Tarun Bharat

चांदण्या शिंपीत जाशी

Advertisements

पूर्वी एक म्हण प्रचलित होती, ‘चोराच्या मनात चांदणं’. पण ती आता कोणाच्या बोलण्यात किंवा लेखनात वापरलेली आढळत नाही. आता चोरांच्या विद्यमान पिढीच्या मनात चांदणं नसेल. आता चोराच्या मनात जामीन नाकारण्याची भीती असेल. असू देत.

हल्ली आम्ही देखील जमेल तितके डिजिटल जगाशी जुळवून घेतो आहोत. न घेऊन सांगतो कुणाला. स्मार्ट फोन वापरतो. संगणक वापरतो. ईमेल वापरतो. हे सगळं करताना अधूनमधून पाच चांदण्या भेटत असतात. चटकचांदण्या नव्हेत, साध्या चांदण्या. हॉटेलात गेलो, मॉलमध्ये गेलो, ओला किंवा उबर गाडीने प्रवास केला की मोबाईलवर संदेश येतो. सेवा कशी वाटली? पाच चांदण्या दिसतात. सेवा जितकी चांगली वाटली असेल तितक्मया चांदण्या आपण प्रदान करायच्या. वर्तमानपत्रातला लेख आंतरजालावर वाचला की लेखाच्या खाली पाच चांदण्या असतातच. कधी कधी उदारमतवादी मनःस्थिती असेल, किंवा एखादा सण असेल तर त्या दिवशी मी एकही लेख न वाचता सगळय़ा लेखकांना पाच चांदण्या देऊन टाकतो. तेवढंच पुण्यकर्म!

आमच्या घराजवळील चौकात एक पाणीपुरीवाला उभा असतो. एकदा त्याच्याकडे आम्ही पाणीपुरी खाल्ली. हात धुवून त्याला पैसे दिले. तेवढय़ात फूटपाथवर स्टूल टाकून मांडीवर चिमुकला लॅपटॉप घेऊन बसलेल्या तरुणाने हाक मारली, “पाणीपुरी आवडली का, साहेब?’’ मी होकार दिल्यावर तो म्हणाला, “किती ष्टार टाकू?’’ मी बायकोच्या आणि स्वतःच्या अशा दोघांच्या वतीने पाच म्हटल्यावर त्याने लॅपटॉपवर टकटक करून मााा फोन नंबर मागितला. मी मनात येतील ते दहा अंक सांगितले. खुश होत्साता त्याने पाणीपुरीवाल्याला इशारा केला. पाणीपुरीवाल्याने आम्हाला दोघांना एकेक मसाला पुरी दिली.

हे चांदण्यांचे लोण असे वाढत गेले तर फिर्याद करायला आलेल्या सामान्य नागरिकांना, अटक करून आणलेल्या चोराला पोलीस चांदण्या मागतील. पुलंच्या ‘असा मी असामी’ मधली ‘आपली सरोज खरे’ प्रत्येक मुलाच्या पालकांना चांदण्या मागेल. जितक्मया जास्त चांदण्या, तितक्मया जास्त लवकर तिला प्रमोशन वगैरे
मिळेल.

सुंदर तरुणीच्या प्रेमात पडल्यावर सगळेच तरुण तिला होकाराच्या पाच चांदण्या मागतील. तिच्या चांदण्या-वाटपाचा अर्थ पुढीलप्रमाणे असेल… एक- गेलास उडत. दोन- मी तुला भावासारखा मानत होते. तीन-आपण मित्र म्हणून राहू. चार तुला माझ्याहून चांगली मिळेल. पाच-मी तुला होकार देते आहे.

Related Stories

बिरबल आणि ओ हेन्री

Patil_p

माझी भेट घडे तेव्हा जन्मणे खुंटले

Patil_p

अलविदा

Patil_p

टाटा मोटर्सची खास सवलत योजना

Patil_p

मनसेचे भगवे निशाण

Patil_p

ठाकरे सरकारची वादळी द्विवर्षपूर्ती!

Patil_p
error: Content is protected !!