Tarun Bharat

घाईघाईने निर्बंध शिथिल करून धोका पत्करू नका : उद्धव ठाकरे

  • ‘या’ सात जिल्ह्यांनी अधिक काळजी घ्यावी 


ऑनलाईन टीम / मुंबई : 


कोरोना संसर्गाची दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. त्यातच डेल्टा प्लस या विषाणूचा देखील धोका वाढत आहे. त्यामुळे  संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात आरोग्य विभागाने आरोग्य सुविधांबाबत सर्व जिल्ह्यांत नियोजन करून द्यावे. यामध्ये किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील, याबाबत नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले आहेत. 


कोरोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज ते दूरचित्र प्रणालीद्वारे झाले बैठकीत बोलत होते. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते.


ते म्हणाले,  दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या असल्या तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे. 


पुढे ते म्हणाले, दुसऱ्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आतापासून करून ठेवावा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधे व इतर आवश्यक वैद्यकीय सामग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फिल्ड रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करणे आवश्यक आहे. 


राज्यातील या 7 जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंतेचा विषय बनू शकते. यातील 3 जिल्हे कोकण, 3 पश्चिम महाराष्ट्र आणि एक मराठवाड्यातील जिल्हा आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चाचणी, तसेच ट्रेसिंग व लसीकरण करण्यावर भर दिला जाईल. तसेच या जिल्ह्यांना यासंदर्भात आवश्यक त्या सुविधाही पुरविण्यात येतील, असे यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले. 


यावेळी बोलताना टास्क फोर्सचे डॉ संजय ओक आणि डॉ शशांक जोशी यांनी सांगितले की, या सातही जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. या विषाणूची लक्षणेही बदलत आहेत. लसीकरणाविषयी नागरिकांच्या मनातील भ्रामक कल्पना व समजुती काढून घेऊन त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे खूप आवश्यक आहे. प्रसंगी अधिक कडक निर्बंधही लावावे लागणार आहेत.


याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच फिरत्या प्रयोगशाळा पुरविण्याची विनंती केली. तसेच गावोगावी कोरोनामुक्तीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

Related Stories

अनिल देशमुख सीबीआय चौकशीसाठी दाखल

Archana Banage

उचगावात बंद घराचे कुलूप तोडून सव्वादोन लाखांची चोरी

Abhijeet Khandekar

उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक

datta jadhav

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 18.80 लाख पार

Tousif Mujawar

ठरलं! कसबा, चिंचवडसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

datta jadhav

राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला

datta jadhav
error: Content is protected !!