Tarun Bharat

चक्क उन्हाळय़ात बरसला अवकाळी पाऊस

जोरदार पावसाने तालुक्मयाला झोडपले : रब्बी हंगामातील पिकांचे-भाजीपाल्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान : बळीराजा संकटात

वार्ताहर / किणये

तालुक्मयाला गुरुवारी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. चक्क उन्हाळय़ात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रब्बी हंगामातील पिकांसह, भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे

 गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व धुक्मयाच्या प्रमाणात वाढ झाली होती. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण दिसून येत होते. दुपारी मेघगर्जनेसह तालुक्मयाच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या काही भागातील रस्त्यांवर पाणी वाहत होते. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली होती.

अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील  वाटाणा, हरभरा, मसूर, ज्वारी, मोहरी आदी पिकांसह भाजीपाल्याचे बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा आर्थिक संकटात सापडलेला आहे.

तालुक्मयाच्या पश्चिम भागात गुरुवारी पहाटेच रिमझिम पावसाने हजेरी लावली.  यामुळे शेतकरी वर्गाला काळजी लागून राहिली होती. गुरुवारी दुपारी मात्र तालुक्मयाच्या सर्रास भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्यामुळे शेतकऱयांची चिंता अधिक वाढली आहे.

कडधान्य पिकाचे मोठे नुकसान

रब्बी हंगामातील पिकांचा सुगीहंगाम चालू असतानाच अवकाळी पाऊस झाला असल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मच्छे, पिरनवाडी, नावगे, बस्तवाड, हलगा, धामणे ,नागेनट्टी पूर्व भाग, कडोली, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, काकती, होनगा, जाफरवाडी आदी भागातील मसूर, वाटाणा, हरभरा, ज्वारी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ही पिके हातातोंडाला आली असतानाच अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

ज्वारी पिकाची कणसे काळी पडण्याची भीती

तालुक्मयाच्या तारिहाळ, अगसगे आदी परिसरात ज्वारीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. ज्वारीची कणसे बऱयापैकी भरून आली होती. अशा वेळेलाच मुसळधार पावसाने झोडपल्यामुळे ज्वारीची कणसे खराब होऊन काळपट पडणार असल्याची चिंता ज्वारी उत्पादक शेतकऱयांना लागून राहिली आहे.

सुका चारा झाकताना उडाली तारांबळ

बहुतांशी शेतकरी जनावरांसाठी लागणारा सुका चारा आपापल्या घराच्या पाठीमागील परसात ठेवतात. काही शेतकरी सुका चारा आणून गवत गंजी तयार करीत होते. मात्र गुरुवारी अचानक झालेल्या पावसामुळे गवत गंजीवर ताडपत्री टाकताना बऱयाच शेतकऱयांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे घरातून काही कामानिमित्त बाहेर  गेलेल्या नागरिकांना मात्र घरी परतताना पावसात भिजून घरी यावे लागेल. तसेच काही महाविद्यालयीन तरुण व तरुणांनी या अवकाळी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. देसूर परिसरात विटांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. सध्या विटांची भट्टी लावण्याचे काम व वीट काढण्याचे काम जोमाने सुरू आहे. मात्र अवकाळी पाऊस झाला असल्यामुळे वीट व्यावसायिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

काकती परिसरात पाऊस

काकतीत अवकाळी पावसाच्या जोरदार सरींनी झोडपल्याने मसूर, वाटाणा या कडधान्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. हातातोंडाशी आलेले कडधान्य पीक मातीमोल होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

गुरुवारी पावणेतीनच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरींनी काकती शिवाराला झोडपून काढले. गेले 15 दिवस वाटाणा, मसूर आदी कडधान्य काढणीच्या कामात शेतकरी मग्न होता. वाटाणा, मसूर काढण्यासाठी लहान मुलांसह भल्या पहाटे शेतावर जात होता. ज्वारी, मसूर 300 एकरातील तर वाटाणा 250 एकरातील कडधान्याचे पीक काढणी करीत होता. यापैकी काही शेतकऱयांनी खळय़ात ताडपत्री टाकून ठेवली होती. काहींची पावसाला सुरुवात होताच झाकण्यासाठी तारांबळ उडाली. तर मोजक्या शेतकऱयांनी मळणी केली होती. तर मोठय़ा प्रमाणात मसूर काढून तशीच शिवारात ठेवण्यात आली होती. परिणामी पावसाचे पाणी मुरून कडधान्य काळे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी मसूर, वाटाण्यात पाणी मुरल्याने अशा कडधान्याला भावही मिळणार नाही.

यंदा कडधान्य पिकांना मावळता वारा नसल्याने हवामानाचा मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. अशा बिकट परिस्थितीत काढणी व मळणीच्यावेळी अवकाळी पाऊस तब्बल एक तास सुरूच होता. कडधान्य पिकांसाठी खर्च करण्यात आलेली रक्कम देखील हाती लागणार नाही. या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे. तर काही शेतकऱयांनी मिरची रोपाचीही लागवड चार दिवसात केली आहे. मात्र पावसाचे पाणी या पिकात साचून रोप कोलमडून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Stories

धामणे (एस) येथे टस्कराचा धुमाकूळ

Patil_p

अटीतटीच्या लढतीत अरविंद पाटील विजयी

Patil_p

राष्ट्रीय स्पर्धेत इंडियन कराटे क्लबला सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni

मच्छे येथील माजी सैनिक सेवा संघाला देणगी

Amit Kulkarni

पथदीप देखभाल करण्याची जबाबदारी मनपाचीच

Patil_p

बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

Tousif Mujawar