Tarun Bharat

गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुरली ची बेळगावात चौकशी

 प्रतिनिधी / बेळगाव

जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी गेल्या आठ दिवसांपूर्वी एसआयटीच्या अधिकाऱयांनी झारखंडमध्ये अटक केलेल्या ऋषिकेश उर्फ मुरली याला शनिवारी बेळगावात आणण्यात आले आहे. बेळगाव परिसरात त्याची चौकशी करण्यात येत आहे. 9 जानेवारी रोजी झारखंडमधील धनबाद जिल्हय़ातील कतरास येथून ऋषिकेश भास्कर देवडेकर उर्फ मुरली, उर्फ शिवा (वय 41) याला एसआयटीच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतले होते. गौरी हत्येनंतर तब्बल अडीच वर्षांनी त्याला अटक झाली. त्यानंतर बेंगळूर येथील सिटीसिव्हिल कोर्टमध्ये त्याला हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

5 सप्टेंबर 2017 रोजी रात्री गोळय़ा झाडून जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळेच्या सिध्दरामय्या सरकारने तपासासाठी एसआयटीकडे हे प्रकरण सोपविले होते. एसआयटीने या प्रकरणाचा छडा लावून आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. ऋषिकेश हा गेल्या अडीच वर्षांपासून फरारी होता. अमोल काळेच्या डायरीत या नावाचा उल्लेख होता.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या पिस्तुलीची विल्हेवाट लावण्याचा आरोप ऋषिकेशवर आहे. अमोल काळे व त्याच्या साथीदारांना अटक झाल्यानंतर ऋषिकेश बेपत्ता होता. सतत पाठपुरावा करुन त्याला अटक करण्यात आल्याचे एसआयटीच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे. यापूर्वी महाव्दार रोड येथील भरत कुरणे (वय 35) या तरुणालाही एसआयटीने अटक केली आहे. विचारवंतांच्या हत्येसाठी गोळीबाराचा सराव बेळगाव परिसरात केल्याचे उघडकीस आले होते.

यापूर्वी अटक करण्यात आलेल्या परशराम वाघमारे (वय 26, रा. सिंदगी, जि. विजापूर) याच्यासह अनेकांना बेळगाव परिसरात आणून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. ऋषिकेशलाही शनिवारी बेळगावात आणले आहे. दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. ऋषिकेश हा मुळचा सिडकोनगर, औरंगाबाद येथील राहणारा असून सध्या झारखंडमध्ये त्याचे वास्तव्य होते. तपास अधिकाऱयांनी बेळगाव परिसरात तपास सुरु केला आहे.

Related Stories

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड

Amit Kulkarni

जी.जी. चिटणीस हायस्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Amit Kulkarni

रब्बी हंगामाच्या पीक विम्याला शेतकऱयांचा थंडा प्रतिसाद

Patil_p

घर पडझडीच्या नुकसान भरपाईत कपात

Patil_p

जलवाहिनीसाठी परवानगीची मागणी

Amit Kulkarni

राष्ट्रीय मास्टर्स ऍथलेटीक्स स्पर्धेत धेंडीराम शिंदे, सुरेश देवरमनी यांचे सुयश

Amit Kulkarni