कंत्राटी डॉक्टर चार महिने पगारापासून वंचित
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यातील कंत्राटी डॉक्टर चार महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. सीपीआर हॉस्पिटलमधील सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, निवासी वैद्यकीय अधिकारी पगारापासून वंचित आहेत. चार महिने पगारच नाहीत तरीही ते रूग्णांवर उपचार करत आहेत. पण आर्थिक कोंडीने कंत्राटी डॉक्टरांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर हॉस्पिटल, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालये, आरोग्य केंद्रात कंत्राटी डॉक्टर कार्यरत आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये सुमारे 40 कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आहेत. तितकेच सहयोगी, सहायक प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यांना ठोक मानधन 75 ते 90 हजारांदरम्यान आहे. पण मार्चपासून आजपर्यत त्यांना हे मानधनच मिळालेले नाही. चार महिने झाले येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पगाराच्या प्रतिक्षेत येथे रूग्णसेवा करत आहेत. पण त्यांच्या आर्थिक कोंडीकडे कोणाचेही लक्ष नाही, अशी स्थिती आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत कोरोना व म्युकर मायकोसीस मिळून 550 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावरील उपचारासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, मानसेवी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यातील निदान 40 टक्के स्टाफ हा कंत्राटी आहे. या कंत्राटी डॉक्टरांना ठोक मानधन आहे. वारंवार मागणी करूनही त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. वैद्यकीय अधिकारी संघटना, सहयोगी प्राध्यापक संघटनांनी यासंदर्भात आंदोलने केली, इशारे दिले, पण राज्य शासनाकडून फक्त आश्वासनेच मिळाली.
मार्च गेला, एप्रिल गेला, मेची प्रतिक्षाही संपली, जूनही गेला आहे. चार महिने उलटून गेले, तरीही कंत्राटी डॉक्टरांना मानधनाची प्रतिक्षा आहे. चार महिन्यानंतरही त्यांना पगार मिळालेला नाही. सध्या निधी आला आहे, पण तोही कमी आहे. त्यातून महिन्याचाच पगार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीपीआरमधील कंत्राटी डॉक्टर अस्वस्थ आहेत. आर्थिक कोंडीमुळे कोणत्याही क्षणी आंदोलनाच्या पावित्र्यात ते आहेत.
सीपीआर हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला महिन्याला दीड लाख रूपये पगारापोटी लागतात. कंत्राटी डॉक्टरांच्या थकीत वेतनापोटी फक्त 30 लाख रूपये प्रशासनाकडे आल्याचे समजते. त्यातून एका महिन्याचा पुर्ण पगार होण्याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे अर्धवट पगार मिळण्याची भीती कंत्राटी डॉक्टरांत आहे. थकीत तीन महिन्यांचा पगार एकदम मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.


previous post