Tarun Bharat

चार पालिकांसाठी पहिल्या दिवशी दहा अर्ज

मडगावात एकही अर्ज नाही

प्रतिनिधी / पणजी

राज्यातील पाच नगरपालिकांच्या दि. 23 एप्रिल रोजी होणाऱया निवडणुकीसाठी काल बुधवारी पहिल्याच दिवशी दहा अर्ज दाखल झाले आहेत. दि. 8 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालणार आहे. अर्ज दाखल करण्याबरोबरच सर्व ठिकाणी प्रचाराची रणधुमाळीही सुरू झाली असून यावेळीही अनेक मंत्री व आमदारांनी प्रतिष्ठा पणास लावली आहे.

मडगाव (25 प्रभाग), मुरगाव (25 प्रभाग), म्हापसा (20 प्रभाग), सांगे (10 प्रभाग) व केपे (13 प्रभाग) या पाच पालिकांची निवडणूक होणार असून काल दि. 31 रोजी मडगाव वगळता अन्य चार पालिकांसाठी दहा इच्छूक पुढे आले आहेत. त्यातील तीन पालिकांसाठी प्रत्येकी तिघांचे तर एका पालिकेसाठी एकच अर्ज आला आहे. अर्ज दाखल झालेल्यांपैकी म्हापसा, मुरगाव व केपे या पालिकांसाठी प्रत्येकी 3 आणि सांगेसाठी 1 अर्ज दाखल झाला आहे.

मडगाव पालिकेत सत्तेसाठी होणार कडवी झुंज

मडगाव पालिकेवर सत्ता हस्तगत करण्यासाठी अनेक दिग्गजांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यात प्रामुख्याने आमदार दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई, माजी आमदार दामू नाईक यांच्यासह शर्मद रायतूरकर व भाजपच्या अन्य नेत्यांचा समावेश आहे.

केपेत बाबू कवळेकरांचे पुन्हा जोरदार प्रयत्न

केपे पालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे प्रारंभापासूनच जोरदार प्रयत्न करत आहेत. यापूर्वी तेथे निवडणूक जाहीर झाली असता तीन उमेदवार बिनविरोध निवडणून आणण्यात ते यशस्वीही ठरले होते. परंतु आरक्षणाच्या मुद्यावरून ती निवडणूकच रद्द झाली होती. त्यामुळे तेथे राजकीय समिकरणे बदलली आहेत. त्याशिवाय काँग्रेसचे काही कार्यकर्तेही जोरदार संघर्ष करत आहेत.

सांगे पालिका ताब्यात ठेवण्यासाठी विद्यमान आमदार प्रसाद गावकर यांच्यासह माजी आमदार सुभाष फळदेसाई तसेच सावित्री कवळेकर सर्व शक्तीनिशी मैदानात उतरले आहेत.

जवळजवळ असेच चित्र मुरगाव व म्हापसा या पालिकांसाठीही दिसून येत असून मुरगावातून काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे. म्हापसामध्ये भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी पालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे.

पंचायत पोटनिवडणुकीसाठी एकही अर्जनाही

डिचोली तालुक्यातील सर्वण कारापूर आणि दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातील वेळ्ळी या दोन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका प्रभागात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठीही अर्ज प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. परंतु काल पहिल्या दिवशी दोन्ही ठिकाणी एकही अर्ज दाखल झालेला नाही.

Related Stories

माजीमंत्री अच्युत उसगावकर यांचे निधन

Omkar B

गोव्याचा होतकरू शरीरसौष्ठवपटू ओंकार देसाईचे 24व्या वर्षी निधन

Omkar B

व्याघ्र प्रकल्पाला तीव्र विरोध करणार

Amit Kulkarni

माशेल भागात मर्यादीत लॉकडाऊन यशस्वी

Omkar B

काँग्रेसच्या स्थिर सरकारासाठी मडगावकरांची भूमिका निर्णायक

Amit Kulkarni

कळसा भंडुरा प्रकरणी लक्ष घालून त्वरित कृती करा

Amit Kulkarni