Tarun Bharat

चिखले येथे दोन घरे फोडून दोन तोळे सोने – रोख रक्कम लंपास

वार्ताहर /जांबोटी

चिखले, ता. खानापूर येथे अज्ञात चोरटय़ांनी भरदिवसा दोन घरांचे दरवाजे तोडून दोन तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. सदर घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

अधिक माहिती अशी, की चिखले येथील रहिवासी व एपीएमसी सदस्य संजय पाटील यांचे गावच्या बाहेर पारवाड-चिखले रस्त्यावर स्वतःचे घर आहे. संजय यांच्या पत्नी गावात आशा कार्यकर्त्या म्हणून काम पाहतात. सोमवारी खानापूर येथे त्यांची बैठक असल्यामुळे पती-पत्नी दोघेही घराचे सर्व दरवाजे बंद करून खानापूरला आले होते. चोरटय़ांनी या संधीचा लाभ उठवून घराच्या पाठीमागील बंद दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरटय़ांनी त्यांच्या घरातील कपाट व ट्रंक, कपडे तसेच स्वयंपाक घरातील डबे आदी साहित्य अस्ताव्यस्त करून कपाटामध्ये ठेवलेले एक तोळय़ाचे गंठण तसेच रोख दहा हजार रु. चांदीचे पैंजण, जोडवी आदी साहित्य घेऊन पोबारा केला. दुपारी 3 वाजता खानापूर येथील बैठक संपवून घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीला घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. मात्र चोरटे ऐवज घेऊन पसार झाले.तसेच चोरटय़ांनी त्याच दिवशी संजय पाटील यांच्या घराला लागून असलेल्या नारायण विठोबा कळळेकर यांच्या बंद घराचा पाठीमागील दरवाजा तोडून एक तोळा सोन्याचा नेकलेस तसेच 6000 रुपये रोख आणि कानातील सोन्याचे रिंग असा ऐवज लंपास केला.

सोमवारी कळळेकर पती-पत्नी वैद्यकीय उपचारासाठी बेळगावला आले होते. त्यांच्याही घरी कोणीच नव्हते. सायंकाळी कळळेकर कुटुंबीय बेळगावहून घरी परतल्यानंतर चोरीची घटना निदर्शनाला आली.

चिखले गाव दुर्गम भागात निसर्गरम्य परिसरात वसले असून या गावात आतापर्यंत घरफोडी अथवा चोरीची घटना कधीच घडली नाही. मात्र सोमवारी भरदिवसा चोरटय़ांनी दोन घरे फोडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. चोरटे बाहेरचे आहेत की स्थानिक? याविषयी ग्रामस्थांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे.

Related Stories

रुग्णांनी भीती बाळगण्याचे कारण नाही

Patil_p

दुसऱया आठवडय़ातही विकेंड कर्फ्यू

Patil_p

काकती येथे राणी चन्नम्मा विजयोत्सव साधेपणाने साजरा

Patil_p

बुडाच्या बैठकीत अनगोळ भू-संपादनाच्या हरकतीवर चर्चा शक्य

Patil_p

शहापूर विभागीय स्पर्धेत पंडित नेहरू प्रशालेचे यश

Amit Kulkarni

कडोलीत भात गोडावूनची उभारणी करा

Amit Kulkarni