Tarun Bharat

चाकरमान्यांनी धरली रेल्वे ट्रकची वाट

प्रतिनिधी/ खेड

कोरोनाच्या भीती व लॉकडाऊनमुळ सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने मुंबईस्थित चाकरमानी पुरते हवालदिल झाले आहेत. हातला काम नाही, त्यामुळे पैसा नाही, त्यात कोरानाची दहशत अशा विचित्र कात्रीत सापडलेल्या अनेकांना गाव गाठण्यासाठी वेगवेगळय़ा क्लृप्त्या लढवायला सुरूवात केली आहे. रस्त्यावरील नाकेबंदी चुकवण्यासाठी मुंबई परिसरातील महिलांसह 26 जणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रकचाच मार्ग बनवत गावची वाट धरली. ट्रकवरून येणाऱया या चाकरमान्यांना बुधवारी सायंकाळी दिवाणखवटीनजीक प्रशासनाने रोखले. या सर्वांना खेडमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्हय़ाच्या सर्वच सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबईहून गावी जाण्याचे परतीचे सारे दोर कापले गेले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या जात असतानाही गाव गाठण्यासाठी चाकरमानी नवनव्या युक्त्या वापरत आहेत. नाकाबंदीमुळे पोलिसांना चकवा देणे अशक्य बनल्याने काहींना जंगलमार्गाचा तर काहींनी चक्क रेल्वे ट्रकचाच आधार घेतल्याचे समोर येऊ लागले आहे. 

  मुंबई येथील गिरगाव व दिवा येथील 26 चाकरमानी रेल्वे रूळावरून पायी प्रवास करत मुंबई येथून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. 3 दिवसापासून हे चाकरमानी जीवाची पर्वा न करता अंतर कापत होते. मात्र याबाबत प्रशासनाला माहिती मिळताच  दिवाणखवटीनजीक त्यांना रोखण्यात आले. यामध्ये महिलांचाही समावेश असून हे चाकरमानी रत्नागिरी व संगमेश्वर येथील आहेत. या सर्वांना प्राथमिक तपासणीनंतर खेडमधील बंदिस्त क्रीडांगणातील विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

  कामधंदा नसल्याने उपासमार होत असून याचमुळे पायी प्रवास करत आम्ही गावी निघालो होतो, असे या चाकरमान्यांनी सांगितले. या सर्वांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी या सर्वांची विचारपूस केली. रेल्वेरूळावरून जीव धोक्यात घालून कुणीही प्रवास करू नये, कोणाची उपासमार होत असल्यास तातडीने प्रशासनाकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

    जंगलातील आडवाटेने 20 तरूण गावात   

तालुक्यातील एका गावातील 20हून अधिक जणांनीही पोलिसांचा ससेमिरा रोखण्यासाठी चक्क जंगलातील आडवाटांचा वापर केल्याचे पुढे येत आहे. शहरापासून 4 कि.मी. अंतरावर असलेल्या एका गावातील चाकरमान्यांनी जंगलातील आडवाटांचा आधार घेत घर गाठले आहे. 2 दिवसापासून हे चाकरमानी आडवाटांद्वारे गावी पोहचल्याचे समजते. जागरूक नागरिकांनी ही बाब आरोग्य प्रशासनाच्या कानावरही घातली असून त्यानुसार त्याची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते.

Related Stories

कोकणातील मगरींच्या गावात निसर्ग पर्यटन बोट सफारी!

Patil_p

‘हॅप्पी हाय फॉक्सिया’चा रत्नागिरीत शिरकाव

Patil_p

सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात आज 37 नवे रुग्ण तर तिघांचा मृत्यू तर

Archana Banage

रत्नागिरी : खेड पोलिसांनी ५ तासातच आवळल्या मारेकऱ्याच्या मुसक्या

Archana Banage

मंडणगडात भात पेरणीला जोरदार प्रारंभ

Patil_p