Tarun Bharat

घरोघरी गौराईचे सोनपावलांनी उत्साहात आगमन

गौरी आगमन उत्साहात – घरगुती गणेशोत्सव उत्साहात -सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणात

प्रतिनिधी/सातारा

गेल्या दीड वर्षांपासून मुक्कामी आलेल्या कोरोना संसर्गामुळे सामाजिक रीतभात, सण, समारंभ या सर्वांवर मर्यादा आल्या आहेत. यावर्षी देखील गणेशोत्सवास आरंभ झाला असला तरी सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणात साजरा होत आहे. तर घरगुती गणेशोत्सव साधेपणात पण मोठया उत्साही व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. गणरायाच्या आगमनापासून घराघरात भक्तीमय वातावरण असून याच पार्श्वभूमीवर रविवारी गौरींचेही आगमन सोनपावलांनी झाले असून महिलांनी उत्साहात स्वागत केले.

यावर्षी सार्वजनिक मंडळांना चार फूट तर घरगुती गणपती मूर्तींना दोन फूट उंचीची मर्यादा घालण्यात आलीय. मात्र, घरगुती गणेशोत्सव उत्साही वातावरणात सुरु असून दैनंदिन आरतींचे आवाज घराघरात घुमत आहेत. गणरायासाठी दुर्वां, हार, फुले आणण्यासाठी सकाळी लगबग सुरु असतानाच लक्ष्मीच्या पावलांनी रविवारी घराघरात गौराईचे आगमन झाले आहे. षष्ठी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरीचे आवाहन झाले असून यानंतर सप्तमीला पूजन तर अष्टमीच्या दिवशी म्हणजेच 14 सप्टेंबरला गौर विसर्जन केले जाईल.

गणेशोत्सवासोबतच रविवारी महालक्ष्मी सणालाही सुरुवात झाली असून घराघरात गृहिणींनी गौराईचे भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत केले असून अनेक घरांमध्ये गौरीं सजावट करुन लक्ष्मीला घरात आणण्याची धांदल उडाली होती. गौरीच्या प्रसन्न मुखवटे खरेदीबरोबरच नवीन साडी खरेदीही महिला वर्गांनी करुन ठेवली असून नवीन माहेरवाशिणीसाठी गौरीचा आगमन सोहळा विषेश आनंदाचा भाग असतो.

महालक्ष्मीच्या सणाला गौरी माहेरी येतात, असे म्हटले जाते. यावेळी आपल्या घरात आलेल्या गौरीचा अनेक प्रकारे थाट आणि साज-सजावट केली जाते. माहेरवाशीणीचा हा थाट करण्यासाठी घरातील स्त्रिया प्रचंड व्यग्र होतात. सोळा भाज्या, सोळा चटण्या, सोळा पक्वान्न जेवणासाठी असतात. सोन्याच्या पावलांनी आलेल्या महालक्ष्मीचं रुप डोळ्यात साठवून अखेरच्या दिवशी तिला निरोप दिला जातो.

चौकट

सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणात

गणेशोत्सव म्हटलं की डॉल्बीच्या भिंती, ढोल-ताशांचा कडकडाट, गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी. हे दरवर्षीचे स्वरुप कोरोनामुळे गतवर्षीपासून पार बदलून गेले आहे. यावर्षी तर सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट चांगलेच जाणवले. कारण सातारा शहरासह जिल्हय़ात रस्त्यांवरील मंडपांची संख्या रोडावली. अनेक सार्वजनिक मंडळांनी खासगी जागेत मूर्ती प्रतिष्ठापणा करुन भक्तीभाव जपला आहे. तर मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दैनंदिन आरती, पुजाविधी केला जात आहे.

चौकट

पोलीस दलावरील ताण कमी झाला कोणतेही सण म्हटले की पोलीस दलावर कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्याची मोठी जबाबदार येवून पडते. कोरोनामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला जात असल्याने कोठेही गर्दी नाही, वाद्यांचा मोठा आवाज नाही. त्यामुळे पोलीस दलावरील बंदोबस्ताचा ताण खूप कमी झाला आहे. भक्तीभावात सुरु असलेल्या गणेशोत्सवात सर्वजण एकच मागणे गणराया चरणी करत आहेत हे कोरोनाचे संकट लवकर टळू दे देवा.

Related Stories

सातारा जिल्ह्यात 925 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

Archana Banage

सातारा : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

datta jadhav

मुख्याधिकारी- आरोग्य निरीक्षकांच्यात शाब्दिक युद्ध

Patil_p

महिलांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या सुजाता बावडेकर…

datta jadhav

कोयनेच्या पाण्याचा रंग बदलला

Patil_p

महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी लांबणीवर

Archana Banage
error: Content is protected !!