Tarun Bharat

चिवला बीच किनारपट्टीवर गझिबो मोजताहेत अंतिम घटका

Advertisements

किनारपट्टीवरील चारही गझिबेंची दुरवस्था : पर्यटन महामंडळाने लक्ष देण्याची गरज

संग्राम कासले / मालवण:

जगाच्या नकाशावर पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास येत असलेल्या मालवण शहरातील चिवला बीच येथे पर्यटन महामंडळाने पर्यटकांसाठी उभारलेल्या गझिबोंची अवस्था दयनीय झाली आहे. पर्यटकांना निवांतपणे बसण्यासाठी एमटीडीसीने उभारलेले गझिबो अंतिम घटका मोजत आहेत. यावर्षी झालेला मुसळधार पाऊस व सोसाटय़ाच्या वाऱयामुळे चारही गझिबो पूर्णत: मोडकळीस आले असून ते पावसाळय़ात वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी अद्यापही एमटीडीसीने गझिबोच्या दुरवस्थेकडे लक्ष दिलेले नाही.

मालवण शहरात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठय़ा संख्येने पर्यटक येत असतात. किल्ले सिंधुदुर्गला भेट दिल्यानंतर पर्यटक तारकर्ली, देवबाग, चिवला या बीचेसना आवर्जून भेटी देतात. यातील चिवला बीच हा अनेक पर्यटकांच्या नेहमी पसंतीस उतरतो. चंद्रकोरीसारखा आकार असलेल्या चिवला बीचला देशी-विदेशी पर्यटक आवर्जून भेट देतात. चिवला बीचवर फेरफटका मारण्यासाठी रस्ता असल्याने पर्यटकांना या संपूर्ण बीचवर फेरफटका मारता येतो. चिवला बीच येथे समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठय़ा संख्येने येतात. पर्यटकांना बसण्यासाठी पर्यटन महामंडळाने चिवला बीचवर गझिबो उभारले आहेत. दोन वर्षांपूर्वी या गझिबोंची योग्य ती दुरुस्ती करण्यात आली होती.

पर्यटन महामंडळाचे दुर्लक्ष

चिवला बीच येथे आलेल्या पर्यटकांना काही काळ निवांतपणे घालविता यावा, यासाठी पर्यटन महामंडळाने चार गझिबो उभारले होते. सध्या चारही गझिबोंची अवस्था दयनीय झाली आहे. हे गझिबो शाकारण्यासाठी वापरण्यात आलेले गवत पूर्णपणे नष्ट झाले आहे. गवत नष्ट झाल्याने तात्पुरती मलमपट्टी म्हणून गझिबो कापडाने आच्छादण्यात आले होते. परंतु हे कापडही फाटून गेले आहे. त्यामुळे आकर्षक गझिबोंची रयाच गेली आहे. गझिबोच्या खालच्या फळय़ा तुटून गेल्या आहेत. यावर्षी झालेला मुसळधार पाऊस व सोसाटय़ाच्या वाऱयामुळे गझिबो पूर्णत: कलंडले आहेत. मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास ते वाहून जाण्याची भीती आहे.

उत्सव कालावधीत दक्षतेची गरज

उत्सव कालावधीत भाविक चिवला बीच येथे गणपती, श्रीकृष्ण विसर्जनासाठी येतात. चिवला बीचवर गणपती विसर्जनासाठी येणारी काही उत्साही मंडळी फटाके उडवून जल्लोष साजरा करतात. त्यामुळे फटाके उडवताना एखादी ठिणगी गझिबोंवर शाकारण्यात आलेल्या गवतावर पडून आग लागण्याची दुर्घटना घडू शकते. गेली तीन वर्षे गझिबोंना आग लागून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथे विसर्जनासाठी येणाऱया मंडळींनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Related Stories

जयगडमध्ये बुडालेल्या बोटीवरील एका खलाशाचा मृतदेह सापडला

Patil_p

निकृष्ट दर्जाचे झेंडे इन्सुली ग्रामपंचायतीकडून परत

Ganeshprasad Gogate

कलमे पालवीने हिरवीगार..हापूसला येणार उशिराने बहार

Patil_p

ठोक निधीसाठी राजापूर न.प.तील सत्ताधाऱयांचे आंदोलन

Patil_p

…तर राजेश पाटणेकर यांना मंत्रीपदही मिळेल – डॉ. प्रमोद सावंत

Sumit Tambekar

असगणीत पुन्हा घातक रसायन ओतले

Patil_p
error: Content is protected !!