Tarun Bharat

घर कोसळलेल्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या

Advertisements

कोणीही पैसे मागितल्यास त्यांच्यावर कारवाई करा

प्रतिनिधी/ बेळगाव

महापुरावेळी ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांना नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे. मात्र, अजूनही काही जणांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तेव्हा त्यांच्या घरांचा सर्व्हे करून कागदपत्रांची पडताळणी करून संबंधितांना नुकसानभरपाई द्यावी, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सांगितले.

काही ठिकाणी घर न पडताच नुकसानभरपाई दिली गेली आहे. याबाबत काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे कोणीही अशा प्रकारे दिशाभूल केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या अनेक जण घरांपासून वंचित आहेत. घर नसल्यामुळे ते सर्वजण भाडोत्री घरात राहत आहेत. घरासाठी ते ग्राम पंचायत तसेच नगरपंचायतमध्ये हेलपाटे मारत आहेत, अशा तक्रारी येत आहेत. तेव्हा तहसीलदारांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि संबंधितांना नुकसानभरपाई तातडीने देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली.

ग्रामीण भागामध्ये घर मंजूर झाल्यानंतर ग्राम पंचायत सदस्य तसेच अधिकारी त्या कुटुंबांकडून रक्कम उकळत आहेत. मात्र, असे प्रकार उघडकीस आल्यास त्यांच्यावर तहसीलदारांनीच कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले. महापुरामुळे अनेक जण बेघर झाले आहेत. त्यांना ती रक्कम मंजूर केलेली असते. त्या रकमेमध्ये घर बांधणे अवघड असते. तरीदेखील कुटुंबीय स्वतः काम करून घराची उभारणी करत आहेत. मात्र, काही जण घर मंजूर केले म्हणून पैसेही मागत आहेत, हे अत्यंत चुकीचे असून असा प्रकार घडू नये यासाठी तहसीलदारांनी सर्व पीडीओंना तसेच सेपेटरींना सूचना कराव्यात, असेही जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी सांगितले.

मंगळवारी पूरग्रस्तांच्या निधीबाबत अधिकाऱयांची बैठक घेतली होती. आतापर्यंत 70 टक्के पूरग्रस्तांना निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अजूनही काही कारणास्तव 30 टक्के लोकांना निधी मिळाला नाही. तेव्हा त्याचा योग्य सर्व्हे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. 

Related Stories

न्यायालयात दाद मागणार

Amit Kulkarni

जिल्हय़ात पुन्हा कडक विकेंड लॉकडाऊन

Amit Kulkarni

अवरादी येथे साडेतीन किलो गांजा जप्त

Patil_p

गळतीमुळे हजारो लीटर पाणी गटारीत

Amit Kulkarni

कृष्णा स्पिच थेरपीतर्फे उद्या कान-वाचा मोफत तपासणी शिबिर

Amit Kulkarni

खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप

Patil_p
error: Content is protected !!