प्रतिनिधी/ सातारा
दर चार वर्षांनी होणाऱया चतुर्थ वार्षिक पाहणीचे कामकाज सातारा पालिकेकडून सुरु आहे. हे काम अतिशय कासवगतीने सुरु आहे. विभाग प्रमुख प्रशांत खटावकर हे कधी त्यांच्या केबीनम्ध्ये सापडणे अवघड बनले आहे. चतुर्थ वार्षिक पाहणी पत्रावर दुसऱया कोणाचे नाव लागू नये, योग्य आकारणी व्हावे आदी विविध तक्रारी दररोज वसुली विभागात येतात. परंतु त्या तक्रारींचे निकारण करण्यासाठी या विभागात अनुभवी व्यक्ती नसल्याने नागरिक थेट नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे जात आहेत. दरम्यान, अतिरिक्त मुख्याधिकारी कोडुगले यांनी आयोजित केलेल्या बैठकीला वसुली अधीक्षकांनी दांडी मारली आहे.
सातारा शहराची तब्बल आठ वर्षानतर होत असलेली चतुर्थ वार्षिंक पाहणी वेगाने आणि नियोजन बद्द होणे अपेक्षित आहे. परंतु वसुली विभागाचे प्रमुख प्रशांत खटावकर यांच्याकडे कारभार असून त्यांच्याकडून नियोजन झाले असले तरीही त्यांच्या घरगुती अडचणीमुळे ते सतत गैरहजर असतात. त्यामुळे नागरिकांना आपल्या तक्रारी घेवून नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे जावे लागते. अशा तक्रारी जाताच वसुली विभागामध्ये त्या तक्रारीचे निकारण करण्यासाठी अनुभवी कोण आहे का याची विचारणा केली जाते तेव्हा जाग्यावर कोणीच नसल्याचे उत्तर येते त्यामुळे पदाधिकारीही वैतागून जात आहेत. दरम्यान, शुक्रवारीही पालिकेचे वसुली अधीक्षक प्रशांत खटावकर हे घरगुती कारणे सांगून गायब झाले होते.