चियान विक्रम सध्या स्वतःचा चित्रपट ‘पीएस-1’वरून चर्चेत आहे. मणिरत्नमकडून दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून चित्रपटाने मोठी कमाई देखील केली आहे. तर चियान विक्रमच्या 61 व्या चित्रपटाचा टीझर जारी करत त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. निर्माते पा रंजीत यांच्यासोबत चियान विक्रमचा हा पहिला प्रोजेक्ट असून याचे नाव ‘थंगालन’ ठेवण्यात आले आहे.


टीझरमध्ये विक्रमला एका आदिवासी समुदायाचा नेता म्हणून दर्शविण्यात आले आहे. अभिनेत्याचा यातील लुक अत्यंत लक्षवेधी आहे. टीझरमध्ये मालविका मोहनन, पार्वती थिरुवोथू आणि पशुपति यांची झलक दिसून येत आहे. पा रंजीतने 2014 मध्ये चियान विक्रमला या चित्रपटाची कहाणी ऐकविली होती. परंतु काही कारणांमुळे याचे चित्रिकरण सुरू होऊ शकले नव्हते. परंतु आता याचे चित्रिकरण सुरू झाले आहे.
चियान विक्रम अलिकडेच पोन्नियिन सेलवन 1 या चित्रपटात दिसून आला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तृषा कृष्णन, ऐश्वर्या राय-बच्चन, कार्थी, शोभिता धूलिपाला समवेत अनेक कलाकार आहेत. तर यापूर्वी विक्रम हा ‘कोब्रा’ या चित्रपटात दिसून आला होता. परंतु या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता.