Tarun Bharat

घरोघरी गौरीच्या जेवणाचा थाट

Advertisements

पंचपक्वान्न तयार करून दाखविला नैवेद्य : पारंपरिक पद्धतीनुसार गौरींचे पूजन

प्रतिनिधी /बेळगाव

पुरणा-वरणाचा, स्वादिष्ट भाज्यांचा, खमंग वडय़ांचा, चवदार कोशिंबिरींचा आस्वाद घेऊन घरोघरच्या गौरी तृप्त झाल्या. आणि त्यांनी घराच्या कर्त्या गौरींना उदंड आशीर्वाद दिले. सोमवारी सकाळपासून गौरीच्या जेवणाची तयारी जोरात सुरू झाली. महिलांनी दोन दिवसांपासूनच गौरीच्या जेवणाची तयारी सुरू केली होती.

गौरी आणण्याच्या व गौरीच्या जेवणाच्या अनेक पद्धती आहेत. जेष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही गौरींना एकत्र प्रतिष्ठापना करून त्यांची पूजा करण्यात आली. काही घरांमध्ये सुघडावर गौरीचे मुख आणि शुभ चिन्हे रेखाटून गौरी स्वरुप म्हणून त्याची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी कलशावर श्रीफळ ठेवून तर काही ठिकाणी तेरडय़ाची रोपे आणून पाच खडय़ांसह त्याची पूजा केली जाते.

पारंपरिक पद्धतीनुसार रविवारी महिलांनी आपल्या घरी गौरींची पूजा केली. काही हौशी महिलांनी परंपरेनुसार मुखवटय़ाच्या उभ्या गौरी बसविल्या. त्यांना रेशमी वस्त्र नेसवून दागिने घालून सजविण्यात आले. त्यांच्यासमोर फराळ ठेवण्यात आला. तर काही घरांमध्ये मंडपामध्ये (मंडपी) गौरी उभ्या करून आतल्या बाजुंनी मंडपीला असलेल्या हुकामध्ये करंजी, लाडू, सानोऱया, चकली असे पदार्थ अडकविण्यात आले.

सोमवारी गौरीच्या जेवणाचा मोठा थाट उडाला. अनेकविध कोशिंबिरी, भाज्या, वडे, आंबोडे, चटण्या, सांडगे-पापड याचबरोबर पुरणपोळी, खीर, साखरभात, लाडू, मांडे असे पंचपक्वान्न तयार करून नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारी आरती झाली आणि वाळकाच्या खापेने गौरीची ओटी भरण्यात आली. सायंकाळी वाळकाची खाप आणि तांदूळ यांनी सुवासिनीनी परस्परांची ओटी भरली.

सोशल मीडियावर संदेशांची देवाणघेवाण

सोशल मीडियावर मात्र यंदा गौरीनिमित्त अनेक संदेशांची देवाणघेवाण झाली. सगळय़ाच महालक्ष्मी खूप खूप सुंदर असतात… पण, तरीही… मखरात न बसलेल्या… फक्त दोन तीन दिवसासाठीच नाही, तर वर्षानुवर्षे आपल्या संसारात खरोखर ‘उभ्या’ असलेल्या माझ्या सर्व.. मैत्रिणी, सासूबाई, नणंदा, जाऊबाई, मावशी आत्या, काकू, वहिनी, बहिणी आणि आई, तुमच्यासारख्या सगळय़ा गौरींना नमस्कार. हा संदेश विशेष लोकप्रिय झाला.

Related Stories

आता प्रत्येक तालुक्यातच कोरोना रुग्णांवर उपचार

Amit Kulkarni

अवयवदान जागृतीसाठी केएलईतर्फे सायकल फेरी

Amit Kulkarni

परीक्षा विद्यार्थ्यांची; कसरत पालकांची

Amit Kulkarni

स्मशानभूमीतील जुन्या इमारतीची स्वच्छता

Amit Kulkarni

साईराज वॉरियर्स, बीसीसी मच्छे संघ विजयी

Amit Kulkarni

पावसाची भीषण खेळी, घेतला 7 जणांचा बळी

Amit Kulkarni
error: Content is protected !!