ऑनलाईन टीम / पुणे :
मोगरा, झेंडू, गुलाब, ऑर्किड आणि चाफ्याच्या फुलांचा सुगंध… श्री स्वामी महाराजांच्या मूर्तीला चंदन उटीचे लेपन करण्यासोबतच घातलेली पुष्पवस्त्रे आणि विविधरंगी विद्युतरोषणाने मंडईतील श्री स्वामी समर्थ मठ सजला होता. मोग-याच्या शेकडो फुलांची आकर्षक आरास चंदन उटी व मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने मठामध्ये करण्यात आली.
मंडईजवळील रामेश्वर चौकातील श्री अक्ककोट स्वामी महाराज संस्थानच्या श्री स्वामी समर्थ मठातर्फे मोगऱ्याच्या बोटीची आकर्षक आरास करण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष गजानन जेधे, खजिनदार संदीप होनराव, विश्वस्त रवींद्र शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सजावट संपन्न झाली. अॅड.भालचंद्र भालेराव व श्रीकृष्ण केसकर या ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत चंदन उटी व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले.


कमलेश कामठे म्हणाले, रामेश्वर चौकातील श्री अक्ककोट स्वामी महाराज संस्थानच्या श्री स्वामी समर्थ मठात दरवर्षी चंदन उटी व मोगऱ्याच्या फुलांची आरास केली जाते. शेकडो भाविक ही आरास पाहण्याकरीता येतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने साधेपणाने आरास करण्यात आली. स्वामी महाराजांच्या मूर्तीला घालण्यात आलेला अंगरखा, बाजूबंद, कंठी, वाकी आणि मुकुट लक्ष वेधून घेत होता.
आदिमाया प्रतिष्ठान ट्रस्ट स्वामी भक्त परिवारातर्फे ही आरास करण्यात आली. तसेच गुरुमाऊली भजनी मंडळ व दीपक वाईकर यांच्या पुढाकाराने 108 गरजूंना धान्य किट आणि स्वामी समर्थ भजनी मंडळ व जयवंत कामठे यांच्या पुढाकाराने 51 गरजूंना धान्य किट देण्यात आले. संस्थानच्या फेसबुक पेजवरुन भाविकांना घरबसल्या ही मोगऱ्याची आरास व चंदन उटी पाहता येणार आहे.