Tarun Bharat

चीनची लबाडी

संपूर्ण जगाला महाभयंकर साथीच्या आजाराच्या निमित्ताने विनाशाच्या खाईत लोटून चीन आता पूर्वपदावर येत आहे. तेथील जनजीवन सुरळीत होत असून, चीनमधील विविध पर्यटनस्थळावर स्थानिक पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोनाच्या संकटातून चीन सावरत असल्याचे हे लक्षण आहे. हादरून टाकणाऱया प्रचंड धक्क्यातून आपण सावरत आहोत. एका कुकर्माची अथवा हलगर्जीपणाची किंमत आपल्यामुळे संपूर्ण जगाला मोजावी लागली. असे असताना चीनच्या चेहऱयावर जराही पश्चात्तापाची रेष दिसत नाही. जगाच्या अर्थव्यवस्थेला सुरूंग लागला असताना आपल्या अर्थव्यवस्थेला गती यावी, ती बळकट करण्यासाठी नेहमीपेक्षा जादा 100 युआनची खरेदी करा, असे सरकारी प्रोत्साहन चिनी खरेदीदारांना सरकार आता देत आहे. अर्थव्यवस्थेची चिंता जरूर असावी. पण तुम्ही जगाचा विचार करणार आहात की नाही? एक तर कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून संपूर्ण जगाला त्यांनी अंधारात ठेवले. जगाला दिशाभूल करणारी माहिती देत राहिले. चुकीच्या माहितीमुळे सर्वच देश प्रारंभी बेसावध राहिले. इटली, अमेरिका आणि स्पेन यासारख्या बलाढय़ राष्ट्रांचे कंबरडेच मोडले. त्यांचे हाल कुत्रे पण खात नाहीत, अशी अवस्था आहे. याउलट चीनचे वर्तन ‘सौ चुहे खा कर बिल्ली चली हज को’ याप्रमाणे आहे. लबाडी आणि बदमाशगिरीसाठी चीन अगोदरच बदनाम आहे. आपल्या शेजारील छोटय़ा आणि दुबळय़ा राष्ट्रांवर दादागिरी करायची, जीडीपीचे खोटे आकडे देऊन जगाच्या डोळय़ात धूळ फेकत फुगवलेल्या अर्थव्यवस्थेची शेखी मिरवायची. जागतिक महासत्ता होण्यासाठी या माध्यमातून पेरणी करायची. जगभरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उचलेगिरी करायची. मग स्वस्त किमतीची आमिषे दाखवून मेड इन चायनाच्या ब्रँडखाली कुठल्याही देशाच्या बाजारपेठेत घुसखोरी करायची. आयात निर्यात धोरण लवचिक ठेवत कोणत्याही देशातील त्यांची घुसखोरी अक्षरशः थक्क करणारी आहे. वास्तविक अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या जिवावर चीनने आपली अर्थव्यवस्था गब्बर केली. उदाहरणार्थ, चीन अमेरिकेला तब्बल 523 अब्ज डॉलर्सची निर्यात करते. या तुलनेत अमेरिका चीनला फक्त 187 अब्ज डॉलर्स निर्यात करते. अमेरिकेतील उद्योगधंद्यावर चीनने वर्चस्व मिळवले. चिनी उंट तंबूत घेतल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रम्प यांच्या डोळय़ावरची झापड गेली. दोन आर्थिक महासत्तातील जागतिक व्यापारी युद्ध यातून भडकले. व्यापार आणि विकासाचे नाटक वठवत ‘वन बेल्ट वन रोड’ या जगातील सर्वात मोठय़ा 64 लाख कोटींच्या प्रकल्पाचा घाट चीनने घातला आहे. या माध्यमातून तो 70 राष्ट्रांशी थेट संपर्क करेल. व्यापारी म्हणून यायचे आणि राज्यकर्ते बनायचे हा चिनी कावा त्यामागे आहे. ‘पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ पाकव्याप्त काश्मिरमधून नेण्याचे कटकारस्थान ते करत आहेत. पंचशील धोरण धुडकावून भारताबरोबरचा अनाक्रमणाचा करार त्यांनी मोडला. भारतावर आक्रमण करून सर्वात मोठा विश्वासघात केला. लबाडी, फसवणूक, लुबाडणूक, सत्याची पायमल्ली, दगाबाज ही सर्व विशेषणे चीनला बरोबर लागू पडतात. किंबहुना या सर्वांशी त्यांचा परस्परसंबंध असल्याचा आजपर्यंतचा इतिहास सांगतो. कोरोनाच्या निमित्ताने चीनचा लबाडीचा इतिहास पुन्हा नव्याने अधोरेखित झाला आहे. यावेळी तर धोकादायक विषाणूबाबतचे फार मोठे सत्य लपवून त्यांनी जगाचा विश्वासघात केला आहे.  कोरोना संकटाने चीनचे दार ठोठावल्यानंतर तब्बल दोन महिने उशिरा लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचा हलगर्जीपणा दाखवला. वास्तविक हा निर्णय तीन आठवडे अगोदर घेतला असता तर त्याचवेळी 95 टक्के रुग्णसंख्येला पायबंद बसला असता आणि जगभर त्याने पाय पसरले नसते, असा अभ्यासपूर्ण अहवाल सांगतो. जगाशी जाणीवपूर्वक खोटा व्यवहार करून संपूर्ण जग लॉकडाऊन करण्यास भाग पाडले. चीनच्या हुबेई प्रांतात 17 नोव्हेंबर 2019 ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. या रुग्णावर उपचार करणाऱया डॉक्टर व नर्सला रोगाची बाधा झाल्यानंतर डिसेंबरच्या मध्यास चीनच्या लक्षात आले होते की हा संसर्गजन्य रोग आहे. याचवेळी चीनने जगाला सावध करायला हवे होते. पण त्यांनी सत्य दडपले. सत्य सांगण्याचा प्रयत्न करणाऱया डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या. यानंतर 1700 हून अधिक वैद्यकीय कर्मचाऱयांना संसर्ग झाला. असे असताना 15 जानेवारीला त्यांनी जाहीर केले की, या आजारामध्ये मानवी संसर्ग होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. हे स्पष्टीकरण अक्षम्य होते. किंबहुना जानेवारीमध्ये विषाणूच्या नमुन्याची अमेरिकेने चीनकडे मागणी केली होती. वुहान येथील संशोधन संस्थेने तयारीही दर्शविली होती. पण चिनी सरकारने प्रयोगशाळेतून नमुने देण्यावर बंदी घातली. कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांची खोटी आकडेवारी चीनकडून दिली जात असल्याचा मोठा आक्षेप आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 16 लाखांच्या वर आणि मृतांचा आकडा एक लाखाकडे वाटचाल करीत आहे. मग साडेतीन हजार या चीनच्या  मृत्यूच्या आकडय़ावर कोण विश्वास ठेवेल? कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर चीनने जगाशी जी लबाडी केली आहे, त्याचे शासन त्यांना मिळायलाच पाहिजे.  चीनकडून त्याची भरपाई वसूल करावी, या संदर्भात अमेरिकेत याचिका दाखल झाली आहे. चीनच्या वुहान प्रांतातून झालेल्या कोरोना विषाणू उद्रेकाविषयी अनेक ‘थेअरी’ बाहेर येत आहेत. चीन आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे काही गोपनीय माहिती दडपून ठेवत असल्याबाबत पुष्टीही मिळत आहे. त्यामुळे चीनभोवतीचा संशयाचा फास आवळत चालला आहे.  मांस विक्री करणाऱया बाजारातून हा विषाणू बाहेर आला की वुहानमधील प्रयोगशाळेतून आला, याबाबतचे सत्य कधी ना कधीतरी बाहेर येईलच. मात्र चीनची लबाडी उघडी पाडण्याची आणि अंतिम सत्य शोधून काढण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी कोरोना पश्चात जगातील आंतरराष्ट्रीय समुदायाला पार पाडावी लागणार आहे.

Related Stories

मोदी नाबाद 70, संघ भाजपहून उत्तुंग

Patil_p

कुबुद्धी

Patil_p

चाके बंद ठेवून परिवहनची प्रगती होईल का?

Amit Kulkarni

वीजबिले, बियाणे, खत प्रश्नी राजकीय औदासिन्य

Patil_p

मागील दरवाजापाशी इच्छुकांची झुंबड!

Patil_p

सत्वशुद्धी झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही

Patil_p