प्रारंभी दिलेला हिशेब चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण
बीजिंग
कोरोना विषाणूच्या उदेकात मृत झालेल्यांच्या संख्येत चीनने अचानकपणे 50 टक्के वाढ केली आहे. आधी दिलेला मृतांचा आकडा चुकीचा होता, हे या देशाने मान्य केले. मात्र, आकडा लपविल्याचा आरोप फेटाळला. नव्या आकडेवारीनुसार चीनमध्ये मृतांची संख्या 4 हजार 632 इतकी झाली आहे.
चीनने आकडेवारी बदलल्याने त्या देशात नेमक्मया किती जणांचा मृत्यू झाला, याचे गूढ अधिक गडद झाले आहे. काही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या म्हणण्यानुसार चीनमध्ये किमान 42 हजार जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. कोरोना साथीचा उदेक झाल्यापासून चीनमध्ये लाखोच्या संख्येने मोबाईल फोन >?ॉट रिचेबल’ लागत आहेत. सर्वाधिक मृत्यू चीनच्या रासायनिक उद्योगाचे माहेरघर मानल्या जाणाऱया वुहानमध्ये झाले आहेत.
आकडय़ांत गफलत?
प्रारंभी चीनने दिलेली मृतांची आकडेवारी चुकीच्या गृहितकांवर आधारित होती, असे त्या देशाच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते झाओ लीजिंग यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. विविध संस्थांना सर्वेक्षणे केल्यामुळे तसेच मृतांच्या नातेवाईकांनी चुकीची माहिती दिल्यामुळे आकडय़ांत फरक पडला, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चीनमध्ये आतापर्यंत नेमक्मया किती लोकांचा बळी या उदेकात पडला, याची अचूक माहिती मिळविण्यात चीनच्या सरकारलाही अपयश आल्याचे दिसत आहे.
चीनचा अमेरिकेवर आरोप


चीनने कोरोनाच्या उदेकाची माहिती बराच काळ लपवून ठेवली. त्यामुळे जगात या विषाणूचा फैलाव वेगाने झाला. चीनने वेळीच जगाला सावध केले नाही. हे त्या देशाचे कारस्थान असू शकते, असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. चीनने तो फेटाळला असून अमेरिकेचे अध्यक्ष स्वतःच्या देशातील परिस्थितीवरून जगाचे लक्ष हटविण्यासाठी चीनवर कोरोनाचा प्रसार केल्याचा आरोप करीत आहेत, असा प्रत्यारोप केला. मात्र, कोरोनाचा उदेक झाल्यापासून किमान दोन आठवडे जगापासून माहिती लपविण्यात का आली, याचे समर्पक उत्तर चीनने अद्यापही दिलेले नाही.
स्पेनमधील मृतसंख्या 19,500 पर्यंत


गुरुवार ते शुक्रवार या 24 तासांत स्पेनमध्ये कोरोनाच्या साथीत आणखी 585 नागरिकांचा बळी पडला असून एकंदर मृतांची संख्या 19 हजार 478 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासातील मृतांच्या संख्येत त्यापूर्वीच्या 24 तासांपेक्षा 20 टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, अद्यापही देशातील परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे, असे म्हणता येणार नाही, असे स्पेनमधील अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे. अमेरिका आणि इटलीच्या खालोखाल स्पेनमध्येच कोरोनाने सर्वाधिक हाहाकार माजविला आहे.
आफ्रिकेतही कोरोना कहर करणार


सध्या आफ्रिका खंडात कोरोनाबाधितांची संख्या कमी भासत असली तरी येत्या चार-पाच महिन्यात या खंडात कोरोनाचा मोठा उदेक होणार आहे, असे मत लंडनमधील इम्पिरिअल महाविद्यालयाच्या तज्ञांनी व्यक्त केले आहे. एक वर्षात आफ्रिका खंडात 33 लाख लोकांचा बळी जाऊ शकतो. तसेच साधारणतः 120 कोटी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते, असे धक्कादायक अनुमान या तज्ञांनी व्यक्त केले आहे. आफ्रिका खंडातील बहुतेक देश मागास असून पुरेसे अन्नही नाही, अशी स्थिती आहे. उपासमारीमुळे अनेक लोक विशेषतः बालकांचे अमर्याद कुपोषण होत असून कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती त्यांच्यात नाही. त्यामुळे लवकरच हा खंड कोरोनाग्रस्त होणार असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्मयता या तज्ञांनी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊन उठविण्याची योजना तयार


अमेरिकेच्या 50 प्रांतांमध्ये 30 प्रांतांमध्ये कोरोनाचे बळी वाढत आहेत. न्यूयॉर्क शहरात कोरोनाच्या उदेकाने हाहाकार माजला आहे. त्यामुळे अनेक प्रांतांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉकडाऊन उठविण्याची पूर्वतयारी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात येताच आर्थिक व्यवहार पूर्ववत केले जातील, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. देशातील 2 कोटी 20 लाख लोकांना रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनला विरोध वाढत असून त्याची दखल सरकारला घ्यावीच लागेल, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेत दिवसातील सर्वाधिक बळी


शुक्रवार सकाळपर्यंतच्या 24 तासात अमेरिकेत कोरोनाचे 4 हजार 233 बळी पडले आहेत. एका दिवसातील ही त्या देशातील सर्वाधिक संख्या असून गेल्या दोनशे वर्षांतील ही सर्वोच्च संख्या असावी, असे मानले जात आहे. महायुद्धांच्या काळातही अमेरिकन नागरिकांचे एका दिवसात इतक्मया मोठय़ा प्रमाणावर बळी पडले नव्हते. अमेरिकेत सध्या अनेक ठिकाणी मृतदेहांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयातील शवागारांमध्ये जागा अपुरी पडत आहे. चार मृतदेह पावणाऱया जागेत 20 हून अधिक मृतदेह ठेवले जात आहेत. अनेक मृतांचे नातेवाईक मृतदेह स्वीकारण्यासाठी पुढे येत नाहीत, असे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनालाच त्यांचे अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. न्यूयॉर्कमध्ये तेथील स्थानिक सरकारने लॉकडाऊनच्या मुदतीत 18 मे पर्यंत वाढ केली आहे.
सिंगापूरमध्ये 623 रूग्णांची वाढ


सिंगापूर या देशात शुक्रवारी एका दिवसात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 623 ने वाढली आहे. त्यामुळे या देशातील एकंदर रूग्ण आता 5 हजार 50 झाले आहेत. नव्या रूग्णांमध्ये इतर देशातून कामासाठी आलेल्या स्थलांतरितांची संख्या जास्त आहे, असे सांगण्यात आले. या देशातील ‘मुश्ताफा सेंटर’ मॉलच्या व्यवस्थापनावर इमारतीत स्थलांतरित कामगारांना ल्पवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिंगापूरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम अधिक कठोर करण्यात आला असून तो तोडणाऱयास जबर दंड आहे.
इराणमध्ये मृतांचा आकडा 5000 जवळ


इराण या देशात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवार संध्याकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये मृतांच्या संख्येत 89 ची भर पडली आहे. या देशात आतापर्यंत या उद्रेकात 4 हजार 958 जणांचा बळी गेला आहे. जागतिक क्रमवारीत हा देश मृतांच्या संख्येत सातव्या क्रमांकावर आहे. या देशात बाधितांची संख्या 3 लाख 19 हजार 879 असून त्यापैकी 54 हजार 64 लोक बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. इराण सरकारच्या म्हणण्यानुसार गेल्या 3 दिवसांमध्ये रूग्णवाढीचे प्रमाण कमी आहे. आहे. मात्र अद्यापही परिस्थिती आवाक्यात आलेली नाही, असे सांगण्यात आले.
रशियात रूग्णसंख्या 32 हजार पार


शुक्रवार संध्याकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये रशियात कोरोना रूग्णसंख्येत 4 हजार 70 ची भर पडली. या देशातील एकंदर रूग्णसंख्या आता 32 हजार 8 इतकी झाली आहे. आगामी आठवडय़ांमध्ये परिस्थिती आणखी बिकट होईल असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी दिला. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मार्चअखेरीपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या शहराची लोकसंख्या 1 कोटी 20 लाख इतकी आहे. असून ते युरोपातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे. त्यामुळे तेथे कोरोना पसरू नये याची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. कामावर जाणे, पाळीव प्राण्यांना फिरवून आणणे आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे, येवढीच मुभा देण्यात आली आहे.
फ्रान्समध्ये परिस्थिती बिकटच


फ्रान्स या देशात परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. येथे नव्या रूग्णांची संख्या स्थिरावली असली तरी रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुधारलेले नाही. या देशात आतापर्यंत 16 हजारांहून अधिक जणांचे बळी गेले असून 1 लाखांहून अधिक जणांना लागण झाली आहे. फ्रान्समध्येही अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून काही ठिकाणी त्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून निर्यातीचे तिमाही प्रमाण 40 टक्के कमी झाले आहे. सध्या आणीबाणीसदृष्ट स्थिती आहे.