Tarun Bharat

चिपळुणातील उड्डाण पुलास पुढील महिन्यात प्रारंभ!

प्रतिनिधी /चिपळूण :

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण शहराची मोडतोड होऊ नये यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्याचा शुभारंभ पुढील महिन्यात होणार आहे. बहाद्दूरशेखनाका ते शिवाजीनगर दरम्यान साधारण दीड किलोमीटर लांबीच्या आणि कोकणातून जाणाऱया महामार्गावरील सर्वात जास्त लांबीच्या या पुलाच्या सॉईल टेस्टींगला सुरूवात झाली आहे.

  5 वर्षांपूर्वी चौपदरीकरणाची घोषणा झाल्यानंतर शहरातील मार्गात होणाऱया मोडतोडीबाबत सुरूवातीपासून वेगवेगळे मतप्रवाह होते. बहाद्दूरशेखनाका ते कापसाळदरम्यान शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व वाडय़ावस्त्या असल्याने निर्माण होणाऱया अडचणी आणि रूंदीकरणात इमारतींची होणारी मोडतोड लक्षात घेऊन बायपासपेक्षा उड्डाण पूल सोयीचा ठरवला गेल्यानंतर केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने उड्डाणपुलावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार वाशिष्ठी नदीवरील पुलापासून मातीच्या भराव टाकत बहाद्दूशेखनाका येथून या उड्डाणपुलाला प्रारंभ होणार असून शिवाजीनगर येथील युनायटेड हायस्कूलजवळ या पुलाचा शेवटचा पिलर असणार आहे. सहापदरी असलेल्या या उड्डाणपुलासाठी सद्यस्थितीत चाळीस पिलर असणार आहेत. पिलर कमी-जास्त उभारणे सॉईल टेस्टिंगनंतर तयार होणाऱया पुलाच्या अंतिम डिझाईनवर अवलंबून असणार आहे. यामध्ये बहाद्दूरशेख नाका येथे 19 फूट उंचीचा पिलर टाकून खाली सुमारे 40 मीटर रूंद गाळा वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहे.

   परशुराम ते खेरशेत दरम्यानच्या टप्प्याचे काम इगल इन्फ्रा कंपनी करत असून आता या पुलाचे कामही ही कंपनी करणार आहे. उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ करण्यापूर्वी भूगर्भीय तपासणी म्हणजेच मातीचा थर तपासण्याच्या दृष्टीने टेस्टींग केली जात आहे. यापूर्वी तीन वर्षांपूर्वीही एकदा तपासणी केली गेली होती. मात्र मध्यंतरी पुलाचे काम रखडल्याने आता नव्याने पुन्हा तपासणी केली जात आहे. सध्या बहाद्दूरशेखनाका येथे तीन यंत्राच्या साहाय्याने सॉइल टेस्टींग केली जात असून सद्यस्थितीत 40 ठिकाणी केल्या जाणार आहे. येत्या दहा दिवसांत हे काम पूर्णत्वास जाणार आहे. त्यानंतर पुलाचे डिझाईन तयार होईल. साधारण पूल उभारणीसाठी अठरा महिन्यांची मुदत असली तरी दोन वर्षे जाणार असल्याने पुलाचे काम लवकरात लवकरच सुरू करण्याच्या सूचना कंपनीला करण्यात आल्या आहेत.

कामगारांमुळे कामे रखडली

सध्या महामार्गावरील रखडलेल्या चौपदरीकरण आणि पुलाच्या कामांना सुरूवात करण्याच्यादृष्टीने कंपनीने नियोजन केलेले असले तरी कामगारांची उणीव भासू लागली आहे. सुमारे चारशे ते पाचशे कामगार सध्या रेल्वेतून आणणे शक्य होत नाही. परिणामी सध्या 70 कामगार कलकत्ता येथून बसने आणण्यात आलेले आहेत. कामगार वाढल्यानंतर कामाना खऱयाअर्थाने गती येणार आहे….

Related Stories

हेमश्री चिटणीस ‘नेट-जेआरएफ’ साठी पात्र…

Anuja Kudatarkar

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि टँकर अपघातात एक ठार

Archana Banage

मंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे हेल्मेटसक्ती शिथिल

Archana Banage

नियम मोडणाऱयांविरोधात धडक मोहीम

NIKHIL_N

पोप फ्रान्सिस यांना भेटण्यासाठी पंतप्रधान व्हॅटिकन सिटीमध्ये

Archana Banage

वेंगुर्लेचा तरूण लोटेतून बेपत्ता

Patil_p