Tarun Bharat

चहलला क्रीझचा आणखी उत्तम लाभ घेता येईल

Advertisements

पाकिस्तानचा माजी फिरकीपटू मुश्ताक अहमदचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर यजुवेंद्र चहल हा सर्वोत्तम लेगस्पिनर्सपैकी एक आहे. पण, क्रीझचा अधिक उत्तम उपयोग करुन घेतला तर तो आणखी सरस, आणखी परिणामकारक ठरु शकेल, असे प्रतिपादन पाकिस्तानचा माजी फिरकीपटू मुश्ताक अहमदने केले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चहलसह ऑस्ट्रेलियाचा ऍडम झाम्पा व पाकिस्तानचा शदाब खान अव्वल फिरकीपटू वाटतात, असे तो म्हणाला.

‘चहल परिणामकारक ठरतो आहे. अर्थातच, तो जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे आणि माझ्या मते तो आणखी परिणामकारक ठरण्यास निश्चितच जागा आहे’, असे अहमद वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला. 1992 विश्वचषक जेत्या पाकिस्तान संघाचा सदस्य राहिलेल्या 49 वर्षीय मुश्ताक अहमदने आपल्या कारकिर्दीत 52 कसोटी व 144 वनडे सामने खेळले आहेत.

जगभरातील विविध ठिकाणी प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडलेला अहमद सध्या पाकिस्तानमधील त्याच्या प्रथमश्रेणी संघाचा कार्यभार सांभाळत आहे. ‘मधल्या षटकात चहल व कुलदीप यादव ठरावीक अंतराने बळी घेण्यात यशस्वी होत असल्याने ही बाब भारताच्या पथ्यावर पडत आहे आणि तेच गेमचेंजर ठरत आहेत’, असे निरीक्षण अहमदने पुढे नोंदवले. चहल व कुलदीप 2017 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स चषकानंतर भारतीय संघात दाखल झाले. पण, त्यानंतर या दोघांना एकत्रित खेळण्याची क्वचितच संधी मिळाली.

‘माझ्या मते चहल चेंडू टाकताना क्रीझच्या आणखी वाईड (बाहेरील बाजूने)  जाऊ शकतो. अशा प्रकारे चेंडूची दिशा बदलत फलंदाजांना चकवा देण्याची शक्यता आणखी वृद्धिंगत होते. खेळपट्टी सर्वांनाच कळते आणि पाटा खेळपट्टी असेल तर स्टम्पच्या रोखाने सातत्यपूर्ण मारा करणे अधिक उपयुक्त ठरते. क्रीझवर वाईड जात गुगली टाकला तर तो फलंदाजाच्या अपेक्षेप्रमाणे वळत नाही आणि अशा परिस्थितीत विकेट मिळण्याची शक्यता आणखी वाढते’, याचा अहमदने पुढे उल्लेख केला.

चहलने 52 वनडे सामन्यात 25.83 च्या सरासरीने 91 तर 42 टी-20 सामन्यात 24.34 च्या सरासरीने 55 बळी घेतले आहेत. त्याचे चेंडू फारसे वळत नाहीत. पण, गोलंदाजीतील वैविध्याच्या बळावर यश खेचून आणण्यात तो यशस्वी ठरत आला आहे.

चहल-कुलदीपसाठी धोनीचे मार्गदर्शन सर्वात निर्णायक!

चहल व कुलदीप यांना यष्टीमागे तैनात महेंद्रसिंग धोनीचा भरपूर लाभ मिळाला आहे, याचाही मुश्ताक अहमदने येथे आवर्जून उल्लेख केला. तो म्हणाला, ‘गोलंदाजाने फलंदाजापेक्षा एक पाऊल पुढे असायला हवे. माझ्या मते आक्रमक क्षेत्ररक्षण तैनात करुन फलंदाजांवर दडपण आणणे ही रणनीती सर्वाधिक यशस्वी होते. भारतीय संघ गोलंदाजांचा पद्धतशीर उपयोग करुन घेतो आणि याचमुळे तिन्ही क्रिकेट प्रकारात ते अधिक यशस्वी होत आहेत. धोनी भारतीय गोलंदाजांसाठी टीप्स देण्यात मास्टर राहिला आणि आता तीच जबाबदारी विराटच्या खांद्यावर आहे. प्रत्येक संघात लेगस्पिनर व गूढ फिरकीपटू असायलाच हवेत, असे माझे मत आहे. सध्याच्या फलंदाजांना जलद गोलंदाजी खेळणे अधिक पसंत असते. फिरकी मारा लावत अशा गोलंदाजांना रोखणे त्या तुलनेत अधिक सोपे ठरते. पुढील 10-15 वर्षात याचे प्रमाण आणखी पहायला मिळू शकेल’.

Related Stories

रुमानियाचा डेव्हिड पोपोविसीचा नवा विश्वविक्रम

Patil_p

पाकचा दक्षिण आफ्रिकेवर मालिका विजय

Patil_p

ब्रिटनची रॅडुकानू उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

भारतीय क्रिकेट संघाचे हेडिंग्लेत आगमन

Patil_p

इशा सिंग, सौरभ चौधरी यांना नेमबाजीत सुवर्ण

Patil_p

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील 55 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

Patil_p
error: Content is protected !!