Tarun Bharat

चहापानाअखेर इंग्लंड 36 धावांनी आघाडीवर

Advertisements

भारताविरुद्ध चौथी कसोटी, दुसरा दिवस – ओलि पोपचे शानदार अर्धशतक, इंग्लंडची 7 बाद 227 पर्यंत मजल

लंडन / वृत्तसंस्था

ओलि पोपच्या शानदार नाबाद अर्धशतकामुळे इंग्लंडने येथील चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारतावर आघाडी मिळवण्यात यश संपादन केले. शुक्रवारी सामन्याच्या दुसऱया दिवशी चहापानाअखेर यजमान संघाने 7 बाद 227 धावांपर्यंत मजल मारली. यावेळी ते 36 धावांनी आघाडीवर होते.

प्रत्येक सत्रागणिक फलंदाजीला अधिक अनुकूल होत चाललेल्या खेळपट्टीवर भारतीय जलद-मध्यमगती गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखू शकले नाहीत. चहापानासाठी खेळ थांबवला गेला, त्यावेळी पोप 143 चेंडूत 74 तर ख्रिस वोक्स 7 चेंडूत 4 धावांवर खेळत होते.

पहिल्या सत्रात सिराजने जॉनी बेअरस्टोला (37) नीप बेकर या आपल्या स्टॉक बॉलवर तंबूचा रस्ता दाखवला. उपाहारानंतर पाचव्या षटकात त्याने हे यश मिळवले आणि बेअरस्टो-पोप यांची 89 धावांची भागीदारी अखेर मोडीत काढली गेली. पोपने नंतर मोईन अलीसमवेत (35) आणखी 71 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. यावेळी सेट झालेल्या मोईनने जडेजाच्या गोलंदाजीवर अतिशय खराब फटका खेळत आपली विकेट जणू बहाल केली. त्याचा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न सपशेल फसल्यानंतर कव्हरवरील रोहितने सोपा झेल टिपला. वास्तविक, बुमराहच्या गोलंदाजीवर मोईनला पायचीत होत परतावे लागले असते. पण, भारताने मैदानी पंचांच्या निर्णयावर रिव्हय़ू घेतला नाही.

पोपचे सहावे अर्धशतक

पोपने कारकिर्दीतील सहावे अर्धशतक साजरे करताना फ्लिक व पूलचे काही लक्षवेधी फटके लगावले. सकाळच्या सत्रात उमेश यादवने पहिल्या तासाभरात इंग्लंडला दुहेरी झटके दिले व नंतरच बेअरस्टो-पोप यांनी इंग्लंडला उपाहारापर्यंत 5 बाद 139 पर्यंत नेले. इंग्लंडने 25 षटकांच्या सत्रात 86 धावा केल्या.

9 महिन्यानंतर पहिलीच कसोटी खेळत असलेल्या उमेश यादवने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये लक्षवेधी मारा साकारला. गुरुवारी जो रुटला बाद करत त्याने आपली भेदकता प्रत्यक्षात साकारुन दाखवली होती. शुक्रवारी दिवसातील पहिल्याच षटकात त्याने नाईट वॉचमन क्रेग ओव्हर्टनला बाद करत 150 वा कसोटी बळी नोंदवला. ओव्हर्टनने पहिल्या स्लीपमधील विराट कोहलीकडे सोपा झेल दिला.

डेव्हिड मलानने (67 चेंडूत 31) उमेश गोलंदाजीला येईतोवर उत्तम फलंदाजी साकारली होती. मात्र, नंतर मलानला उमेशने दुसऱया स्लीपमधील रोहितकरवी झेलबाद केले आणि इंग्लंडची यावेळी 5 बाद 62 अशी दैना उडाली.

दुसऱया बाजूने बुमराहने इंग्लिश फलंदाजांवर आणखी दडपण आणले. यामुळे, इंग्लंडला पहिल्या तासाभरात 12 षटकात केवळ 25 धावांवर समाधान मानावे लागले. ड्रिंक्स ब्रेकनंतर मात्र शार्दुलच्या एकाच षटकात पोपने 4 चौकार फटकावल्यानंतर इंग्लंडला दडपण झुगारुन टाकण्यात यश आले. नंतर बेअरस्टोनेही सिराजला 3 चौकार फटकावत धावांची आणखी आतषबाजी केली. या मालिकेत पहिलाच सामना खेळत असलेल्या पोपने येथे आत्मविश्वासाने फलंदाजी साकारली. उपाहारापूर्वी शेवटच्या 3 षटकात जडेजाने 2 नोबॉल टाकले होते.

धावफलक (चहापानापर्यंत)

भारत पहिला डाव ः सर्वबाद 191

इंग्लंड पहिला डाव ः रोरी बर्न्स त्रि. गो. बुमराह 5 (11 चेंडू), हसीब हमीद झे. पंत, गो. बुमराह 0 (12 चेंडू), डेव्हिड मलान झे. शर्मा, गो. यादव 31 (67 चेंडूत 5 चौकार), जो रुट त्रि. गो. यादव 21 (25 चेंडूत 4 चौकार), क्रेग ओव्हर्टन झे. कोहली, गो. यादव 1 (12 चेंडू), ओलि पोप खेळत आहे 74 (143 चेंडूत 6 चौकार), जॉनी बेअरस्टो पायचीत गो. सिराज 37 (77 चेंडूत 7 चौकार), मोईन अली झे. शर्मा, गो. जडेजा 35 (71 चेंडूत 7 चौकार), ख्रिस वोक्स खेळत आहे 4 (7 चेंडूत 1 चौकार). अवांतर 19. एकूण 70 षटकात 7 बाद 227.

गडी बाद होण्याचा क्रम

1-5 (बर्न्स, 3.2), 2-6 (हमीद, 3.6), 3-52 (रुट, 15.3), 4-53 (ओव्हर्टन, 18.4), 5-62 (मलान, 24.3), 6-151 (बेअरस्टो, 46.5), 7-222 (मोईन अली, 67.2).

गोलंदाजी

उमेश यादव 17-2-70-3, बुमराह 17-6-33-2, शार्दुल 12-2-39-0, सिराज 12-4-42-1, रविंद्र जडेजा 12-1-29-1.

सत्रनिहाय खेळ

सत्र / षटके / धावा / बळी / सरासरी

पहिले / 25 / 86 / 2 / 3.44

दुसरे / 28 / 88 / 2 / 3.14

Related Stories

रास दांडिया मध्येही थिरकली तरुणाई

mithun mane

कोलकाता-हैदराबादसाठी करो वा मरो

datta jadhav

कोरोना समस्येमुळे दोन बॅडमिंटनपटूंची माघार

Patil_p

2023 विश्वचषकासाठी फिंचची तयारी सुरु

Patil_p

विद्यमान विजेत्या तामिळनाडूसमोर कर्नाटकचे तगडे आव्हान

Patil_p

आय लीगमधील दोन फुटबॉलपटूंना कोरोनाची बाधा

Patil_p
error: Content is protected !!