Tarun Bharat

घरांना मंजुरी पण निधीचा अभाव

तालुक्मयातील प्रत्येक ग्रा.पं.ला मिळणार 20 घरे : कामाला लवकर चालना देण्याची मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विविध योजनांना चालना देण्यात आली आहे. मात्र, ज्या गरजूंना घरांची आवश्यकता आहे त्यांना डावलून आपल्या मर्जीतील नागरिकांना घरे देऊन व्होट बँक अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. दरम्यान, आता प्रत्येक ग्राम पंचायतीला 20 घरे मंजूर झाली आहेत. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देऊन घरांच्या कामांना लवकरात लवकर चालना द्यावी, अशी मागणी होत आहे.

विविध वसती योजनांतर्गत तालुक्मयात हजारो घरे मंजूर झाली आहेत. मात्र, काहींच्या चुकीच्या कारभारामुळे अनेक घरे रद्दही झाल्याचे उघडकीस आले आहे. सध्या राज्य सरकारकडून प्रत्येक ग्राम पंचायतीला 20 घरे मंजूर झाली असली तरी त्यासाठी अजूनही सरकारकडून अनुदान मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजूनही या घरांची कामे सुरू करण्यास उशीर लागणार आहे. अनेक ग्राम पंचायतींमध्ये घरे पूर्ण न झाल्याचे प्रकार दिसून आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामागे संबंधित ग्राम पंचायत सदस्यच कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीमंतांना घरे मंजूर करून गरिबांच्या हक्काचे आणि स्वप्नातील घर उद्ध्वस्त केल्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना घरे मंजूर करून दिल्यास सोयीचे ठरणार आहे.

तसे पाहता ज्या व्यक्तीला घर मंजूर झाले आहे त्यांनी केवळ तीन महिन्यात आपल्या घराचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, 2016-17 मध्ये  वर्षाचा कालावधी उलटूनही काम पूर्ण होत नसल्याचे दिसून आले. याला काही प्रमाणात सरकारही जबाबदार असून वेळेत निधी पुरविल्यास अशा समस्या उद्भवणार नसल्याचे सांगण्यात आले. पैसे नसल्याने घरे बांधून घेण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

2016-17 सालाकरिता राज्य सरकार व केंद्र सरकारकडून 1665 घरे मंजूर झाली आहेत. सर्वच घरे बांधून घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, अजूनही काही घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. काही घरे अद्यापही निधीअभावी अर्धवट स्थितीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आपल्या मर्जीतील व्यक्तींना घरे देण्यात येत असल्याने अनेक घरे रद्द होण्याच्या मार्गावर आहेत.

आपले स्वतःचे एक घरकुल असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते.  आपल्याकडील गोळा केलेला पैसा आणि सरकारकडून घरकुलांद्वारे होत असलेली मदत यामुळे आपले स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा लागून राहिलेली असते. मात्र, या योजनेतील लाभार्थी निवड प्रक्रियेत होणाऱया गैरप्रकारांमुळे योजनांची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे.

राजकारण्यांच्या भांडणातही अनेकांची पंचाईत होऊन बसते. अनेकांचे घरकुलांचे स्वप्न धुळीस मिळविण्यात राजकारण्यांचा मोठा सहभाग असल्याचेच दिसून येते. परिणामी अनेकांच्या घरांची कामे अर्धवट पडली आहेत. सध्या प्रत्येक ग्राम पंचायतीला 20 घरे मंजूर झाली आहेत. ती घरे ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी ग्रामस्थ व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मंजुरी दिल्यास चांगले काम होणार आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

Related Stories

भाऊराव काकतकर महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन

Patil_p

धारवाडजवळ भीषण अपघातात चार ठार

Patil_p

नंदगडचा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये समावेश

Amit Kulkarni

पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ

Patil_p

बेळगाव जिल्हा न्यायाधीशांची बदली

Tousif Mujawar

ड्रेनेजवाहिन्यांच्या चरीमुळे शिवबसवनगर रस्त्यावर चिखल

Amit Kulkarni