मुंबई \ ऑनलाईन टीम
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट नाकारल्याची चर्चा आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी एका माध्यमाला माहिती दिली. “काल रात्री रावसाहेब दानवेंकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त डिनर पार्टी झाली. अमित शहा आणि नरेंद्र मोदींना वगळता सगळ्यांच्या भेटी झाल्या. सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू असल्यामुळे आम्ही फॉलोअप घेतला नाही. शहा यांची भेट झाली असती तर आनंदच झाला असता, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दिल्लीहून मुंबईत परताना चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत येताच मीडियाला प्रतिक्रिया दिली. अतिशय नियमित प्रवास होता. प्रामुख्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, मी… आमचं वारंवार दिल्लीला जाणं होतं, आमचा सातत्याने प्रयत्न असतो, पुढील पीढी तयार केली पाहिजे. त्यामुळे राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, बावनकुळे, श्रीकांत भारतीय या सर्वांना घेऊन नवीन मंत्री झालेले डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि कपिल पाटील यांना भेटलो. त्यांचं अभिनंदन करणं आणि त्यांची खाती समजून घेणं, असा हा कार्यक्रम होता. साधारण कोरोनाच्या आधी दरवर्षी खासदारांना जेवण देणं आणि महाराष्ट्रातील मुद्दे सांगणं हे होत होतं. गेल्या दोन वर्षात ते झालं नव्हतं, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
मोदी-शहांची भेट सोडली तर सर्वांची भेट झाली. अधिवेशनामुळे मोदी आणि शहांची भेट होऊ शकली नाही. अमित शाहांनी भेट नाकारली हे वृत्त चुकीचं आहे. हे खरं आहे की भेट झाली असती तर आनंद झाला असता, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. या दौऱ्याचा आणि राज्यातील सत्तांतराचा काहीच संबंध नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मनसे-भाजप युतीची या भेटीत चर्चा होणार होती ती झाली नाही. त्याबाबत विचारले असता आमची युतीसाठी भेट नव्हतीच. एकमेकांना समजून घेणे, मनसेची परप्रांतीयांबाबतची भूमिका समजून घेण्यासाठी ही भेट होती. युतीबाबत केंद्रीय नेतृत्वाने रेड अलर्ट दिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .

