Tarun Bharat

चर्चेदरम्यान चीनने वाढविले सैनिक

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 20 हजार सैनिकांची भर : भारताकडून प्रत्युत्तरादाखल सज्जता, तणाव कायम राहणार

वृत्तसंस्था/ लडाख

लडाखच्या सीमावर्ती भागातील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान राजनयिक आणि सैन्यपातळीवर चर्चा सुरू आहे, परंतु पूर्व लडाखमध्ये चीन स्वतःच्या सैनिकांची संख्या वाढवत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक चीनने 20 हजार सैनिक वाढविले आहेत. तर शिनजियांगमध्ये सैन्यवाहने आणि शस्त्रास्त्रांचा साठा करण्यात आला आहे. शिनजियांगमधून भारतीय सीमेपर्यंत 48 तासांमध्ये पोहोचता येणार आहे. दुसरीकडे भारतानेही प्रत्युत्तरादाखल पावले उचलली आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबरदरम्यान या भागात हिमवृष्टीस प्रारंभ होतो, त्यापूर्वी स्थिती सुधारणे अवघड असल्याचे मानले जात आहे.

चिनी सैन्याच्या प्रत्येक हालचालींवर भारत नजर ठेवून आहे. 6 आठवडय़ांपासून चर्चा सुरू असली तरीही चिनी सैनिकांची संख्या आणि शस्त्रास्त्रांची तैनात कमी होण्याऐवजी वाढविली जात आहे. तिबेट क्षेत्रात चीनने यंदा 20 हजार सैनिक वाढविल्याची माहिती समोर येत आहे.

चीनने दोन सैन्यतुकडय़ा वाढविल्याने भारतीय सैन्यानेही या क्षेत्रासाठी  दोन डिव्हिजन वाढविले आहेत. रणगाडे आणि बीएमपी-2 इन्प्रंटीसह कॉम्बॅट व्हेईकलही हवाईमार्गे आणण्यात आले आहे. दौलत बेग ओल्डी म्हणजेच डीबीओमध्ये आर्म्ड ब्रिगेडने मोर्चा सांभाळला आहे. सद्यकाळात पूर्व लडाखमध्ये सुरक्षेची जबाबदारी त्रिशूल इन्प्रंटी डिव्हिजनकडे आहे. तेथे त्याच्या तीन ब्रिग्रेड तैनात आहेत. चीन डीबीओपासून गलवान आणि काराकोरमपर्यंत पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असल्याने भारताने आणखी एक डिव्हिजन तैनात करण्याचा विचार चालविला आहे.

पेंगाँग सरोवरात मोठी नौका

पेंगाँग सरोवरापासून काही अंतरावर फिंगर 4 भाग असून तेथेच चिनी सैन्याने ठाण मांडल्याचे समजते. सरोवरात गस्त घालण्यासाठी चीनने मोठय़ा आकाराच्या नौका वापरण्यास प्रारंभ केला आहे. फिंगर 5 ते 8 दरम्यान चीनने रस्ताही तयार केला आहे. सरोवरानजीक चीन सैन्य सुविधा निर्माण करू पाहत आहे.

दीर्घकाळ चालणार तणाव

18 आणि 19 जून रोजी पेंगाँग सरोवरानजीक चीनचे सुमारे 2,500 सैनिक होते, त्यावेळी भारताचे तेथे केवळ 200 सैनिक तैनात होते. फिंगर 3 क्षेत्राच्या पुढे भारतीय सैनिकांनी गस्त घालू नये असा चीनचा प्रयत्न आहे. दोन्ही देशांदरम्यान सैन्य आणि कूटनीनिक पातळीवर पेंगाँग सरोवरासंबंधी चर्चा सुरू आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हिमवृष्टी सुरू होण्यापूर्वी तणाव कमी होणार नसल्याचे तज्ञांचे मत आहे. तणाव दीर्घकाळ राहण्याच्या दृष्टीने भारतानेही संरक्षण सज्जता वाढविली आहे.

पाकिस्तान कटात सामील

लडाख सीमेवर चीनने पुन्हा एकदा विश्वासघाताचे काम केले आहे. भारतासोबत चर्चा सुरू असतानाच चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 20 हजार सैनिक तैनात करत स्वतःच्या कटात पाकिस्तानला सामील केल्याचे मानले जात आहे. तर पाकिस्तानने चीनला कपटाला साथ देत गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये नियंत्रण रेषेनजीक 20 हजार सैनिक तैनात केले आहेत.   पाकिस्तानच्या मदतीने चीन भारतावर दबाव निर्माण करू पाहत आहे, परंतु भारतीय सैन्याने सिद्धता वाढवत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Related Stories

जमात-ए-इस्लामी विरोधात एनआयएचे छापे

Amit Kulkarni

हिंदू-शिखांच्या हत्येवर मौन बाळगणाऱयांना सुनावले

Patil_p

महाकवी नाटककार शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’(29)

Patil_p

आंतरराष्ट्रीय विमान सेवा 27 पासून सुरु

Patil_p

देशात 36 हजार रुग्णांना डिस्चार्ज

Patil_p

पौर्णिमा तिवारी यांची इंटरनेट भरारी

Patil_p