोळसा आणू देणारच नाही हा विश्वास बाळगा, असे त्यांनी सांगितले. मी गोव्यातील जनतेला तीन वचने देतो. गरिबी कायमस्वरूपी संपविण्यासाठी काँग्रेस सरकार गोव्यातील अत्यंत गरीब कुटुंबांतील लोकांच्या बँक खात्यांत महिन्याला सहा हजार रुपये थेट जमा करणार. सरकारी नोकऱयांत महिलांना 30 टक्के आरक्षण देण्यात येणार. गोव्यातील बेरोजगारी हटविण्यासाठी 500 कोटी रुपयांची योजना तयार करणार, असे गांधी यांनी स्पष्ट केले.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार

त्याचबरोबर पर्यटनावर निधी खर्च करण्यात येणार. यासंबंधी गोव्यातील पर्यटनाशी संबंधित घटकांशी चर्चा करण्यात आलेली आहे. त्यात भरपूर स्रोत असल्याचे जाणून आलेले आहे. आज गोव्याची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. भाजप सरकारने कोविड महामारीच्या काळात लोकांना त्रासात घातले. त्याअगोदर नोटबंदी, त्यानंतर जीएसटी लागू करून आर्थिक स्थिती अडचणीत आणली. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलचे दर आधीपेक्षा कमी आहेत. पण पेट्रोल व डिझेलचे दर वाढतच आहेत. यात नुकसान सामान्य लोकांना होते व फायदा अब्जाधीशांना होतो. काँग्रेस सरकार हे होऊ देणार नाही व पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणारच, असे गांधी यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसकडून युवांना संधी

काँग्रेसच्या हितचिंतकांकडून सांगण्यात आले त्याप्रमाणे काँग्रेसने यंदा युवांना संधी देण्याचा निर्णय घेतला असून त्याचे उदाहरण उमेदवार अमित पाटकर यांच्या रूपाने समोर आहे. त्यांना निवडून आणावे व कुडचडेच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे सचिव के. सी. वेणुगोपाल, दिनेश राव, प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, खासदार फ्रान्सिस सार्दिन, कर्नाटकाचे माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, प्रभारी पी. सी. चिदंबरम, विजय सिंग, कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष झारकोली, कुडचडेचे माजी आमदार डॉमनिक फर्नांडिस, कुडचडे काँग्रेस गटाध्यक्ष पुष्कल सावंत, माजी नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर, हर्षद गावस देसाई, मनोहर नाईक, अलका लांबा, बीना नाईक तसेच विश्वजित कदम, एम. के. शेख, प्रकाश राठोड, हसीब अमीन, शंकर किर्लपालकर, वरद म्हार्दोळकर, नौशाद चौधरी, माझिर खान, जोसेफ डायस आदी मान्यवर उपस्थित होते.

अमित पाटकर रुपरेषा बदलणार : दिगंबर कामत

काँग्रेस पक्षाने कुडचडेत अमित पाटकर हे जे उमेदवार दिले आहेत त्यांच्यात कुडचडेची रूपरेषा बदलण्याची ताकद आहे. आज गोव्यात जे चालले आहे ते लोकांनी पाहिलेले आहे. बेरोजगारी, महागाई यासह प्रत्येक गोष्टीत अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकांना सामान्य जीवन जगणे कठीण झाले आहे. शेतकऱयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सुद्धा या सरकारला वेळ नाही. देशात महामारीचा काळ सुरू झाला, तरी भाजप सरकारने जनतेची काळजी घेतली नाही. जनतेला फक्त आश्वासनांवर झुलवत ठेवलेले आहे. भाजप सरकारला यंदा जनतेने धडा शिकवलाच पाहिजे व कुडचडेतील हुकूमशाही संपविण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला निवडून आणणे अत्यंत गरजेचे आहे, असे दिगंबर कामत यांनी सांगितले.

भाजपने बोलविलेले नातेवाईक : अलका लांबा

भाजप सरकारने सामान्य लोकांचे काहीच भले केलेले नाही. 2017 साली जनतेने उमेदवार निवडून दिले होते, पण भाजपच्या घुसखोरीमुळे काँग्रेस पक्ष सरकार स्थापित करण्यात अपयशी ठरला. काँग्रेसने तेव्हाच निर्णय घेतला होता की, या पक्षबदलूंना परत पक्षात घेणार नाही. त्याचप्रमाणे यंदा केलेले आहे व काँग्रेसने युवा उमेदवरांना संधी दिली आहे, असे अलका लांबा यांनी सांगितले. आज गोव्यात जे पक्ष आले आहेत ते भाजपने बोलाविलेले नातेवाईक आहेत. त्यामुळे विचार करा व मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

अमित पाटकर

घरोघरी प्रचारात जो प्रतिसाद लाभलेला आहे त्यावरून दिसून येते की, यावेळेस कुडचडेत काँग्रेस निवडून येणार. कुडचडेतील लोकांनी गेली दहा वर्षे ज्या दबावाखाली दिवस काढले त्यातून सुटण्याची ते वाट बघत होते. आता ती वेळ आलेली आहे असे लोकांकडून सांगण्यात येत आहे. राज्यातील भाजप सरकारने युवावर्गाला त्रासात टाकलेले आहे. या सरकाने अगोदर वीस हजार नोकऱया, तर नंतर दहा हजार नोकऱया देतो असे सांगितले. शेवटी कोणत्या नोकऱया दिल्या, तर मीटर रिडर, लाईनमनच्या, असे पाटकर म्हणाले. काही महिने अगोदर कुडचडेच्या आमदारांनी जे अर्धवट बांधकाम जलतरण तलावाचे असल्याचे सांगितले होते ते त्यांनी उमेदवारांशी संवाद कार्यक्रमात बहुउद्देशीय मैदान असल्याचे सांगितले. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवावा की, ठेवू नये हे कुडचडेवासियांनी ठरवावे, असे त्यांनी सांगितले. सार्दिन यांनीही पाटकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले. सावंत यांनी स्वागत केले.

Related Stories

राजकारण बदलण्याच्या ध्येयपूर्तीसाठी कार्यरत व्हा

Amit Kulkarni

केजरीवाल यांनी घेतले होंडा आजोबाचे दर्शन

Amit Kulkarni

इंडियन वूमन लीगमध्ये शिरवडेचा पहिला विजय

Patil_p

राजविद्या केंद्रातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा

Omkar B

महापौर उदय मडकईकरांना दिलासा

Amit Kulkarni

मिशन मोदी अगेन पीएम मोहिमेचा राज्यात विस्तार करणार

Patil_p