Tarun Bharat

घरगुती सिलिंडर 15 रुपयांनी महाग

पेट्रोल-डिझेल दरातही वाढ- दसरा-दिवाळीपूर्वीच महागाई वाढण्याची चिन्हे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

ऐन सणासुदीत पुन्हा एकदा महागाईचा भडका उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मागील आठवडय़ात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर आता  घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात 15 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.  एकीकडे गॅसदर वाढत असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाल्याने ऐन दसरा-दिवाळीतच सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे.

तेल कंपन्यांनी विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ केली आहे. तसेच 5 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत आता 502 रुपये झाली आहे. या दरवाढीमुळे सणांच्या आधी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. या दरवाढीमुळे आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 884.50 रुपयांवरून 899.50 रुपये प्रतिसिलिंडर झाली आहे. सातत्याने वाढणाऱया किमतीमुळे आता घरगुती सिलिंडरचा प्रवास एक हजार रुपयांच्या दिशेने सुरु झाला आहे. 1 ऑक्टोबरला पेट्रोलियम कंपन्यांनी नवे दर जाहीर केले होते. त्यामध्ये घरगुती सिलिंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले. तर व्यावसायिक सिलिंडर दर 43.50 रुपयांनी वाढविण्यात आले. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरपोटी 1,881.23 ऐवजी 1,924.23 रुपये भरावे लागत आहेत. याचा थेट फटका हॉटेल-रेस्टॉरंटचालकांना बसणार आहे.

जुलैपासून सिलिंडर 90 रुपयांनी महाग

जुलैपासून एलपीजीच्या किमतीत ही चौथी वाढ आहे. जुलैमध्ये प्रतिसिलिंडरमध्ये 25.50 रुपयांनी वाढ करण्यात आली, त्यानंतर 17 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी प्रत्येकी 25 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर आता 6 ऑक्टोबर रोजी 15 रुपयांनी वाढ झाल्यामुळे जुलैपासून आतापर्यंत झालेली दरवाढ तब्बल 90 रुपये इतकी आहे. आधीच महागाईने त्रासलेल्या नागरिकांसाठी गॅस आणि इंधन दरवाढ हा मोठा धक्का मानला जात आहे.

इंधन दरवाढीचा भडका सुरूच

पेट्रोलच्या दरात बुधवारी प्रतिलिटर 30 पैसे आणि डिझेलच्या किमतीत 35 पैशांनी वाढ झाली आहे. अलिकडच्या काही आठवडय़ांमध्ये झालेली ही सर्वात मोठी दैनंदिन वाढ आहे. आता डिझेल दरही लवकरच शंभरी ओलांडणार असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत 102.94 रुपये प्रतिलिटर आणि मुंबईत 108.96 रुपयांवर पोहोचली आहे. डिझेलचे दरही दिल्लीत 91.42 रुपये आणि मुंबईत 99.17 रुपये प्रतिलिटर या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत.

यावषी आतापर्यंत पेट्रोल 19.03 रुपयांनी आणि डिझेल 17.36 रुपयांनी महाग झाले आहे. 2021 च्या प्रारंभी दिल्लीत पेट्रोल 83.97 रुपये आणि डिझेल 74.12 रुपये प्रतिलिटर होते. आता ते 102.94 आणि 91.42 रुपये प्रतिलिटरवर आहे. म्हणजेच 9 महिन्यांमध्ये पेट्रोल 19.03 रुपयांनी आणि डिझेल 17.36 रुपयांनी महाग झाले आहे. तथापि, राज्यांमधील स्थानिक करांनुसार प्रत्येक राज्यात किमती वेगवेगळय़ा असतात.

26 राज्यांमध्ये पेट्रोल, 6 राज्यांमध्ये डिझेल ‘शंभरी’पार

देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांवर पोहोचले आहे. मध्यप्रदेश, छत्तिसगड, दिल्ली, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, पाँडिचेरी, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्हय़ांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर पोहोचले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे आहे. दुसरीकडे, डिझेल दराचा विचार करता मध्यप्रदेश, छत्तिसगड, आंध्रप्रदेश, ओडिशा, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी 100 रुपयांपेक्षा जास्त आहे.

सीएनजी-पीएनजीच्या किमतीतही वाढ

नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (आयजीएल) दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या किमतीत 2.55 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्याचबरोबर पीएनजीच्या किमती 2.10 रुपये प्रति घनमीटरने वाढविल्या आहेत.

Related Stories

दिल्लीतील सर्व शाळा 5 ऑक्टोबरपर्यंत बंद

Patil_p

मविआने बहुमत सिद्ध करावे

Patil_p

जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची DRDO कडून चाचणी

datta jadhav

धार्मिक मिरवणुकीसाठी अनुमती आवश्यक

Patil_p

पंतप्रधान मोदींना ‘टुचूक’

datta jadhav

देशाला 35 ऑक्सिजन प्रकल्प समर्पित

Amit Kulkarni