Tarun Bharat

चित्रांमधून ग्रामीण जीवनाचे दर्शन

Advertisements

युवा दिनाचे औचित्य साधून लोकमान्य सोसायटीच्या सहकार्याने चित्रप्रदर्शन : उद्यापर्यंत पाहण्यास खुले

प्रतिनिधी /बेळगाव

ग्रामीण भागातील जीवन चित्रांच्या माध्यमातून पाहण्याची संधी जे. एम. भंडारी स्कूल ऑफ आर्ट, शिनोळीच्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिली आहे. बुधवारी युवा दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात ऑईल पेंटिंग, वॉटर पेंटिंग, ऍक्रॅलिक पद्धतीने केलेली 72 हून अधिक चित्रे मांडण्यात आली आहेत.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सहकार्याने जे. एम. भंडारी स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी वरेरकर नाटय़ संघ येथील कै. के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी येथे चित्रप्रदर्शन भरविले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या 158 व्या जयंतीनिमित्त स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्यासपीठावर लोकमान्यचे समन्वयक विनायक जाधव, कॉलेजचे प्राचार्य सुभाष देसाई, प्रा. किरण हणमशेठ उपस्थित होते.

विवेकानंदांचे विचार आजही प्रेरणादायी

 यावेळी जगदीश कुंटे म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी भारतीय अध्यात्म व तत्वज्ञान जगभर पोहोचविले. आज आपण त्यांची 158 वी जयंती साजरी करीत असलो तरी त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी हिंदू धर्माची पताका अमेरिकेतही फडकविली. निसर्ग हा आपल्याला खूप काही शिकवत असतो. त्या निसर्गाकडून चित्रकाराने खूप काही शिकण्यासारखे आहे. ज्या प्रकारे पाने गळून पडल्यानंतर झाडाला नवीन पालवी फुटते, त्याचप्रकारे अपयशाने खचून न जाता नव्या जोमाने आयुष्याला सामोरे जा, असे स्वामीजी नेहमी सांगत. हीच प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित केल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रवेशद्वार ठरले लक्षवेधी

चित्र प्रदर्शनाचे प्रवेशद्वार कलात्मकरीत्या सजविण्यात आले आहे. सुकलेल्या झाडांच्या सालीपासून तयार केलेले प्रवेशद्वार लक्षवेधी ठरले. याचसोबत स्वामी विवेकानंदांची काढण्यात आलेली रांगोळी हे प्रदर्शनाचे आकर्षण आहे.

चित्रप्रदर्शनात व्यक्तिचित्र, ग्रामीण भागातील जुनी घरे, ग्रामीण भागातील जुने साहित्य, निसर्गचित्र या सर्वांचा समावेश आहे. शुक्रवार दि. 14 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत टिळकवाडी येथील वरेरकर नाटय़ संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी येथे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.

Related Stories

कर्नाटक : ललिता महल पॅलेसचा 100 वा वाढदिवस

Sumit Tambekar

बाजारात रंगीबेरंगी फुलांचे आकर्षण

Amit Kulkarni

व्हीटीयू-एअरफोर्समध्ये समन्वय करार

Amit Kulkarni

बेळगावच्या कला संस्कृतीची ओळख होण्यासाठी कला महोत्सव

mithun mane

सावधानी बाळगा अन्यथा सर्वस्व गमवाल!

Amit Kulkarni

हरिबोलच्या जयघोषात जगन्नाथ रथयात्रा

Amit Kulkarni
error: Content is protected !!