ओल्या पाटर्य़ांबरोबरच सहलींचे आयोजन : सामाजिक कामे करण्यासाठीही धडपड सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचयात निवडणुका नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत सदस्य होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून थांबलेले काही जण आतापासून नमस्कार आणि चमत्कार अशा प्रकारचा फॉर्म्युला वापरताना दिसत आहेत. काही जण तर कधीच जनतेच्या कामासाठी पुढे न आलेले आता काम करण्याचे नाटक करत आहेत. काही जण पाटर्य़ा तसेच सहलींचे आयोजन करताना दिसत आहेत.
ग्राम पंचायत निवडणूक म्हटली की ग्रामीण भागामध्ये मोठी चुरसच निर्माण झालेली असते. ग्राम पंचायतला आता मोठय़ा प्रमाणात थेट निधी येत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत सदस्य होणेदेखील महत्त्वाचे असल्याचे काही जणांना वाटू लागले आहे. त्यामुळे आतापासूनच बरेच जण तयारीला लागले आहेत. शहराच्या उत्तर भागातील एका गावामध्ये तर तथाकथित पुढाऱयाने आतापर्यंत तीन ओल्या पाटर्य़ाही दिल्या आहेत. याबाबत चर्चाही सुरू झाली आहे.
ग्राम पंचायत निवडणूक अद्याप जाहीर झाली नाही. मात्र, त्याबाबत संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक जण या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कधीच सामाजिक कार्यात न भाग घेतलेलेही आता नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे निवडणुकांचे वारे वाहत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यापूर्वी असलेले ग्राम पंचायत सदस्य पुन्हा रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. कारण मागील पाच वर्षांमध्ये आलेल्या निधीचे वाटप करताना आपला वाटा घेतला होता. तो वाटादेखील मोठा असल्यामुळे माजी ग्राम पंचायत सदस्य पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी धडपडू लागले आहेत.
ग्राम पंचायत सदस्यांबरोबरच तालुका पंचायत सदस्यही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. याला कारण तालुका पंचायतीला येणारे अनुदान फारच कमी असते. त्यामुळे तालुका पंचायत सदस्य होऊनही त्याचा काहीच उपयोग नाही. तालुका पंचायतपेक्षाही ग्राम पंचायतीकडेच अधिक निधी येतो. त्यामुळे त्या ठिकाणी चरण्यासाठी कुरण मिळते. त्यामुळेच या निवडणुकीसाठी अनेक जण धडपडताना दिसू लागले आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीमध्येही अनेक तालुका पंचायत सदस्य ग्राम पंचायतीत निवडून आल्याची माहिती आहे. आता यावेळीही अनेक सदस्य रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे.