Tarun Bharat

घर भाडय़ाने देताना…

भाडेकरु शोधण्याअगोदर आपल्याला घराची डागडुजी, रंगकाम करावे लागते. त्यानंतर भाडेकरुसाठी जाहीरात द्यावी लागेल किंवा एजंटची मदत घ्यावी लागेल. ही गोष्ट इथेच संपत नाही तर घर भाडय़ाने देताना कायदेशीर प्रक्रिया देखील पूर्ण कराव्या लागतात. भाडेकरु ठेवल्यानंतरही देखभालीचा खर्च, पार्किंगचा वापर, कुटुंबाची संख्या या गोष्टीचे आकलन करावे लागते.याबरोबरच इतरही काही गोष्टींचा साकल्याने विचार करावा लागतो.

 

 

जर आपण गेल्या काही वर्षात नवीन घर खरेदी केले असेल किंवा वारशाने घर मिळाले असेल किंवा मालमत्तेचे नूतनीकरण करण्यासाठी घर मोठे केले असेल आणि गुंतवणुकीच्या उद्देशाने ते घर आपल्याकडे ठेवले असेल तर सध्याचे वातावरण पाहून आपण हताश झाला असाल. कारण काही वर्षांपासून रिअल इस्टेटमधील सुस्ती पाहता घराच्या किंमती अपेक्षेने वाढलेल्या नाहीत. अर्थात अशीच परिस्थिती आणखी काही काळ बाजारात राहू शकते. अशा स्थितीत केवळ दोनच पर्याय सध्या दिसत आहेत. मालमत्ता विकणे किंवा ती भाडय़ाने देणे. घर विकायचे असेल तर तज्ञांचा सल्ला घ्या. सध्याच्या काळात मालमत्तेची मनाप्रमाणे किंमत मिळण्याची शक्मयता ही कमीच आहे. त्यापेक्षा ते घर भाडय़ाने देणे फायद्याचे ठरु शकते. परिणामी आपल्याला दरमहा थोडाफार पैसा (मालमत्तेच्या एकूण किंमतीच्या वार्षिक दोन ते तीन टक्के) मिळण्यास हातभार लागेल.

घर भाडय़ाने द्यायचे की नाही: आपली मालमत्ता भाडय़ाने द्यायची की नाही हे अगोदर निश्चित करा. आपले घर भाडय़ाने देण्याचा निर्णय हा नेहमीच सोपा ठरत नाही. जर आपल्याला वारशाने घर मिळाले असेल तर त्या घराशी आपल्या भावना जोडलेल्या असतात. अशा स्थितीत ते घर भाडय़ाने देताना कठिण जावू शकते. तसेच अशा भावनेतून बाहेर येण्यासाठी बराच काळ जातो. त्याचबरोबर भाडेकरु शोधण्याअगोदर आपल्याला घराची डागडुजी, रंगकाम करावे लागते. त्यानंतर भाडेकरुसाठी जाहीरात द्यावी लागेल किंवा एजंटची मदत घ्यावी लागेल. ही गोष्ट इथेच संपत नाही तर भाडय़ाने देताना कायदेशीर प्रक्रिया देखील पूर्ण कराव्या लागतात. भाडेकरु ठेवल्यानंतरही देखभालीचा खर्च, पार्किंगचा वापर, कुटुंबाची संख्या या गोष्टीचे आकलन करावे लागते. त्याचबरोबर आपत्कालिन स्थितीचा सामना करण्यासाठी त्याच्याशी सतत संपर्क ठेवावा लागतो. जर या गोष्टी करण्यास आपण तयार असाल तर घर भाडय़ाने देण्यासाठी पाच गोष्टींवर अंमल करणे गरजेचे आहे.

भाडे निश्चित करणे: आपल्या घरापासून किती भाडे मिळणे अपेक्षित आहे, हे निश्चित करणे आवश्यक आहे. घराचे ठिकाण आणि मालमत्तेचा आकार यावर भाडे अवलंबून असते. त्या आधारावर भाडे निश्चित करावे. बाजारापेक्षा विपरित भाडे असणे चुकीचे आहे. भाडे निश्चित करण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. लोकेशन, सुविधा, शेजारी, पायाभूत सुविधा, शाळा, कॉलेज, दवाखाना आदी. घर सुस्थितीत असेल तर भाडेही चांगले मिळते. जुन्या घरावर पैसे खर्च करुन नवीन लूक दिल्यास अपेक्षेप्रमाणे भाडे मिळू शकते. मात्र खर्च केल्यानंतर आपल्या पदरात पुरेसा लाभ पडणार आहे काय? याचाही विचार करावा.

भाडेकरु आणि कालावधी: आपल्याला कोणत्या प्रकारचा भाडेकरु हवा, याबाबत स्पष्टता असावी. त्याचबरोबर त्यास किती कालावधीसाठी घर द्यायचे आहे, याचेही आकलन करावे. विद्यार्थी, कुटुंब, खासगी फर्म, नोकरदार, डॉक्टर, इंजिनिअर आदी प्रकारच्या श्रेणीतील भाडेकरु असतात. बहुतांश घरमालक कुटुंबालाच घर देण्यास प्राधान्य देतात. कारण यामुळे घर सुस्थितीत राहण्यास हातभार लागतो. तसेच सोसायटीच्या नियमाप्रमाणेच भाडेकरु ठेवावे लागतात. नियमित भाडे देण्याची क्षमता असणाऱया मंडळींनाच घर भाडय़ाने देणे हिताचे आहे. यासाठी सरकारी नोकरदार, उच्च वेतनमान असणाऱया खासगी कंपनीतील अधिकारी आदी.

भाडेकरार: किरकोळ उत्पन्नाच्या बदल्यात लाखमोलाची मालमत्ता भाडेकरुच्या हाती सोपवण्यास काही घर मालक तयार नसतात. साधारणपणे भारतात निवासी मालमत्तेतून मिळणारे भाडे हे त्याच्या किंमतीच्या दोन ते तीन टक्के असते. अनोळखी आणि परगावातील व्यक्तीला घर भाडय़ाने देणे हे जोखमीचे आणि अडचणीचे ठरते. यातून मालमत्तेचे नुकसान, भाडे नियमित नसणे, वेळेत घर सोडण्यास नकार आदी प्रश्न निर्माण होतात. अशा स्थितीतून वाचण्यासाठी घर मालकांनी भाडेकरार करणे गरजेचे आहे. यावरून मालक आणि भाडेकरु यांच्यातील संबंध चांगले राहतात आणि जबाबदारी निश्चित होते. याशिवाय अनामत रक्कमेचाही उल्लेख करणे गरजेचे आहे.

अटींचा उल्लेख: चांगला आणि अनुकुल भाडेकरु मिळाल्यानंतर आपण त्याच्याशी अटी आणि नियमाबाबत चर्चा करावी. भाडेकरारात नमूद असलेल्या विविध अटी आणि नियमांचे काळजीपूर्वक आकलन करावे. जर गरज भासल्यास त्यात बदल करावा आणि नोंदणीकृत करण्यासाठी शेवटचे रेंट अ‍Ÿग्रीमेंट करावे. भाडेकरारनाम्याला कायदेशीर वैधता मिळण्यासाठी नोटरीकडून साक्षांकित करणे आवश्यक आहे. जर एखादा भाडेकरु नियमित भाडे देत नसेल किंवा घर सोडत नसेल तर अशा स्थितीत कागदपत्रे आपली मदत करतात. याशिवाय भाडेकरु ठेवताना त्याची पार्श्वभूमी तपासून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

नियमित तपासणी: भाडय़ाने घर दिल्यानंतर आपली जबाबदारी संपली असे नाही. घराच्या स्थितीचे सतत आकलन करा. महिन्याकाठी किंवा तीन महिन्यातून एकदा घराला भेट द्या. शेजारील व्यक्तींकडून भाडेकरुच्या वर्तनाबाबत माहिती घेत राहा. याशिवाय वीज बिल, कॉमन बिल आदी वेळेवर भरत आहे की नाही, याचेही आकलन करावे लागते.

कमलेश

Related Stories

बांधकाम क्षेत्र संकटातून बाहेर येईल

Patil_p

भरती प्रक्रिया

Patil_p

प्रधानमंत्री आवास योजनेची गती आणि अनुदानाचा लाभ

Patil_p

लक्झरी घरे झाली स्वस्त

Patil_p

डिपेंडेंट फ्लोअर’ एक चांगला पर्याय

Patil_p

लिव्हिंगरूम सजावटीतल्या टाळायच्या चुका

Patil_p
error: Content is protected !!