Tarun Bharat

ग्यानी झैलसिंग राजीव गांधीना हटवून वसंतदादांना पंतप्रधान करणार होते

ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांचा पुस्तकाद्वारे दावा

Advertisements

विशेष प्रतिनिधी/सांगली

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी निर्माण झालेल्या राजकीय तणावानंतर राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा विचार केला होता अशी खळबळजनक माहिती ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी जाहीर केली आहे. त्यांचे आपल्या इंडियन एक्सप्रेसच्या संपादकपदाच्या काळातील अनुभवावरील पुस्तक ‘द कमिशनर फॉर लॉस्ट कॉज’ नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यात त्यांनी हा दावा केला असून करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत त्याचे अधिक विश्लेषणही केले आहे.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी आली. निवडणुकीत त्यांना प्रचंड बहुमत लाभले मात्र तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्याशी त्यांचे मतभेद वाढत चालले होते. दिल्लीतील शिखांचे शिरकाण करण्यात आले होते आणि तेव्हा झालेल्या दंग्यांबाबत राष्ट्रपतींना कोणतीही माहिती दिली जात नव्हती. इंदिराजींच्या हत्येबाबत आलेल्या ठक्कर आयोगाच्या अहवालाची माहितीही दिली गेली नव्हती. त्यामुळे झैलसिंग राजीव गांधी यांच्यावर नाराज होते. एक्सप्रेस समूहाचे प्रमुख रामनाथ गोयंका आणि भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष राजमाता विजयाराजे शिंदे यांनी या परिस्थितीमध्ये राजीव गांधी यांना पदच्युत करण्यासाठी राष्ट्रपतींचे मन बनवले होते. त्यासाठी गोयंका यांच्या पुढाकाराने लिहिलेले पंतप्रधान पदावर राजीव गांधी यांना पद्धतीत करण्याचे पत्र राजमाता विजयाराजे शिंदे राष्ट्रपतींना देऊन आल्या होत्या. मात्र त्यावेळी इंडियन एक्सप्रेस संपादक असलेल्या शौरी यांनी रामनाथजी आणि राष्ट्रपती झैलसिंग यांना, हे घटना विरोधी ठरेल, लोकांमध्ये आधीच प्रतिमा खराब झाल्याने राजीव गांधींना पदच्युत करण्याची आवश्यकता नाही. उलट तसे केल्याने ते मोठा जनसमुदाय घेऊन येतील, त्यांचा सामना करणे जड जाईल. त्यातून गांधी यांना पुन्हा मोठी सहानभूती लाभेल हे पटवून दिले आणि पुढची कारवाई थांबली असा आपल्या पुस्तकात दावा केला आहे.

अरूण शौरी यांचे पुस्तक

काँग्रेसला असलेले स्पष्ट बहुमत लक्षात घेता इतर कोणताही पक्ष सरकार स्थापनेचा दावा करू शकत नव्हता. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत कोणी पंतप्रधान व्हायला तयार आहे का? असे शौरी यांनी राष्ट्रपतींना विचारले. त्यांनी काँग्रेसमधील पाच लोक तयार असून त्यामध्ये विद्याचरण शुक्ला, अरुण नेहरू, वेंकटरामन आदींची नावे सांगितली. पाच पैकी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना आपण प्राधान्य देणार असून ते या पदासाठी योग्य आहेत ते व्यवस्थित सरकार चालवतील आणि परिस्थिती हाताळतील असा ग्यानी झैलसिंग यांनी विश्वास व्यक्त केल्याचे पुस्तकात नमूद केले आहे. मात्र, शौरी यांच्या सांगण्यावरून राष्ट्रपतींनी आपले मत बदलले आणि सचिव वर्धन यांना पुढच्या कारवाईपासून थांबवले….. असेही पुस्तकात म्हटले आहे.

याबाबत ‘द वायर’ या संकेतस्थळावर पत्रकार करण थापर यांनी अरुण शौरी यांची मुलाखत घेतली असून, ती शुक्रवारी रात्री प्रसारित करण्यात आली. यामध्ये थापर यांनी अधिक खुलासेवार या घटनाक्रमाबद्दल आणि झैलसिंग यांना यातून नेमके काय साध्य करायचे होते? असे विचारले असता, शौरी म्हणतात, ग्यानी झैलसिंग राजीव गांधींच्या हकालपट्टीबद्दल गंभीर होते की नाही किंवा ते पंतप्रधानांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न करत होते याची मला खात्री नाही. पण, ग्यानी झैल सिंग यांना पंतप्रधानांकडून आदर हवा होता. मात्र, अरुण शौरींनी सांगितलेली गोष्ट स्पष्टपणे सूचित करते की ग्यानी झैल सिंग कारवाईबाबत गंभीर होते. मात्र शौरी यांनी पुढे आणलेल्या मुद्यांनी त्यांना फेरविचार करायची वेळ आली.

राजीव गांधी आणि झैलसिंग

राजीव गांधी यांच्या या कार्यकाळात अनेक वादग्रस्त घटना घडल्या. त्याचा आतापर्यंतच्या भारताच्या राजकारणावर प्रभाव जाणवतो आहे. बोफोर्स आरोपानंतर परिस्थिती इतकी बदलली की, अरुण नेहरू हे राजीव गांधी यांचे अत्यंत निकटवर्ती असतानाही व्ही. पी. सिंग यांच्याबरोबर पुढे पक्षातून बाहेर पडून जनता दलात सामील झाले. व्यंकट रमण राष्ट्रपती झाले. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्यांचा पंतप्रधानपदासाठी विचार झैलसिंग यांनी केला होता, ते वसंतदादा मात्र आजारी पडले आणि 1989 साली मार्च महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला. राजीव गांधी यांना भारतीय जनतेने लोकसभा निवडणुकीत नाकारले. सांगली जिल्ह्याच्या बाबतीत योगायोग असा की उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेले यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न इंदिरा गांधी यांच्यामुळे भंग पावले.

वसंतदादा यांचे नांव पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत होते, असा दावा या पुस्तकात करण्यात आला असला तरी त्यांनी त्यास संमती दिली असती का? कारण 1984 साली राजीव गांधी यांना पंतप्रधान करण्यात वसंतदादा यांचा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून सिंहाचा वाटा होता. त्यांनी पुढाकार घेतल्याने कमलापती त्रिपाठी, प्रणव मुखर्जी यांचा त्या पदावरील दावा बारगळला होता. मुखर्जी यांनी तर या पदावर जाहीरपणे दावा सांगितला होता. पुस्तकात उल्लेख करण्यात आलेले दावे 1985 च्या दरम्यानचे आहेत. पुढे झैलसिंग आणि राजीव गांधी यांचे मतभेद निवळले. पण राजीव गांधी यांना पदावरून हटविण्याचे त्यांचे कारस्थान काही वर्तमानपत्रात छापून आले होते. महाराष्ट्राच्या संदर्भासाठी आज नोंद घ्यावी अशी गोष्ट अशी की पंतप्रधानपदासाठी तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंग यांच्यापुढे दादांचे नाव होते हे पुढे आले. अर्थात दादा आयुष्यभर ज्याला नेता मानले त्यांच्याबरोबर कायम राहिले. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मधल्या काळात यशवंतराव चव्हाण हे त्यांचे नेते होते. दादांनी झैलसिंह यांच्या प्रस्तावाला संमती दिली असती का? हा विषय जर तरचा आहे. जे घडलेच नाही, त्याला अर्थ नाही. पण दादांचे नाव कुणाच्या तरी डोक्यात होते हे चाळीस वर्षांनी पुढे आले. शौरी यांचा असा दावा असला तरी घटनात्मक तरतुदी तशा आहेत का? असतील तर त्याचा अन्वयार्थ त्यावेळच्या न्यायव्यवस्थेने काय लावला असता हा चर्चेचा विषय ठरला असता.

Related Stories

देशात सलग चौथ्या दिवशी 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण

datta jadhav

आरोपीची पूर्ण ‘बायो कुंडली’ होणार तयार

Patil_p

सांगली : वाघवाडीत प्रेम प्रकरणातून मित्राचा गळा चिरून खून

Abhijeet Shinde

सांगली : कोरोना रूग्णांसाठी मिरजेत उभारला अतिरिक्त ऑक्सिजन टँक

Abhijeet Shinde

22 वर्षांनी कुटुंबाशी मिलन

Patil_p

केजरीवाल सरकारकडून भरीव मदत जाहीर

Patil_p
error: Content is protected !!