Tarun Bharat

चिपळुणात तीन अपघातात दोघे ठार

चिपळूण/ तत

मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते येथे ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तसेच येथील न्यायालय परिसरात दुचाकी घसरुन शनिवारी झालेल्या दोन अपघातात दोघेजण ठार झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह वयोवृध्दाचा समावेश आहे. दरम्यान, कळंबस्ते येथील अपघातानंतर ट्रकचालक पळून जात असता त्यास पोलिसांनी पाठलाग करुन परशुराम येथे हा ट्रक अडवून ताब्यात घेतले.

कळंबस्ते येथील अपघातात ठार झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे नाव शुभम मच्छिंद मोहोड (21, पिरलोटे) असे आहे, तर सुनीलकुमार रामलोचन यादव (29, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा दुचाकी घेऊन पिरलोटेहून चिपळूणच्या दिशेने येत होतो, तर सुनीलकुमार हा ट्रक घेऊन चिपळूणहून लोटेकडे जात होता. शनिवारी 11 च्या सुमारास कळंबस्ते एस.टी. थांबा येथे सुनीलकुमारने समोरच्या गाडीस ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱया शुभमला धडक दिली. ही धडक दिल्यानंतर ट्रकचे चाक शुभमच्या डोक्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  दरम्यान, सुनीलकुमारने हा अपघात केल्यानंतर तो अपघातस्थळी न थांबता तेथून पळ काढला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विलास पडय़ाळ, हेडकॉन्स्टेबल शांताराम साप्ते हे महामार्गावर गस्त घालत असताना हा प्रकार त्यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले व पळून जाणाऱया सुनीलकुमार याचा पाठलाग करुन त्याला परशुराम येथे अडवून ताब्यात घेतले. यावेळी विलास गमरे, अरविंद चव्हाण, नाना चाळके, भाई चाळके, अंकुश काते आदींनी मदत केली.

शुभम एकुलता एक   

शुभम हा येथील डीबीजे महाविद्यालयात 11वी सायन्समध्ये शिकत होता. तो आई-वडिलांचा एकुलता एक असून त्याची आई लोटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पर्यवेक्षिका तर वडील संगमेश्वर येथील एका आरोग्य केंद्रात कर्मचारी आहेत. शुभमच्या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी कामथे रुग्णालयात धाव घेतली.

दुचाकी घसरुन दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुसऱया अपघातात मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथून आपल्या घरी जात असताना दुचाकी घसरुन वयोवृद्ध दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात येथील न्यायालय परिसरात शनिवारी 11 च्या सुमारास घडला. चंद्रकांत शंकर सावंत (60, कळंबस्ते-बौध्दवाडी) असे मृत्यू झालेल्या वयोवृद्धाचे नाव आहे. सावंत हे दुचाकी घेऊन कामथेहून आपल्या घरी जात होते. ते येथील न्यायालय परिसरात आले असता त्यांची दुचाकी घसरली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. खाली कोसळलेल्या सावंत यांना लगतच असलेल्या रिक्षा थांब्यावरील रिक्षाचालकांनी उचलून तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात नेले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचा शनिवारी सायंकाळी 4 च्या सुमारास मृत्यू झाला.  सावंत हे गतवर्षी पशुसंवर्धन विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच बुरुमतळी येथील रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.   

 दुचाकी-ट्रक अपघातात दोघे जखमी

तसेच तिसऱया अपघातात शहरातील पाग-पॉवर हाऊस येथे ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. मनीष प्रकाश नरळकर (पाग), संजय भोजने (चिपळूण-बाजारपेठ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. बाळासाहेब पाटील (सांगली) यांनी या बाबतची फिर्याद दिली.

 या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाग-पॉवर हाऊस येथे शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास पाटील यांचा ट्रक अचानक बंद पडल्याने तो रस्त्यातच उभा होता. यावेळी मागून आलेल्या दुचाकीस्वाराची धडक बसल्यानंतर यात नरळकर व भोजने हे दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातप्रकरणी ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल मनीष कांबळे करीत आहेत.

 

Related Stories

चिपळुणात ठिकठिकाणी कोरोना तपासणी सुरू

Archana Banage

रत्नागिरी आणखी 30 जण कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

संस्कृत भाषेच्या विकासातूनच संस्कृतीची जपणूक

Patil_p

कासव घरटय़ांचा डेटा आता एका ‘क्लिक’वर मिळणार!

Patil_p

कोरोनाबाधितांवर होणार आता गावातच अंत्यसंस्कार

Patil_p

धक्कादायक : रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासात 116 कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage