Tarun Bharat

चिपी विमानतळास पाणीपुरवठय़ास विरोध!

कुडाळ सुधार समितीचे एमआयडीसी उपअभियंत्यांना निवेदन

वार्ताहर / कुडाळ:

कुडाळ भंगसाळ नदीचे पाणी चिपी विमानतळासाठी नेण्यास कुडाळ सुधार समितीने विरोध दर्शविला आहे. भविष्यात कुडाळ शहर तसेच एमआयडीसीमध्ये पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळास पाणीपुरवठा करू नये, असे निवेदन सुधार समिती व नागरिकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयात सादर केले.

कुडाळ येथील भंगसाळ नदीचे पाणी चिपी विमानतळासाठी देण्यास कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी आक्षेप घेतला आहे. पाणी टंचाईची संभाव्य भीती त्यांनी व्यक्त करून नागरिकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले होते. सोमवारी सुधार समिती व नागरिकांच्या शिष्टमंडळाने  उपअभियंता अविनाश रेवडकर यांच्याकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ  अधीक्षक (रत्नागिरी) यांचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन दिले. यावेळी कुडाळ सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, राकेश वर्दम, जयराम डिगसकर, विशाल शिरसाट, शिवाजी मसके, संजय परब, राजू दळवी, करण  राऊळ, रमाकांत नाईक, दिनेश पांगुळ, लक्ष्मण मसके, संजय बावलेकर, मिलिंद मठकर आदी उपस्थितहोते.   निवेदनात म्हटले आहे, कुडाळ एमआयडीसी परिसर हा सर्व उद्योगांचा परिसर आहे. सदर उद्योगांना लागणारे पाणी हे भंगसाळ नदीच्या पाण्याच्या साठय़ातूनच पुरविले जाते. तसेच भंगसाळ नदीतूनच कुडाळ शहराला पाणीपुरवठा होतो. परंतु मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये भंगसाळ नदीच्या पाण्याचा साठा कमी होतो. सदरचे पाणी एमआयडीसी व कुडाळ शहर या दोन्ही भागात अपूरे पडते. कुडाळ एमआयडीसी ते चिपी विमानतळाचे अंतर 20 ते 22 कि.मी. आहे. एवढय़ा अंतरावर पाणी नेण्यासाठी येणारा खर्च हा कोटीत होणारा आहे. महाराष्ट्र शासन हे कोविड-19 च्या महामारीच्या काळात आर्थिकदृष्टय़ा मागासलेले असताना सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणारा आहे. त्याचा बोजा सामान्य नागरीकांवर पडणार आहे, अशी भीती व्यक्त केली आहे.

भविष्यात पाणीटंचाई!

तसेच कुडाळ शहराचा तसेच एमआयडीसीतील उद्योगांचा विचार करता सदरचे पाणी चिपी विमानतळाला वळविणे म्हणजे तिघांनाही अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. कुडाळची वाढती लोकसंख्या व अपुरा पाणीसाठा याने भविष्यात मार्च, एप्रिल, मे या महिन्यात मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागणार आहे. चिपी विमानतळासाठी वळविलेले पाणी हे मर्यादित कालावधीसाठी नाही. चिपी विमानतळ ही सिंधुदुर्गासाठी अभिमानाची बाब आहे. परंतु भविष्यात कुडाळ शहरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागू नये, यासाठी या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा.

 पाटबंधारे विभागाकडे रक्कम भरून सदर पाणी विमानतळासाठी पुरविले जाणार आहे, तरीही तुमचे म्हणणे आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवितो, असे रेवडकर यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

Related Stories

प्राचार्य ए. एन. माळगे यांना पितृशोक

Anuja Kudatarkar

दीपक केसरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Anuja Kudatarkar

जांभ्या दगडांच्या टाईल्स वाढवणार घरांची शोभा!

Patil_p

सिंधुदुर्गात सामुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त करा!

NIKHIL_N

कोकण रेल्वे हाऊसफुल्ल, प्रवाशांची दमछाक

Patil_p

शुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत 45 वर्षीय इसमाचा खून

Archana Banage
error: Content is protected !!