Tarun Bharat

चाकरमान्यांना घेऊन पहिली बस राजापुरात दाखल

राजापुरातूनही परप्रांतीय कामगारांना घेऊन एक बस रायगडला रवाना

वार्ताहर/ राजापूर

चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर मंगळवारी अलिबाग येथून चाकरमान्यांना घेऊन पहिली बस राजापूरात दाखल झाली. तर मंगळवारीच राजापूरातून मध्यप्रदेश येथील कामगारांना घेऊन एक बस रायगडला रवाना झाली. 

कोरानाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिल्याने कामगारांचे लोंढेच्या लोंढे गावी परतू लागले आहेत. त्यातच आता मुंबईकर चाकरमान्यांनाही गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी चाकरमान्यांना घेऊन पहिली बस राजापुरात दाखल झाली. अलिबाग येथून ही बस आली असून या बसमध्ये सागवे येथील प्रवासी होते.

राजापूर ग्रामीण रूग्णालयात ही बस आणून त्याठिकाणी बसमधील चाकरमान्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांची संस्थात्मत विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हय़ात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सेफ झोनमध्ये असलेल्या लांजा तालुक्यातही दोन चाकरमानी कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. आता राजापूर तालुक्यातही मुंबईकर चाकरमानी मोठय़ा संख्येने दाखल होऊ लागल्याने तालुक्यात भितीचे सावट पसरले आहे.

दरम्यान राजापूर आगारातूनही परप्रांतीय कामगारांना घेऊन एक बस मंगळवारी सकाळी 5 च्या सुमारास रायगडला रवाना झाली. या बसमध्ये 22 प्रवासी असून हे सर्वजण मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

चाकरमान्यांच्या रूग्णालय परिसरातील मुक्त संचारामुळे धोका…..

मागील काही दिवसांपासून मुंबईतून येणाऱया चाकरमान्यांची संख्या वाढत आहे. यापूढे त्यामध्ये अधिक वाढ होणार आहे. येणाऱया चाकरमान्यांचे राजापूर ग्रामीण रूग्णालयात स्वॅब नमूने घेण्यात येतात. त्यामुळे चाकरमानी याठिकाणी गर्दी करतात. चाकरमानी रूग्णालयाच्या आवारात तसेच बाहेरच्या रस्त्यावर मुक्तपणे फिरत असतात, अशावेळी रूग्णालयात येणाऱया अन्य स्थानिक रूग्णांमध्येही ते मिसळत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवावा तसेच रूग्णालय प्रशासनानेही योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

महामार्ग चौपदरीकरणात हरवतेय ‘गावपण’..!

Patil_p

चांदा ते बांदा योजना राबवण्यास केसरकर जबाबदार

NIKHIL_N

पोलिसांनी उठाबशांसारख्या शिक्षा करू नयेत!

NIKHIL_N

विनापरवाना भाजी, अन्य विक्रेत्यांना हटविले

NIKHIL_N

‘त्या’ पाचहीजणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

NIKHIL_N

Ratnagiri : खेडमध्ये अनधिकृत खोके उभारण्याचा सिलसिला सुरूच

Abhijeet Khandekar