लडाखमध्ये 75 दिवसांनी पुन्हा तणाव : चीनकडून लढाऊ विमाने तैनात
वृत्तसंस्था/ लेह
चीनच्या घुसखोरीसंबंधी संरक्षण मंत्रालयाने सोमवारी एक वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. चीनने जैसे थे स्थितीचे उल्लंघन केल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. 29 ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने पूर्व लडाखच्या भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी चीनचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तत्पूर्वी चीनने लडाखनजीक स्वतःची जे-20 लढाऊ विमाने तैनात केली होती. तर लडाख सीमेवर तणाव वाढल्याने जम्मू-काश्मीर प्रशासनाने श्रीनगर-लेहर मार्ग सर्वसामान्यांसाठी बंद केला आहे. या मार्गावर केवळ सैन्यवाहनांना अनुमती असणार आहे.
भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना पँगोंग त्सो सरोवरच्या दक्षिण काठावरच रोखले आहे. भारतीय सैन्य चर्चेद्वारे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबद्ध आहे, परंतु आम्ही आमच्या सीमांचे रक्षण करणे जाणतो असे भारताकडून सांगण्यात आले आहे. दोन्ही देशांमधील तणाव दूर करण्यासाठी चुशूल येथे ब्रिगेड कमांडर पातळीवर चर्चा होत आहे. 15 जून रोजी लडाखच्या गलवान खोऱयात चीन आणि भारतीय सैनिकांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या संघर्षात भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तर चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेले होते.
चिनी विमानांच्या घिरटय़ा
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वायुदलाने होतान वायुतळावर जे-20 लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ही लढाऊ विमाने 29-30 ऑगस्टदरम्यान रात्री झालेल्या घटनेपूर्वीच तैनात करण्यात आली होती. होतान वायुतळ लडाखपासून अत्यंत नजीक आहे. चिनी लढाऊ विमाने अद्याप उड्डाणे करत आहेत. 10 सप्टेंबर रोजी भारताची 5 राफेल विमाने वायुदलात सामील होणार आहेत.
चर्चा अद्याप निष्फळ
गलवान येथील संघर्षानंतर लडाखमध्ये वादग्रस्त भागांमधून सैनिक हटविण्यासाठी भारत-चीनच्या सैन्याधिकाऱयांदरम्यान 2 वेळा बैठक झाली आहे. 30 जून आणि 8 ऑगस्ट रोजी चीनच्या हद्दीत येणाऱया मॉल्डो येथे बैठक झाली होती, परंतु त्यातून कुठलीच फलनिष्पती झालेली नाही.
मागे हटण्यास टाळाटाळ
सैन्य आणि राजनयिक पातळीवर अनेक फेऱयांमधील चर्चेनंतरही चिनी सैन्य पूर्व लडाखच्या फिंगर एरिया, देप्सांग आणि गोगरा भागांमधून मागे हटण्यास टाळाटाळ करत आहे. चिनी सैनिक 3 महिन्यांपासून फिंगर एरियात ठाण मांडून आहेत. चिनी सैनिकांनी आता खंदक तयार करणे तसेच अन्य तात्पुरती निर्मितीकार्य सुरू केली आहेत.