Tarun Bharat

चांगल्या कामगिरीची दखल घेणार!

जिल्हय़ातील पोलिसांच्या कामगिरीचे दीक्षितकुमार गेडाम यांनी केले कौतुक

  • पोलीस करीत आहेत

क्षमतेपेक्षाही जास्त काम ताण कमी करण्यासाठी उपाययोजना

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात सिंधुदुर्ग पोलिसांची कामगिरी खरोखरच उत्तम आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की, जर हे पोलीस रस्त्यावर उतरलेच नसते, जिल्हय़ाच्या सीमा रोखून धरल्या नसत्या अथवा बळाचा वापर केला नसता, तर आज जिल्हय़ाबाहेरून हजारो माणसे या जिल्हय़ात घुसली असती. तसे झाले असते, तर आजच्या घडीला हा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात आपल्याला जे यश प्राप्त झालंय, ते अजिबात झालं नसतं. पूर्ण जिल्हा धोक्यात आला असता. या पोलिसांमुळेच आपण सुरक्षित आहोत. पोलीस हा देखील शेवटी तुमच्या-आमच्यातला माणूसच आहे. त्यालाही त्याची, त्याच्या कुटुंबाची चिंता ही असणारच. अशा परिस्थितीतही कामाचा प्रचंड ताण घेऊन तो खंबीरपणे कर्तव्य बजावत आहे. त्याच्या या कामगिरीलाही दाद देणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

 पोलिसांच्या या कामगिरीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेतली असता ते म्हणाले, ‘पोलीस हा देखील तुमच्या-आमच्यासारखा हाडामासाचाच माणूस आहे. त्यालाही ताण, तणाव भावना स्वत:च्या कुटुंबाची काळजीही असणारच. त्याच्यावर कामाचा खूप ताण पडलाय. अशाही परिस्थितीत तो तुमच्या-आमच्यासाठी उन्हातान्हात चोवीस तास राबतोय. क्षमतेपेक्षाही अधिक काम करतोय. तो बाहेर खंबीरपणे उभा आहे म्हणून आपण सर्वजण घरात सुरक्षित आहोत. माझ्या या सहकाऱयांचा त्याग, मेहनत मी फुकट जाऊ देणार नाही. प्रत्येकाच्या चांगल्या कामाची दखल निश्चितपणे घेतली जाईल. जनतेनेही ती घ्यावी, अशी आपली अपेक्षा आहे.’

पोलिसांवर अतिरिक्त ताण

जिल्हय़ातील पोलिसांवर पडलेल्या अतिरिक्त ताणाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, आंगणेवाडी यात्रा बंदोबस्त, त्यानंतर कुणकेश्वर यात्रा बंदोबस्त, त्यापाठोपाठ मुख्यमंत्री दौरा, मंत्र्यांची बैठक या लागोपाठच्या बंदोबस्त ताणातून बाहेर पडण्यापूर्वीच ही कोरोनाची आपत्ती आली आणि त्यात या दीर्घ बंदोबस्तासाठी पोलिसांना रुजू व्हावे लागले. विश्रांतीची थोडीही संधी मिळाली नाही. मात्र तरी देखील कोणतीही तक्रार न करता माझे हे सहकारी बांधव उन्हातान्हात, दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनामुळे माझे हे बांधव देखील चिंतेत आहेत. कारण ते थेट लोकांच्या संपर्कात येतात. पण त्यांना कसलीही बाधा पोहोचू नये, यासाठी आम्ही काळजी घेत आहोत.

ताण कमी करण्यासाठी उपाययोजना

 पोलिसांवर कामाचा खूप ताण येऊ नये म्हणून आपण या कठीण परिस्थितीतही त्यांच्या साप्ताहिक सुट्टय़ा कायम ठेवल्या असल्याचे स्पष्ट करताना गेडाम पुढे म्हणाले, ‘या परिस्थितीत 50 वर्षांवरील कर्मचाऱयांना तसेच ज्यांना आजार आहेत, अशांना आम्ही पब्लिक कॉन्टॅक्ट आणि हॉस्पिटल डय़ुटय़ांपासून लांब ठेवलंय. त्यांना स्टेशन डय़ुटी दिली आहे. एवढंच नव्हे, तर पोलिसांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा विशेष शाखेमार्फत त्याचप्रमाणे ‘समाधान हेल्पलाईन’च्या माध्यमातून या पोलीस कुटुंबियांच्या अडचणी समजून घेणे, त्यांचे मनोबल वाढविणे व आवश्यक त्या गरजा पुरविणे आदी कामे सुरू केली आहेत. तसेच रस्त्यावर डय़ुटी बजावणाऱया पोलीस कर्मचाऱयांना सर्व ती सुरक्षिततेची उपकरणे त्याचप्रमाणे अत्यावश्यक खाद्यसामुग्री, पाणी यांचा नियमित पुरवठा केला जात असल्याचे ते म्हणाले.

जिल्हय़ात पोलीस सद्यस्थितीत जी सेवा देत आहेत, त्याबद्दल नागरिकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे फार बरं वाटतंय, असे ते म्हणाले. जिल्हा प्रशासनातील अन्य खात्यातील अधिकाऱयांकडूनही अतिशय उत्तम सहकार्य मिळत असल्याने काम काहीसे सुलभ झाल्याचे ते म्हणाले. मात्र माझा प्रत्येक पोलीस उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करीत असताना वैयक्तिक द्वेशातून वा अन्य कारणाने काहीजण त्यांच्यावर जी टीका करीत आहेत, त्याबद्दल वाईट वाटते, असे ते म्हणाले.

जिल्हय़ाच्या सीमेवर ‘एसक्स्यूज’ नाहीच!

 निश्चितपणे माझ्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱयावर कामाचा खूप ताण आला आहे. मात्र तरी देखील व्यवस्थित सेवा देणे, हे आपले कर्तव्य आहे. जसे सामान्य नागरिकांसाठी नियम आहेत तसेच नियम पोलिसांनाही आहेत. बाहेरील जिल्हय़ातून आलेल्या पोलीस कर्मचाऱयांना आम्ही कोणतीही सवलत न देता क्वारंटाईनमध्ये पाठवले आहे. एवढेच नव्हे, तर दोन दिवसांपूर्वी एका असिस्टंट कमिशनर दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाला तो आपले ओळखपत्र दाखवून जिल्हय़ात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्याकडे प्रवासाचा अधिकृत पास नसल्यामुळे आम्ही त्याला जिल्हय़ाच्या सीमेवरून माघारी पाठवल्याच्या घटनेचाही गेडाम यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

Related Stories

100 नवे रूग्ण, तिघांचा मृत्यू

Patil_p

”गोवा काँग्रेसचा आपल्याच उमेदवारांवर विश्वास नसेल तर मतदारांनी का ठेवावा ?”

Abhijeet Khandekar

रत्नागिरी पॉलिटेक्निकचे होणार अद्ययावतीकरण

Patil_p

स्वॅब तपासणीला ‘मिरज’ चा नकार

Patil_p

वैष्णवी प्रभु – साहिल घुबेचे ‘विशारद प्रथम’ परीक्षेमध्ये यश

Anuja Kudatarkar

झाराप-पत्रादेवी बायपासवर टायर फुटल्याने इनोव्हा कार पलटी

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!